हिवाळ्यात उत्तर भारतीय नागरिक नॉनव्हेजला म्हणजेच मांसाहाराला प्राधान्य देतात. नॉनव्हेज खाद्यपदार्थांमध्ये मटणाची क्रेझ जास्त आहे. सामान्यपणे हिवाळ्यात अंडी, चिकन आणि मटणाच्या मागणीत लक्षणीय वाढ होते. या सर्वांमध्ये सर्वाधिक क्रेझ मटणाची असते. शेळी आणि बोकडाच्या मांसाला मटण म्हटलं जातं; पण तांत्रिकदृष्ट्या मेंढीच्या मांसालादेखील मटण म्हणतात. हे मांस रेड मीटच्या श्रेणीत येतं. त्यात भरपूर प्रमाणात आयर्न, प्रोटीन्स आणि इतर व्हिटॅमिन्स असतात. रिसर्चनुसार, 100 ग्रॅम मटणात 33 ग्रॅम प्रोटीन असतं. यातून व्यक्तीच्या दैनंदिन गरजेपैकी 60 टक्के प्रोटीनची पूर्तता होते. यासोबतच यामध्ये आयर्न, झिंक आणि व्हिटॅमिन बी12 चं प्रमाणही खूप चांगलं असतं. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ मटणाला, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि चांगल्या दर्जाच्या प्रोटीनचा उत्तम स्रोत मानतात. नियमित मटण खाल्लाने शरीरात ऊर्जा आणि शक्ती टिकून राहते.
किती मटण खावं?
रेड मीट हे प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा उत्कृष्ट स्रोत असतं; पण याचा अर्थ असा नाही की ते जास्त प्रमाणात खाल्ल पाहिजे. ब्रिटिश सरकारच्या nhs.uk या हेल्थ वेबसाइटनुसार, एखाद्या निरोगी प्रौढ व्यक्तीने दररोज साधारणपणे 70 ग्रॅमपर्यंत रेड मीट खाल्लं पाहिजे. मांसामध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण खूप जास्त असतं. अशा परिस्थितीत याचं नियमित आणि जास्त प्रमाणात सेवन केलं तर रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण खूप वाढू शकतं. हे टाळण्यासाठी संतुलित प्रमाणात मांसाचं सेवन केलं पाहिजे. असं केल्यास शरीराला हानी न होता प्रोटीन आणि इतर जीवनसत्त्वांच्या गरजा पूर्ण होतील. जास्त प्रमाणात मांस खात असाल तर आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. ब्रिटनमध्ये या कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांची संख्या फार जास्त आहे.
मटणातला कोणता भाग सर्वांत चांगला?
पुण्यातल्या डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधल्या डॉ. अनुप गायकवाड यांनी quora.com वर या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, की ‘तुम्हाला मटण आवडत असेल, तर सर्वप्रथम तुम्ही ज्या शेळीचं किंवा बोकडाचं मांस खरेदी करत असाल त्याचं वय लक्षात घ्यावं. संबंधित प्राणी जास्त लहान किंवा जास्त म्हातारा नसावा. सरासरी 8 ते 10 किलो वजनाचा प्राणी उत्तम असतो. मटणाच्या रंगावरून आपल्याला बरीच माहिती मिळू शकते. गुलाबी रंगाचं मांस सर्वोत्तम असतं. याशिवाय, मटण करी शिजवायची असेल तर लहान तुकडे करावेत. कारण, मोठे तुकडे शिजण्यासाठी वेळ जास्त लागतो आणि त्याची चवही चांगली लागत नाही. मटणात पुरेशा प्रमाणात हाडंदेखील असावीत. हाडांसह असलेलं मांस चांगलं असतं. त्यामुळे मटण खरेदी करताना त्यात मांस आणि हाडांचं प्रमाण 70:30 असेल याची खात्री करा.’