विशेष: प्रमोद मुजुमदार, अयोध्या
देश-विदेशांतील समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या अयोध्येत आकाराला येणारे भव्य राम मंदिर अनेकार्थाने अविस्मरणीय असून लोकांच्या मनात निवास करणाऱ्या रामाला त्याच्या जन्मभूमीत हक्काचे स्थान मिळत असल्याचा वेगळा उत्साह आणि आनंद जनमानसात दिसून येत आहे. हा अनेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या लढ्याचा सुखद आणि साजिरा अंत आहेच; खेरीज कारसेवकांच्या बलिदानाला केलेले नमनही आहे. रामलल्लाच्या या भव्य मंदिराची नानाविध वैशिष्ट्ये आहेत. ती जाणून घेतली तर ही वास्तू किती तयारीनिशी उभी राहत आहे, हे सहज लक्षात येईल.
पहिली बाब म्हणजे या मंदिरापासून काही अंतरावर एक टाइम कॅप्सूल जमिनीत गाडली गेली आहे. यामुळे काही वर्षांनंतरही पुढच्या पिढ्यांना मंदिर उभारणीबद्दलची सविस्तर माहिती मिळणे शक्य होईल. हे मंदिर विटांनी बांधले जात असून त्यावर ‘श्री राम’ हे नाव कोरलेले आहे. मंदिर उभारताना काही जुन्या विटांचा वापर केला गेला. त्यांना ‘राम शिला’ असे संबोधले जाते. रामलल्लाचे हे मंदिर प्राचीन पद्धतीने बांधले जात असल्यामुळे त्यात कुठेही स्टील किंवा लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही. लोखंडाऐवजी तांबे, पांढरे सिमेंट आणि लाकूड यांसारख्या इतर घटकांचा वापर करण्यात आला आहे. सोमपुराच्या वास्तुविशारदाने या मंदिराची रचना केली आहे. सोमपुराचे हे कुटुंब हजारो वर्षांपासून मंदिर आणि इमारत बांधकामात पारंगत आहे. या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी वापरले जाणारे प्रत्येक साहित्य विशेष महत्त्व राखून आहे. उदाहरणार्थ, हनुमानाचे जन्मस्थान असणाऱ्या कर्नाटकमधील अंजनी टेकडीवरील दगड आणून मंदिर उभारणीसाठी वापरण्यात आला आहे. तब्बल २,५०० पेक्षा अधिक ठिकाणांवरून गोळा केलेली माती मंदिरासाठी वापरली जात आहे. मंदिर उभारणीच्या कार्यात देशातील विविध नद्यांच्या पाण्याचा वापर होत आहे.
मंदिर उभारणीतील काही महत्त्वपूर्ण टप्प्यांवर पार पडलेल्या मंगल कार्यावेळी पवित्र पाण्याचे मिश्रण वापरले गेले असून त्यात तीन समुद्र, आठ नद्या आणि श्रीलंकेतून आणलेली माती यांच्या मिश्रणाचा समावेश होता. याव्यतिरिक्त त्यात मानसरोवरचे पाणीदेखील समाविष्ट होते. खेरीज पश्चिम जैंतिया हिल्समधील ६०० वर्षे जुन्या दुर्गा मंदिरातील पाणी, मिंटंग आणि मिंटू येथील नदीचे पाणी देखील पवित्र जलमिश्रणाचा भाग होते. या सगळ्यांबरोबर मंदिराच्या कामासाठी देशातील काही स्वच्छ तलावांमधील पाण्याचा वापरही लक्षवेधी ठरत आहे. २,५८७ भागांमधून आलेल्या पवित्र मातीचा वापर करून मंदिराचा पाया भक्कम करण्यात आला आहे. झाशी, बिथुरी, यमुनोत्री, हल्दी घाटी, चित्तोडगड, शिवाजी किल्ला, सुवर्ण मंदिर आणि इतर अनेक पवित्र स्थळे त्याच्या पायाभरणीत योगदान देतात. या मंदिराच्या बांधकामासाठी भारतातील लोकांनी सढळ सहकार्य केले. साहजिकच मंदिराच्या बांधकामासाठी संपूर्ण भारतातून सोन्या-चांदीच्या विटा आल्या आहेत. त्यांचा वापरही भाविकांचे लक्ष वेधून घेणारा ठरेल. हे संपूर्ण मंदिर वास्तुशास्त्र लक्षात घेऊन बांधण्यात आले आहे.
रामलल्लाच्या मंदिरात भगवान रामाव्यतिरिक्त अनेक देवी-देवतांच्या मूर्ती बसवल्या जाणार आहेत. इथे १० हजारांहून अधिक भाविकांना एकाच वेळी रामलल्लाचे दर्शन घेण्याची सोय करण्यात आली आहे. राम मंदिराच्या मजल्यांची उंची १२८ फूट, लांबी २६८ फूट आणि रुंदी १४० फूट आहे. मंदिराच्या तळमजल्यावर तसेच सभोवतालच्या भिंतींवर भगवान रामाची कथा, त्यांचे चरित्र चित्रित केले जात आहे. भूकंपाच्या दृष्टीने उत्तर प्रदेश संवेदनशील झोन-४ मध्ये येतो. मात्र अयोध्येसह अवधचा हा भाग झोन तीनमध्ये आहे. इतर भागांच्या तुलनेत येथे धोका कमी आहे. त्यामुळेच अणुभट्टीच्या मोजमापानुसार आठ ते दहा रिष्टर स्केलचा भूकंप सहन करण्यास राम मंदिर सक्षम करण्यात आले आहे.
रचनेचा विचार केला तर हे राम मंदिर भारतातील सर्वात मोठे मंदिर असणार आहे. २८ हजार चौरस फूट क्षेत्रफळ असणाऱ्या मंदिराची १६१ फूट उंची याची साक्ष देण्यास पुरेशी आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर भगवान रामाच्या दरबाराचे चित्रण असेल. मंदिराच्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे या बांधकामात गुलाबी वाळूचा दगड वापरण्यात आला असून तो राजस्थानमधील भरतपूर येथून आणण्यात आला आहे. मंदिरातील ३६० खांब खास नागरा शैलीनुसार घडवण्यात आले आहेत. प्रभू रामाचे पवित्र जन्मस्थान असणारी अयोध्या सप्तपुरींपैकी एक असल्याचे आपण जाणतो. अयोध्येव्यतिरिक्त मथुरा, माया (हरिद्वार), काशी, कांची, अवंतिका (उज्जयिनी) आणि द्वारका यांचा पवित्र सप्तपुरींमध्ये समावेश होतो.
मंदिर उभारणीबाबत ही सर्व माहिती जाणून घेत असताना प्रत्यक्ष श्रीराम मूर्तीविषयीदेखील भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. वेगळी बाब म्हणजे यासाठी एकूण तीन मूर्ती तयार केल्या जात आहेत. श्री रामलल्लाची मूर्ती ही बाल अवस्थेतील असेल. तयार झालेल्या तीनपैकी एक मूर्ती निवडली जाईल. आधीच बाल अवस्थेतील रामलल्लाची मूर्ती अयोध्येत असताना नवीन मूर्ती का तयार केली, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे कारण बघायचे झाल्यास श्री रामलल्ला अयोध्येत प्रकट झाले अशी १९४७ पासूनची श्रद्धा आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपातील मंडपात रामलल्लाच्या मूर्तीची पूजा १९४७ पासून सुरूच आहे. मात्र नव्याने उभारल्या जाणाऱ्या मंदिरात श्री रामाच्या दर्शनासाठी येणारे भाविक किमान २५ ते ३० फुटांवरून दर्शन घेणार आहेत. त्यामुळे इतक्या लांबून दर्शन व्यवस्थित घेता यावे यासाठी मोठ्या मूर्तीची आवश्यकता आहे हे लक्षात आल्याने ही दुसरी मूर्ती घडवण्यात आली आहे.
श्री रामाची उभी मूर्ती भाविकांना दुरूनही दिसू शकेल. अर्थात आधीची प्राचीन मूर्तीदेखील गर्भगृहातच ठेवली जाणार आहे. नवी मूर्ती अचल असून ती कायम गर्भगृहातच राहील. दुसरी मूर्ती मात्र उत्सव मूर्ती असेल. म्हणजेच कोणत्याही उत्सवासाठी ट्रस्टने मूर्तीची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला, तर या उत्सव मूर्तीची मिरवणूक काढण्यात येईल. अशा पद्धतीने दोन्ही मूर्ती गर्भगृहातच राहतील. या दोन्ही मूर्तींची दैनंदिन पूजा आणि नित्योपचार भक्तिभावाने पार पडतील. देवासमोर डोके टेकवल्यानंतर भाविकांना दोन्ही मूर्तींचे दर्शन घडेल.
भाविकांच्या मनात अढळस्थानी असणाऱ्या लाडक्या रामाची प्रतिमा पाषाणातून साकारणे हे निश्चितच सोपे काम नव्हे. ही प्रक्रिया खूप तांत्रिक आहे. मूर्ती बनवण्यासाठी वापरले जाणारे पाषाण वैशिष्ट्यपूर्ण असावे, त्यात काही रासायनिक गुणधर्म असावेत असा निकष होता. उदाहरणार्थ, पाषाण पाणी शोषणारे नको होते. खेरीज वातावरणातील कार्बनसोबत त्याची रासायनिक प्रक्रिया होऊनही चालणार नव्हते. अन्यथा, मूर्तीवर परिणाम होण्याचा धोका वाढला असता. असे विविध निकष लावून वेगवेगळे पाषाण जमा करण्यात आले. जयपूर, दक्षिण भारतातील काही ठिकाणांहून ते आणले गेले. या सर्वांची चाचणी कर्नाटकमधील म्हैसूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स या संस्थेद्वारे करण्यात आली. त्यानंतर जयपूरमधील मार्बल आणि कर्नाटकमधील दोन भागांतील कृष्णशीला निवडण्यात आल्या. हे तिन्ही पाषाण तीन वेगवेगळ्या मूर्तिकारांना देण्यात आले. अत्यंत गोपनीय पद्धतीने हे काम सुरू होते. जनतेला या ठिकाणी भेट देण्यास मज्जाव होता. कोणतेही फोटो, व्हीडिओ काढण्याची परवानगी नव्हती. अशा प्रकारची गोपनियताही रामलल्लांच्या दर्शनाची आतुरता वाढवणारी ठरणार आहे.
एकंदर मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहेच, पण संरक्षक भिंतदेखील तितक्याच काळजीपूर्वक उभारली जात आहे. या संरक्षक भिंतींच्या कामाची किंमतच मंदिराच्या उभारणीसाठी खर्च केलेल्या किमतीपेक्षा दोनशे कोटी रुपयांनी अधिक आहे. यावरूनच तिच्या मजबुतीची कल्पना करता येईल. हे संरक्षक आवार एखाद्या कॉरिडॉरसारखे आहे. यामुळे पश्चिम दरवाजा सोडला तर मंदिरात कोणीही कुठूनही आत येऊ शकणार नाही. याशिवाय सध्या कुबेर, जटायू मूर्तीचे कामदेखील सुरू आहे. ब्राँझ धातूचा वापर करून १५ फूट उंच आणि २० फूट लांब जटायू मूर्ती साकारण्यात आली आहे.
श्री राम मंदिराच्या दिशेने पाहत असलेली ही मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेईल. प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांनी ही मूर्ती साकारली आहे. मंदिरात जवळपास ३९० खांब असून प्रत्येक खांबावर जवळपास ३० मूर्ती कोरलेल्या आहेत. ओरिसामधील कुशल कारागिरांनी हे कोरीव काम केले आहे. दगडी कामासाठी राजस्थानहून कुशल कारागीर आले आहेत. थोडक्यात, वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून कुशल कारागीर बोलावण्यात आले आहेत. यामध्ये पश्चिम भारत, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमधून आलेल्या कामगारांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या सगळ्यांच्या अथक प्रयत्नांतून साकार होणारी ही भव्य वास्तू भारताची ओळख न ठरेल, तरच नवल.