Tuesday, April 22, 2025

हमरस्ता

प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ

‘टर्की’मधल्या एका गावात चारशे पन्नास मेंढरांनी एका उंच कड्यावरून उडी मारून आत्महत्या केली, असे वृत्त प्रसिद्ध झाले. मग मेंढरं आत्महत्या करू शकतात का?, यावर चर्चा घडल्या आणि जे वृत्त समोर आले त्यानुसार असे लक्षात आले की मेंढरं कळपाने राहतात. त्या कळपातले जे सर्वात पुढचं मेंढरू असेल त्या मेंढराला सगळे ‘फॉलो’ करतात म्हणजे त्याच्या मागे मागे जातात. आता पहिला मेंढरू डोंगरावरून पडल्यामुळे इतरांनी आंधळेपणाने त्याच्या मागे जाणे पसंत केले आणि ते सर्व पडून मेले. ‘या मेंढाने उडी मारली की ते चुकून पडले’ यावर विचार होऊन असे लक्षात आले की, ते धक्क्याने चुकून पडले. आता या कळपात फक्त चारशे पन्नास मेंढरं नव्हती, तर दीड हजार मेढरं होती. ती या मेंढंरांवर पडल्यामुळे वाचली इतकेच!

हे फॉरवर्डेड व्हीडिओच्या भाषणातून ऐकले. माझ्या लक्षात आले की, आपलेसुद्धा हेच होत चालले आहे. आपण सोशल मीडियावर पाहतो की एखाद्या गाण्यावरचा व्हीडिओ जेव्हा प्रसिद्ध होतो, तेव्हा इतरही त्याच गाण्यावर किंवा त्याच स्वरूपाचे व्हीडिओ बनवू लागतात. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे म्हणजे ‘माझ्या पप्पांनी गणपती आणला…’ या गाण्यावरचा व्हीडिओ खूप गाजला. अनेकांनी त्याचे अनुकरण करत, कधी विडंबन करत हजारो व्हीडिओ तयार केले, गंमत म्हणजे तेही व्हीडिओ गाजले. पण प्रत्येक वेळेस असे होईलच असे नाही.

कोणीतरी केलेला ढोकळा पाहून मीही केला, तर माझ्याकडे पाहुणे म्हणून आलेला मित्र थट्टेने म्हणाला की अरे हा तर ‘च्युईंगम ढोकळा’ आहे. त्याने त्याचे यथायोग्यच नाव दिले होते. हे वाचून आपल्याला असे अनेक फसलेले पदार्थ, फसलेले प्रसंग आणि मुख्य म्हणजे फसलेले नातेसंबंध नक्कीच आठवतील! कितीतरी वेळा कधी विचार न करता केलेले किंवा खूप खोल विचाराने केलेलेसुद्धा अनुकरण तोंडघशी पडते. पैसा आणि वेळ वाया जातो. मानसिक त्रास होतो तो वेगळाच!

शाळेतलेच उदाहरण द्यायचे म्हणजे ९०% विद्यार्थी सहज दिसतो म्हणून समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पेपरमध्ये वाकून बघत असतो. ‘कॉपी करणे’ हा त्याचा खूपदा उद्देशही नसतो; परंतु अंडरलाइन केलेल्या अशा गाळलेल्या जागी त्या विद्यार्थ्यांने लिहिलेले शब्द सहज दिसतात, तेव्हा आपण जे लिहिलंय ते चुकीचे वाटू लागते. त्याने जे लिहिले ते बरोबर वाटू लागते आणि मग आपण जो शब्द लिहिला आहे, तो खोडून त्या जागी त्याने लिहिलेला शब्द लिहितो. आता परत हेच म्हणायचे आहे की, प्रत्येक वेळेस तो शब्द बरोबरच असतो, असे नाही कधी कधी आपण लिहिलेला शब्दही बरोबर असायची शक्यता असते.

शक्यता-अशक्यता यावर खूप लिहिता येईल. पण एक गोष्ट निश्चितपणे मला इथे मांडायला आवडेल की, बहुतेक लोक (मीसुद्धा) स्वतःबद्दल कोणताही निर्णय घ्यायला घाबरतात. चार लोकांबरोबर त्या गोष्टीबद्दल बोलतात. कधी कधी या चार लोकांची चार वेगवेगळी मतेही असू शकतात आणि मग आपण संभ्रमित होतो. या संभ्रमित अवस्थेत आपण कोणतातरी निर्णय घेतो जो बरोबर असतो किंवा चुकीचा ठरू शकतो.

आपण जीवनामध्ये कोणताही निर्णय शंभर टक्के स्वतःच्या मनाने घेण्याची गरज आहे. पण त्या आधी इथे सर्व शक्यता-अशक्यतेचा विचार करण्याची गरज आहेच. आपल्या ओळखीपाळखीचे किंवा नातेवाईक यांना आलेल्या अनुभव विचारात घेणे गरजेचे आहे. मी म्हणत नाही की, रुळलेल्या वाटेवरून चालू नये, पण रुळलेल्या वाटेवरून चालताना स्वतःचीही छोटीशी का होईना पायवाट अधूनमधून घेऊन बघायला काय हरकत आहे? तिचा आपल्याला फारसा उपयोग नाही झाला, तर सोडूनही देता येते. पण न जाणो आपण निर्माण केलेली ही छोटीशी पायवाट कधी अनेकांसाठी हमरस्ता होऊन जाऊ शकतो!

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -