Tuesday, March 18, 2025
Homeसाप्ताहिककोलाजविनयची करामत

विनयची करामत

कथा: रमेश तांबे

एक होतं गाव. गावात एक शाळा होती. छोटीशी साधीशी. त्या शाळेत विनय नावाचा एक मुलगा होता. इयत्ता आठवीत शिकणारा. तो हुशार आणि चपळ होता. साऱ्या शाळेत तो प्रसिद्ध होता. खेळांच्या स्पर्धेत हमखास बक्षीस पटकवायचा. नाटकात काम करायचा, सांस्कृतिक कार्यक्रमातून भाग घ्यायचा. भाषण स्पर्धा तर त्याच्या आवडीचा विषय! त्याचं बोलणं, वागणं एकदम नम्र. त्यामुळे साहजिकच तो शिक्षकांचाही लाडका होता आणि विद्यार्थ्यांतही लोकप्रिय होता. असा हा विनय शाळेला ललामभूत ठरलेला. पण एके दिवशी त्याने सगळ्यांचा भ्रमनिरास केला. कारण त्या दिवशी पोलीस विनयला शोधत शाळेत आले.

त्याचं असं झालं. एके दिवशी अचानक पोलिसांची गाडी शाळेत आली आणि तीही विनयला शोधत. एवढे दिवस आदर्श वाटणारा विनय काही गैरप्रकार कधी करेल, असे स्वप्नातही कुणाला वाटले नव्हते. कारण पोलीस शाळेत आल्याचे समजतात विनय चपळाईने खिडकीतून उडी मारून पळून गेला. थोड्याच वेळात मुख्याध्यापकांसह पोलीस विनयला शोधत आले. पण तो पसार झाल्याचे लक्षात येताच पोलीस पटकन गाडीत बसले आणि निघून गेले. सारा वर्ग अचंबित झाला. त्याचे पोलिसांना बघून पळून जाणे हाच विषय वर्गात चर्चेचा होता!

इकडे खिडकीतून बेधडक उडी मारून विनय पळत सुटला. कसेही करून पोलिसांच्या हाती लागायचे नाही, असे त्याने ठरविले होते. उडी मारल्यामुळे पायाला थोडेसे खरचटले होते. पण त्याची पर्वा न करता विनय पळत होता. पळता पळता गाव मागे पडले. गावाच्या बाहेर एक पडका वाडा होता. त्या वाड्यात जाऊन तो लपून बसला. आज शाळेत माझीच चर्चा झाली असेल. शिक्षक-विद्यार्थी, मित्र माझ्याबद्दल काय विचार करत असतील या विचाराने विनय थोडासा विचारात पडला होता. पण हाती घेतलेले कार्य पार पाडायचे, असा त्याने निर्धार केला होता.

विनयच्या बाजूला बसणारा त्याचा वर्गमित्र सुमित घरी पोहोचल्यावर आपल्या आईला विनयबद्दलच सांगू लागला. “विनय असा कधी वागेल असं वाटलं नव्हतं” असंही तो आईला म्हणाला. आईशी बोलता बोलता त्याचा हात खिशाकडे गेला. त्यात त्याला कसलीशी चिठ्ठी सापडली. ही चिठ्ठी आपल्या खिशात कशी आली असा विचार करता करता तो चिठ्ठी वाचू लागला आणि तो जागेवरच उडाला. त्यात लिहिलं होतं, “हे बघ सुमित आज पोलीस मला शोधायला शाळेत आले होते, तेव्हा मी पळून गेलो. पण खरं तर ते आलेले पोलीसच खऱ्या अर्थाने गुन्हेगार आहेत. मी त्यांना एका व्यक्तीला मारताना पाहिले आहे आणि ती व्यक्ती त्यांच्या मारहाणीत मरण पावली आहे. हे सर्व चित्रीकरण मी माझ्या मोबाइलमध्ये करून ठेवले आहे. तो मोबाइल तुझ्या दप्तरातच ठेवलेला आहे. त्यामुळेच पोलीस मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही गोष्ट तू मुख्याध्यापकांच्या कानावर घाल आणि माझा मोबाइलदेखील सरांकडे दे. त्याचा आपल्याला खूप उपयोग होईल. योग्य वेळी मी शाळेत येईनच.”

दुसऱ्या दिवशी ती चिठ्ठी आणि विनयचा मोबाइल सुमितने मुख्याध्यापकांच्या स्वाधीन केला, तेव्हा सर पुटपुटले, “तरी मला वाटलेच होते, विनायक कधीही गैरकाम करणार नाही. तो निर्दोष आहे याची मला खात्री होती.” आता मुख्याध्यापकांनी पोलीस आयुक्त असलेल्या आपल्याच माजी विद्यार्थ्याला थेट फोन लावला आणि घडलेली सर्व कथा त्यांना सांगितली. प्रत्यक्ष भेटीत विनयचा मोबाइलही त्यांनी आयुक्तांच्या स्वाधीन केला. आयुक्तांबरोबर बसून एक प्लान आखला आणि विनयला शाळेत येण्याचा निरोप पाठवला.

तो सोमवारचा दिवस होता. बरोबर ११ वाजता शाळा भरली आणि विनय ठरल्याप्रमाणे शाळेत हजर झाला. त्या आधी पोलीस आयुक्तांनी त्यांचे काही सहकारी गुप्त वेशात शाळेमध्ये काही विशिष्ट ठिकाणी उभे केले होते. इकडे आज विनय शाळेत आला आहे, अशी खबर आयुक्तांच्याच माणसांनी गावातल्या पोलीस स्टेशनमध्ये दिली. ही खबर मिळताच ते दोन पोलीस आपली गाडी घेऊन त्वरित शाळेत दाखल झाले. मुख्याध्यापकांची परवानगी न घेताच ते थेट विनयच्या वर्गात घुसले आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात गुप्त वेशातील पोलीस आणि पोलीस आयुक्त तेथे हजर झाले.

पोलीस आयुक्तांना पाहताच गुन्ह्यात अडकलेले पोलीस हडबडले. इकडे तिकडे पळू लागले; परंतु आयुक्तांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडले आणि चौकशी करून तुरुंगात डांबले. पुढे कोर्टात केस उभी राहिली विनय त्या गुन्ह्यातील एकमेव साक्षीदार होता. त्याने निर्भयपणे कोर्टात पोलिसांच्या विरुद्ध साक्ष दिली. मोबाइलमधले चित्रीकरण सबळ पुरावा म्हणून धरले गेले आणि एका निरपराध नागरिकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. पोलीस आयुक्तांनी, मुख्याध्यापकांनी विनयच्या धाडसाचे तोंड भरून कौतुक केले. ही बातमी हा हा म्हणता साऱ्या गावात पसरली आणि साऱ्या गावाने विनयवर कौतुकाचा वर्षाव केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -