मुंबई : अयोध्येत रामलल्लांच्या अभिषेकासाठी श्री रामजन्मभूमी ट्रस्टने या सोहळ्यासाठी देश-विदेशातल्या दिग्गजांना निमंत्रणे पाठवली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत या तिघांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
मंदिर समितीने केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मोठे नेते, राम मंदिरासाठी आंदोलन करणारे कारसेवक, खेळाडू, कलाकार आणि साधू-संतांसह मुंबईतल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही या सोहळ्याचे निमंत्रण पाठवले आहे.
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून या निमंत्रणाबाबतची माहिती दिली आहे. त्याचबरोबर मंडळाचे पदाधिकारी या सोहळ्यासाठी अयोध्येला रवाना झाले आहेत. मंडळाने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, लालबागच्या राजाला अयोध्येतून बोलावणे आल्याने मंडळाचे अध्यक्ष या सोहळ्यासाठी अयोध्येला रवाना झाले आहेत.