दरवळ: लता गुठे
विचार बदलला की, जगण्याची दिशा बदलते आणि दिशा बदलली की, जीवनाची दशाच बदलून जाते. ज्यांच्या वाट्याला जास्त दुःख येते, तोच सुखाचा शोध घेतो. सुखाचा शोध घेताना अनेक वेदनेच्या पायघड्यांवरून चालावे लागते. माणूस विचार करायला लागतो. स्वतः चुका शोधत अंतर्मुख होऊन त्या विधात्याला प्रश्न विचारतो. दुःखाचे कारण शोधल्याशिवाय सुखाचा शोध घेता येणार नाही, असे अनेक संतांच्या व महान पुरुषांच्या चरित्र, आत्मचरित्रातून आपल्या नकळत लक्षात येते. तुकारामाचे अभंग आपल्याला खूप काही शिकवून जातात. मनःशांती हा खऱ्या सुखाचा पाया आहे. मन अशांत असेल आणि आजूबाजूला कितीही सुख सुविधा असतील, तर ते सुख मनाच्या अंतस्थापर्यंत जात नाही. गाडी, बंगला असेल, तर मुलं चांगली निघत नाहीत. मुलं चांगली असतील, तर गाडी बंगला नसतो. कोणती ना कोणती कमी कायमच मनाला अशांत करते. तीच गोष्ट चिंता निराशेचे कारण होते आणि चिंता ही चित्तेसमान समजली जाते. ती माणसाला आतून पोखरत जाते. दुःखात माणसांचे विचार खुंटतात. म्हणून जेव्हा दु:ख असते त्याच वेळी सुख हरवून जाते. त्यामुळे आहे त्याच्यात समाधान मानायला शिकावे. कर्म करताना सजग असायला हवे.
जीवन जगता जगता माणसाने जे भावलं ते घ्यावं. त्यातून मानवी मूल्य आपोआप अंगीकारली जातात. मान्य आहे सुख परिस्थितीवर अवलंबून असते. वास्तवाला सामोरे जाताना त्याकडे तटस्थ दृष्टीने पाहिलं आणि आहे त्या परिस्थितीचा स्वीकार केला, तर जगणं जास्त सोपं होतं. एक सकारात्मक विचार शंभर पावलं पुढे घेऊन जातो; परंतु एक नकारात्मक विचार हजारो पावले मागे घेऊन जाईल. अंधाराकडून प्रकाशाचा मार्ग शोधणारी माणसं सदैव सकारात्मक ऊर्जेने जगतात, तीच ऊर्जा त्यांना आनंदाच्या दिशेने घेऊन जाते. आनंदाचे सरोवर आपल्याभोवती निर्माण करायला खूप पैसा लागत नाही किंवा लागत नाही फक्त जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की, आपल्या चेहऱ्यावर कायम स्माईल राहते. हीच तर खऱ्या जगण्याची गुरुकिल्ली आहे.
आपण केलेल्या सर्व गोष्टींना मन हे साक्षी असतं. म्हणूनच म्हणतात की, तुम्ही जगाला फसवू शकतात. स्वत:ला कसं फसवणार? ते सर्व गोष्टींना साक्षी असते. मन हा आपल्या शरीराचा सारथी आहे. त्याला जे विचार आपण देतो त्या विचाराप्रमाने ते वागतं. आपल्या नकळतपणे आपण आणि नकारात्मक गोष्टी मनात कोंबत असतो. मनातल्या अनेक विकारांकडे आपण कधी सजगपणे पाहतच नाहीत. त्यामुळे मनातली जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे हा कचरा साफ केला तरच आपण मन प्रसन्न ठेवू शकतो आणि जर मन प्रसन्न ठेवलं, तर ते आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकता आणि जर इच्छा आकांक्षा पूर्ण झाली, तर आनंदाचं सरोवर आपोआपच निर्माण होतं.
सत्कर्म करून, तसेच गरजूंना मदत करून मानसिक सुख मिळते ते जास्त महत्त्वाचे असते. जीवनातील आनंद नाहीसा होण्याआधी. सावध असायला हवे कारण, सुख आणि दुःख दोन्ही गोष्टी सतत बदलत असतात कायमस्वरूपी काहीच नसते. देहाचा विसर पडण्यासाठी बहुतेक लोक व्यसनाच्या आहारी जातात; परंतु या व्यसनामुळे जास्त नुकसान होते. ते टाळण्यासाठी संतांसारखे आपल्या सारख्या संसारी माणसाला अखंड हरिनाममध्ये मन गुंतवून व परमेश्वराचे निर्गुण निराकार रूपाचे दर्शन घेण्याचा ध्यास घेऊन चालणार नाही. त्यासाठी एक सोपा मार्ग आहे तो म्हणजे सावधपणे कर्म करून सत्कर्माची इंद्रियांना सवय लावली, तर बऱ्यापैकी सुखाचे सरोवर आपण निर्माण करू शकतो. शेवटी जाता जाता माझ्या कवितेतील चार ओळी…
सुख मागून मिळेना, दुःख जाळून सरेना
भोग भोगल्याशिवाय, हाती काहीच उरेना…
असे जरी असले तरी मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी जाणूनबुजून विचारांना दिशा द्यावी लागते हेच खरे. म्हणूनच संतांनी म्हटलं असेल…
मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण…