नक्षत्रांचे देणे: डॉ. विजया वाड
बायकोऽऽ” विश्वंभरने जोरात हाकारले.
“अरे, गिरिजा इतकं सुरेख नाव आहे तिचं.” आई मधे पडली.
“बायकोमध्ये जो गोडवा आहे तो ‘गिरिजात’ नाही.” विशू म्हणाला.
“असं होय?” आईला हे नवं होतं. पण पचवलंन.
हल्लीच्या मुलांच्या तऱ्हा तऱ्हा असतात. अशी आपल्या मनाची समजूत मातेनं घातली. नव्या पिढीची विचारसरणी जुन्या पिढीशी जुळते थोडीच, त्यात फरक असायचाच ना!
“विशू, काय रे? बायकोनं पुसलं.
“फिरायला जायचा मूड आहे गं. वी विल लव्ह इच अदर.”
“अरे काय हे? आई बसल्यात नं इथे.”
“तिला ओ की ठो इंग्रजी समजत नाही.”
“पण यवढं समजतं बरं का विशू.”
“आई, तू तुझ्या नवऱ्यावर, माझ्या बाबांवर, प्रेम केलं नाहीस का?”
“हो, मनापासून केलं.” आई मान वेळावत म्हणाली.
“मग तेच मी करतोय. हक्काची, लग्नाची बायको आहे माझी.”
“हो बाबा, तेही खरंय.” आईने होकार भरला.
“बायको, आता वेळ घालवू नकोस. चल, पटपट साडी बदल. झक्क तयार हो. लोकांमध्ये मला माझी नवी कोरी बायको मिरवायची आहे.”
“हो विशू अशी झक्क नटते की लोक बघत राहतील.”
“नथ घालशील?”
“नथ?”
“अगं हल्ली फॅशन आहे. नथीत बायका साजऱ्या दिसतात.”
“घालते म्हटलं ना मी?”
“गुड” विशू खूश झाला. त्याने शीळ वाजवली. आईने बघितले, पण मग कानाआड केले. मनाआड केले. मुंबईच्या जागा टिचभर. त्यात नवं नवं लग्न झालेलं! प्रेम व्यक्त करायला ‘मधुचंद्र’ परवडत नाही मग? आईसमोरच! आई परकी थोडीच? तिच्यापुढे कसला आडपडदा? आणि आता ही रोजचीच बाब झाली.
ती झक्क नटली. सुंदर दिसली. नथ खरोखर छान दिसत होती.
“छान दिसतेस नथनीत.” सासूने मोकळ्या मनाने कौतुक केले.
“थँक्यू आई.” सुनेनं पटकन् वाकून नमस्कार केला. सासू त्या नमस्कारानं खूश झाली. “अखंड सौभाग्यवती भव.”
“तुमचा आशीर्वाद लाखमोलाचा आहे आई.” सून भावभरी झाली.
“आता फिरून या. येता येता हॉटेलात जेवा. घरी जेवणाचा कुटाणा नको. येताना एक सादा डोसा पार्सल आणा माझ्यासाठी म्हणजे झालं.” आपली सासू किती ‘सोपी’ आहे. ‘छळिक’ तर अज्जिबात नाही. सून मनाशी विचार करीत राहिली. इसके साथ अपना जमेगा. आपुन भी रुबाब मारनेला नही.
नथ प्रेम करताना हिला काढून ठेवायला सांगू. प्रेमात अडथळा नको. विश्वंभर विचार करीत होता.
दोघं फिरायला बाहेर पडली. विशूनं बायकोचा हात घट्ट धरला होता.
“इश्श, मला चालता येतं आपापलं.”
“नवी नवी, नवीकोरी आहेस ना? पकडून, जखडून ठेवावीशी वाटतेस.”
“बरं मग. हव्वं ते करा.”
“याहून सेन्सॉर गोष्टी रात्री!” तो कानात म्हणाला, मग म्हणाला,
“रागावलीस? मधुचंद्राला नेले नाही म्हणून?”
“नाही रे विशू अजिबात नाही. इथेच एक बाग आहे. नावच ‘मैसोर गार्डन’ आहे. भेळ मस्त मिळते. सस्तेमे मस्त मेन्यू.”
“शहाणी माझी बाय.” त्याने कौतुक केले. नव्या कोऱ्या बायकोचे!
“तुझी आई इथेच राहणारे का रे विशू?”
“उपायच नाही. ओल्ड होममध्ये सात सात हजार घेतात गं. मला परवडणारे दर नाहीत.”
“हरकत नाही. आपण सांभाळू! बिना कुरकुर.”
“शहाणी माझी बायको ती!”
“पुरे हं! चढून जाईन मी अशानं.”
“अगं, मनापासून केलेली स्तुती आहे ही.”
“तरी पण आता पुरे.”
“पुरे तर पुरे.” नव्या कोऱ्या बायकोचे त्याने ऐकले.
“बायको, एक सांगायचं होतं.”
“बोल ना! निस्संकोच सांग!”
“आपण स्वयंपाकघरात झोपूया.”
“का?”
“वन रूम किचनची छोटीशी जागाय आपली. त्यात तू आल्या आल्या तिला किचनमध्ये नको गं लोटायला.”
“बायको, प्लीज, वडिलांच्या पश्चात फार हाल अपेष्टात वाढविले, शिकविले आहे मला आईने.”
“विशू, मला कल्पनाय ना!” बायको समंजस झाली. फिरणे झाले. घरी आले दोघे. “तुमच्यासाठी भेळ आणलीय.” सुनेने सासूला भेळ दिली. “आपण बाहेर झोपा. मी नि हे किचनमध्ये झोपतो.” सून बोलली. शहाणी बायको बनून…