अयोध्या : आज आपले राम आले आहेत. मला खूप काही बोलायचं आहे, पण कंठ दाठले आहे. आजचा क्षण हा अलौकीक आणि पवित्र आहे. २२ जानेवारी २०२४ ही फक्त कॅलेंडरवरील तारीख नाही. नव्या कालचक्राचा उगम आहे. आजची वेळ सामान्य नाही. हजारो वर्षानंतरही आजच्या दिवसाची चर्चा होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सांगितले. राम म्हणजे आग नाही तर ती ऊर्जा आहे. राम म्हणजे भारताचा विचार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात प्रभू श्रीरामाचा अर्थ उलगडून सांगताना भारतीय संस्कृतीमधील त्याचे महत्त्व अधोरेखित केले.
पंतप्रधान मोदी यांनी ‘सियावर रामचंद्र की जय… असे म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, आपल्या रामासाठी अयोध्या आणि देशवासीयांनी शेकडो वर्षांचा वियोग सहन केला. आपल्या अनेक पिढ्यांनी हे सहन केले आहे. राम वर्तमान नसून शाश्वत, अनंत आहे. राम हा भारताचा विश्वास आहे, राम हा भारताचा आधार आहे, राम हा भारताचा आचार आहे, राम हा भारताचा विचार आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. राम हे भारताचे जीवन आहे. राम महान आहे, राम प्रभाव आहे, राम प्रवाह आहे, राम धोरण आहे, राम सातत्य आहे, राम निरंतरता आहे, राम सर्वव्यापी आहे, जग, विश्व-आत्मा आहे, जेव्हा राम पूज्य होतो, त्याची प्रतिष्ठापना होते तेव्हा त्याचा प्रभाव हजारो वर्षे टिकतो. गुलामगिरीची मानसिकता झुगारून उभे राहणारे राष्ट्र नवा इतिहास घडवत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.