कथा: प्रा. देवबा पाटील
देशमुख सर आठवीच्या विद्यार्थ्यांना “आपल्या पृथ्वीचे वातावरण” प्रकरण शिकवत असत. सरांचे शिकवणेच इतके प्रभावी व रंजक होते की, त्यांचा तास कुणालाच कंटाळवाणा वाटत नसे. त्या दिवशीही सर आले व त्यांनी आपले शिकवणे
सुरू केले. “सर, फटाक्यांतून गंधक वायू कसा काय निघतो?” जयेंद्रने नवीनच शंका काढली.
“फटाक्यांमध्ये गंधक, शोभेची दारू, कोळसा व सोरा असे ज्वालाग्राही पदार्थ ठासून भरलेले असतात. फटाका फुटताना होणाऱ्या गंधकाच्या ज्वलनाने गंधक वायू निर्माण होतो. तो खूप विषारी असतो व हवेचे खूप प्रदूषण करतो. तो शरीरास अतिशय घातक असतो. प्रयोगशाळेत गंधकाम्ल व तांब्याचा किस तापवून गंधक वायू तयार होतो. ज्वालामुखीच्या उद्रेकातही खूपच गंधकवायू असतो.” सरांनी सांगितले. “त्या गंधकवायूची काय वैशिष्ट्ये असतात सर?” वृंदाने प्रश्न केला.
सर म्हणाले, “त्याला रंग नाही पण खवखवणारा वास आहे. तो पाण्यात विरघळतो व ज्वलनास मदत करतो. तो हवेपेक्षा जड असून निळा लिटमस पेपर तांबडा करतो. त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो जंतुनाशक आहे.” “तो कसकसा उपयोगी येतो सर?” कुंदाने माहिती विचारली. “त्यापासून तयार होणाऱ्या द्रवबर्फाचा शीतकपाट गार करण्यासाठी वापर होतो. साखर कारखान्यात साखरेला पांढरीशुभ्र करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. तो रंग घालविणारा विरंजक असल्याने लोकरी, रेशमी कपड्यांना पडणारे रंगांचे डाग घालविण्यासाठी वापरतात,” सरांनी सांगितले. “सर, पाणी शुद्ध करण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणेमध्ये क्लोरीन वायू वापरतात म्हणतात. तो कशापासून बनतो?” सरेंद्राने माहिती विचारली.
सर म्हणाले, “तुम्हाला ज्ञात असलेली माहिती बघून मला खरोखरच आनंद होत आहे. जलशुद्धीकरण प्रक्रियेच्या यंत्रणेमध्ये क्लोरीन वायूचा उपयोग होत असतो हे खरेच आहे. तसा तो ज्वालामुखीतून बाहेर पडतो; परंतु समुद्राच्या मिठात तो बराच आढळतो. त्या मिठाचे विद्युत विघटन केल्याने त्यापासून क्लोरीन वायू तयार होतो.” “त्याची विशेषत: काय आहे सर?” धमेंद्राने प्रश्न केला. “तो रंगाने पोपटी असून त्याला अतिशय उग्र असा वास आहे. तो हवेपेक्षा जड असून पाण्यात मात्र विरघळतो. प्राणवायूशी संयोग करून क्लोरीन रंगांचे विरंजन करतो. तो स्वत: जळत नाही पण त्याला हायड्रोजनसोबत चेतविल्यास त्याचा त्वरित स्फोट मात्र होतो. धातू-अधातूंशी संयोग करून तो त्याचे क्लोराईड्स बनवतो,” सरांनी सांगितले. “त्याचे उपयोग काय आहेत सर?” सुनंदाने उपयोग विचारले.
सर म्हणाले, “तो विरंजक असल्याने रंगीत पदार्थांचे रंग घालवतो. म्हणून कागद व कापड पांढरे करण्यासाठी त्या कारखान्यांमध्ये त्याचा वापर करतात. तो पाण्यातील जंतू मारतो म्हणून जल शुद्धीकरणासाठी त्याचा उपयोग होतो.” “आम्हाला द्रव हवेबद्दल काही माहिती सांगा ना सर?” सुनंदानेच पुन्हा म्हटले. “हवा जरी अनेक वायूंचे मिश्रण असली तरी तीत जास्त प्रमाणात नायट्रोजन व ऑक्सिजनच असतो हे आपण बघितलेच आहे. या हवेवर भरपूर दाब दिल्यास तिचे द्रवात रूपांतर होते. हवेच्या या द्रवस्थितीलाच द्रव हवा असे म्हणतात. ही द्रव हवा उच्च दाबाखाली पोलादी नळकांड्यात भरून ठेवतात. तसेच या द्रव हवेतील ऑक्सिजन वेगळा करून त्याचीसुद्धा वेगळी अशी ऑक्सिजनची नळकांडी भरून ठेवतात.” सरांनी स्पष्टीकरण दिले.
“या द्रवहवेच्या नळकांड्यांचा काय उपयोग होतो सर?” जयेंद्राने प्रश्न केला. सर म्हणाले, “ही द्रव हवेची नळकांडी समुद्रातील पाणबुडे, विमानांचे पायलट, प्रवासी, गिर्यारोहक श्वसनासाठी वापरतात. एवढेच काय तर अंतराळवीरही हीच नळकांडी श्वसनासाठी वापरतात. रुग्णालयात गंभर रुग्णांसाठी ऑक्सिजनची नळकांडी श्वसनासाठी वापरतात.” नेहमीप्रमाणे सरांचा तास संपला व सरांची माहिती अपूर्णच राहिली. सर्व मुले आनंदात असतानाच त्यांच्या आनंदावर विरजण पडले. सरांनी आपला गाशा गुंडाळला व दुसऱ्या वर्गाचा तास घेण्यासाठी तिकडे प्रयाण केले.