Thursday, March 27, 2025
Homeदेश'तो' क्षण अवघ्या काही तासांवर, रामलल्लाच्या दर्शनाला संपुर्ण देश आतुर...

‘तो’ क्षण अवघ्या काही तासांवर, रामलल्लाच्या दर्शनाला संपुर्ण देश आतुर…

नवी दिल्ली : ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतीक्षा होती, तो क्षण अवघ्या काही तासावर येऊन ठेपला आहे. सोमवारी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. प्राणप्रतिष्ठेआधी सुरु झालेल्या पूजाविधीचा आजचा सहावा दिवस आहे. प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी राममंदिर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजले आहे. रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी प्रत्येक रामभक्त आतूर आहे. या ऐतिहासिक क्षणाचा अवघा देश साक्षीदार होणार आहे. यावेळी अयोध्येमध्ये खास दिपोत्सवही पाहायला मिळणार आहे. प्रभू श्रीरामाची नगरी अयोध्या लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळून निघणार आहे.

१० लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या

राम मंदिरात २२ जानेवारीला रामलल्लांचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अभिषेक सोहळ्यानंतर संध्याकाळी अयोध्या नगरी दिव्यांनी सजवली जाईल. यावेळी अयोध्येत १० लाख दिवे लावण्याची तयारी सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर २२ जानेवारीच्या संध्याकाळी अयोध्या १० लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे. शरयू नदीच्या काठावर मातीपासून बनवलेल्या दिव्यांनी अयोध्या उजळून निघणार आहे. याशिवाय, अयोध्येतील घर, दुकाने, आस्थापना आणि पौराणिक स्थळांवर ‘रामज्योती’ प्रज्वलित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सोहळ्यासाठी ७ हजार १४० निमंत्रक लावणार हजेरी

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ७ हजार १४० निमंत्रक हजेरी लावणार आहेत. शिवाय ११२ परदेशी पाहुणेही या भव्य सोहळ्यात सहभागी होणार आहेत. रामनगरी अयोध्येत १५० चार्टर्ड विमान उतरणार आहेत. मोठ्या व्हिव्हीआयपी घडामोडींमुळे अयोध्यानगरीला छावणीचे रुप आले आहे. येथे जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विना निमंत्रण कुणालाही अयोध्येत परवानगी नाही. याशिवाय अयोध्येवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. दरम्यान, अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांना राममंदिर ट्रस्टतर्फे भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

सीसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून सर्वत्र नजर

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत विशेष महानिदेशक प्रशांत कुमार यांनी माहिती देताना सांगितलं की, ‘आम्ही प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तही असेल. सुमारे १०,००० सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यावेळी पोलीस यंत्रणेत मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून सर्वत्र नजर ठेवली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -