दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपण अनेकदा ऐकलंय, वाचलंय. निरागस, निष्पाप मुलांना पाहून त्याची प्रचितीदेखील येते. आपण या मुलांना प्रेमाने वाढवतो, संस्कार देतो, घडवतो. पण आपल्या या समाजात काही अशी मुलेदेखील आहेत, जी वाट चुकलेली आहेत, ज्यांना मार्ग दाखवणारं कोणी नाही. अशा मुलांसाठी त्या मायेचं विश्व बनतात. त्यांना संस्कार देतात. मायेची ऊब देतात. एवढंच नव्हे तर उदरनिर्वाहक्षम बनवतात. ही वात्सल्यमूर्ती म्हणजे ‘दि वात्सल्य फाऊंडेशन’च्या प्रमुख विश्वस्त श्रीमती स्वाती मुखर्जी.
समाजसेवा ही शिकवावी लागत नाही. त्यासाठी कधी कोणत्याही प्रकारचा गृहपाठ करावा लागत नाही, तर समाजाप्रति काहीतरी करण्याची उत्कट इच्छा असली पाहिजे. स्वाती मुखर्जींवर हे संस्कार वडील डॉ. रघुनाथ मुखर्जी आणि आई अशीमा मुखर्जी यांच्याकडून झाले. स्वाती सांगतात, “माझे वडील हे महाराष्ट्र शासनाच्या डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल मुंबई मध्ये प्रोफेसर या पदावर कार्यरत होते, तर आई गृहिणी. आई-वडिलांचा त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांशी वर्तणूक किती प्रेमाची, मायेची आणि आपुलकीची होती हे मी जवळून पहिले आहे. कोणाच्याही चांगल्या-वाईट प्रसंगाला कोणताही गाजावाजा न करता उभे राहणे याची मी साक्षीदार आहे. त्यामुळे मला वाटते की, मी सुद्धा कळत-नकळत समाजकार्याकडे ओढले गेले असावे.”
बंगाली भाषिक असणाऱ्या स्वाती मुखर्जी यांचं बालपण ते तरुणपण यातील सर्वात महत्त्वाचा काळ मुंबईतील दादर-हिंदू कॉलनीत गेला. “माझा जन्म बंगाली कुटुंबात झाला असला तरी माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी ही मुंबई आहे. मी अस्सल मुंबईकर आहे”, असे स्वाती अभिमानाने सांगतात. चित्रा सिनेमाच्या समोरच्या रस्त्याला लागून असणाऱ्या ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी हायस्कूल इंग्लिश मीडियम’ या शाळेत मी आणि माझ्या मोठ्या बहिणीने दीदीने (शिल्पी गांगुली) मुख्य शिक्षण पूर्ण केले. हे करत असताना मराठी भाषेचे ज्ञानही प्राप्त केले. याला कारणीभूत ठरला आमच्या वडिलांचा अट्टाहास. एस.एस.सी.ची परीक्षा दिल्यानंतर पुढे कशात करिअर करायचे, हा स्वाती यांच्यापुढे मोठा प्रश्न होता. स्वाती सांगतात, “शालेय जीवनात मी टॉमबॉय होते. करिअरविषयी मला अजिबातच गांभीर्य नव्हते. तरीही माझ्या वडिलांच्या परिचित असणाऱ्या बंगाली वर्तुळात मी आणि दीदी कौतुकाचा विषय होतो. मराठी शिकूनही आम्ही मराठी इतकीच चांगली बंगाली लिहू आणि वाचू शकत होतो. दीदीला शिक्षिका व्हायचे होते. त्या दृष्टीने ती शिक्षण घेत होती. पण मला कोण व्हायचंय तेच कळत नव्हते. दहावीनंतर रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे मानसशास्त्र (सायकॉलॉजी) हा विषय आवडू लागला. त्या विषयातून बीएचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे ठरलं. मात्र रुईया महाविद्यालयात तो पर्याय नव्हता. त्यामुळे रूपारेल महाविद्यालयात बी.ए. मानसशास्त्र या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. भविष्यात या अभ्यासक्रमाचा उपयोग समाजकार्यात होईल हे कधी ध्यानी-मनी देखील नव्हते.”
बी.ए. झाल्यावर पुढे काय? हा प्रश्न स्वाती यांच्यापुढे होताच. या प्रश्नाचे उत्तर स्वाती यांना त्यांच्या मामी डॉ. मुक्ता बॅनर्जी यांच्याकडून मिळाले. स्वाती सांगतात, “नॅबमध्ये अपंग व्यक्तींच्या मदतनीस अभ्यासक्रमाविषयी माहिती समजली. हा अभ्यासक्रम करीत असताना तिथे श्रीमती भावना कामदार यांच्याशी ओळख झाली. नॅबचा अभ्याक्रम पूर्ण करतानाची माझी चिकाटी पाहता भावनाजी यांनी समाजसेवा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्या ‘नॅब’च्या अभ्यासक्रम शिकत असताना सेंट झेवियर्स महाविद्यालयामधून कम्युनिकेशनशी संबंधित निरनिराळे अभ्यासक्रम पूर्ण केले. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क मुंबई या संस्थेतून समाजशास्त्र या विषयाशी संबंधित पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला.
स्वाती यांनी यांच्या अतिरिक्त पात्रतेमध्ये बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनकडून आरोग्य आणि रुग्णालय प्रशासनातील व्यवस्थापनचा कोर्स केला. त्यासोबतच स्वाती या एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आणि एक थिएटर कलाकारदेखील आहेत. त्या रवींद्र संगीत आणि बंगाली आधुनिक गाणीदेखील शिकल्या आहेत. त्यांना प्रवास आणि फोटोग्राफी करण्याचे छंद आहेत. स्वाती यांनी हिमालयात आध्यात्मिक तप केल्याने जीवनात येणारा ताण-तणाव कमी करण्यास त्यांना खूप मदत होते आणि विविध दृष्टिकोनांसह जीवन परिस्थितींशी संपर्क साधता येतो.
सन १९८९ ला श्रीमती नीला श्रॉफ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती मुखर्जी या दि वात्सल्य फाऊंडेशनशी जोडल्या गेल्या व तेथूनच त्यांना दि वात्सल्य फाऊंडेशनमध्ये मुलांसाठी समाजकार्य करण्याची संधी मिळाली. ‘दि वात्सल्य फाऊंडेशन’च्या सुरुवातीच्या दिवसांविषयी स्वाती सांगतात, “या संस्थेत काम करताना मानसशास्त्र शिकल्याचा उपयोग झाला. प्रतिकूल परिस्थितीत आयुष्य जगताना जेव्हा त्या अवस्थेत टिकाव धरणे असह्य होते, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी माणूस निरनिराळ्या पर्यायांचा उपयोग करतो. घरातून पळून बाहेर पडणाऱ्या मुलांचेही असेच होते. अशी मुले पोलीस, रेल्वे पोलीस, समुपदेशकांना सापडताच. त्यांच्या चांगल्या जडणघडणीसाठी विविध संस्थांमध्ये पाठवले जाते. त्यातील एक आमची ‘दि वात्सल्य फाऊंडेशन’ ही संस्था आहे. इथे आम्ही मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतो. मुलेही मोकळेपणाने आमच्याशी बोलतात. आम्ही मुलांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देतो, कारण ते मुलांना त्यांची आवड शोधण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास व त्यांच्या जीवनाविषयीचे एकूण प्रेम वाढवण्यासाठी, त्यांना वेगवेगळे शोध घेण्यास सक्षम करते.
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’ हे प्रामुख्याने काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी कार्य करते. ‘दि वात्सल्य फाऊंडेशन’ ही संस्था वय वर्षे ६ ते १८ अशा वयोगटातल्या वंचित मुलांसाठी काम करत असून मुलांना शिक्षण, आरोग्य, अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत सोयी पुरविल्या जातात. याचसोबत मुलांना समुपदेशन, मनोरंजनात्मक खेळ, नृत्य, कला व कौशल्य या विविध कलांच्या माध्यमातून निरनिराळे अभ्यास वर्ग वेगवेगळ्या परिसरात राबविले जातात. या अभ्यासवर्गांना आसपासच्या परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलींचीही उपस्थिती असते. याविषयी स्वाती सांगतात, “ज्या मुलींना शिकायचे आहे त्या मुली त्यांची शाळा सांभाळून येतात. आमच्या कलावर्गांना हजेरी लावतात. आमच्या संस्थेचे कार्यकर्ते या मुलींना आनंदाने त्यांच्या विविध उपक्रमांत सहभागी करून घेतात.”
