
रेल्वेकडून अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मध्य (Central Railway) व हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गांवर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मुंबई लोकलचं वेळापत्रक (Mumbai Local Timetable) पाहूनच घरातून बाहेर पडण्याची विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच या दरम्यान प्रवाश्यांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीरी देखील व्यक्त करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेवरील मुलुंड ते माटुंगावर ब्लॉक घेतला जाणार आहे. मुलुंड - माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्याच स्थानकांनुसार थांबून माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
तर हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशीहून १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कुर्ला आणि पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी हा काही प्रमाणात दिलासा आहे.