“आता वंचित या शब्दाची व्याप्ती आम्ही थोडी बदलली आहे. पूर्वी घरातून पळून आलेल्या मुलांचे पुनर्वसन आम्ही इथे करायचो. आता बिगारी कामांच्या निमित्ताने मुंबईत स्थलांतरित होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे असे स्थलांतरित पालक त्यांच्या मुलांना आमच्या संस्थेत पुनर्वसनासाठी पाठवितात. त्यांचेही आम्ही मोठ्या प्रमाणात पुनर्वसन करतो. त्यांना शैक्षणिक सुविधा तर देतोच शिवाय या मुलांनी पुढे भविष्यात एक जबाबदार नागरिक बनावे यासाठीही आम्ही विशेष प्रयत्न करतो.”
संस्था चालवणे ही एक प्रकारची तारेवरची कसरत असल्याचे स्वाती यांचे म्हणणे आहे. त्या सांगतात, “आमच्या संस्थेतील कित्येक मुले मोठमोठ्या कॉफी शॉपमध्ये काम करीत आहे आणि शेफही झाले आहेत. संस्थेतील पुनर्वसित झालेली मुले अजूनही आपल्या बायको-मुलांना घेऊन मला भेटण्यासाठी येतात, तेव्हा त्यांची झालेली प्रगती पाहून मनाला खूप समाधान वाटते. ही मुले मला जेव्हा ‘माँ’ म्हणून हाक मारतात, तेव्हा अजूनही धन्य झाल्यासारखे वाटते. पण जेव्हा संस्थेतून शिकून स्वतःच्या पायावर उभे राहिल्यानंतर देखील मुलं आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न करतात, ड्रग्सच्या आहारी जातात तेव्हा खूप वाईट वाटते.”
स्वाती मुखर्जी या गेली अनेक वर्षे महिला आणि बाल विकास विभाग, कामगार विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांच्या संपर्कात आहेत. यांच्या माध्यमातून दि वात्सल्य फाऊंडेशनचे विविध प्रकल्प गरजू तसेच समाजापर्यंत पोहोचवले जातात. २०१५ मध्ये स्वाती यांची बीबीसी रेडिओवर मुलाखत झाली होती. अलीकडच्या काळात स्वाती यांच्या सामाजिक कार्याचा ‘सोरोप्टिमिस्ट एक्सलन्स अवॉर्ड’ आणि ‘बिमल रॉय मेमोरिअल स्पेशल रेकग्निशन अवॉर्ड’ देऊन गौरव करण्यात आला आहे.
२२ नोव्हेंबर २०२३ ला ‘दि वात्सल्य फाऊंडेशन’ला मुलांसाठीचे सर्वोत्कृष्ट निवारागृह म्हणून ‘बालस्नेही’ हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास आयुक्तालय (महाराष्ट्र) आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार संस्थेला बहाल केला आहे. वंचित मुलांसाठी निवारा केंद्र चालवणे आणि निवारा केंद्रात शिकण्यासाठी येणाऱ्या वंचित मुलांच्या आयुष्याला सकारात्मक वळण लावणे हे स्वाती यांच्यासाठी एक प्रकारचे आव्हान होते. मात्र ते त्यांनी लीलया पेलले आहे आणी हे कार्य करत असताना दि वात्सल्य फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. सफला श्रॉफ (चेअरपर्सन) व श्री फ्रेडी मार्टिस (विश्वस्त) यांचे खूप मोलाचे सहकार्य व सल्ला लाभला. त्याचबरोबर माझ्या कर्मचारी वर्गाचे देखील सहकार्य लाभले. त्यामुळे हे कार्य मी उत्कृष्टरीत्या करू शकले. स्वाती मुखर्जी कित्येक वंचित, गरीब मुलांच्या ‘माँ’ झाल्या आहेत. आज समाजातील दिशा भटकलेल्या मुलांना त्या मार्ग दाखवत आहेत. त्यांना संस्कारक्षम बनवत आहेत. सर्वार्थाने स्वाती मुखर्जी या ‘लेडी बॉस’मधलं वात्सल्यमूर्ती रूप आहे.