कामगार वसाहतीचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी झाले भावूक
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज देशातील सर्वात मोठ्या कामगार वसाहतीचे (Labour colony) उद्घाटन करण्याकरता सोलापुरात (Solapur) दाखल झाले. यावेळी त्यांनी अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. ३० हजार घराचे लोकार्पण करण्यात आले. ३० हजार डेमो फ्लॅटची पाहणी करण्यात आली. तसेत १० लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आले. अमृत योजनेतून १७०० कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी मोदींनी केली. यावेळेस भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी भावूक झाले. तसेच लहानपणी मलाही अशा घरात राहण्याची संधी मिळायला हवी होती, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत बोलत पंढरपुरचा विठ्ठल आणि सिद्धेश्वर यांना नमस्कार केला. मोदी म्हणाले, रामाचे २२ जानेवारीला आपल्या घरात आगमन होणार आहे. संतांच्या मार्गदर्शनानुसार मी विशेष व्रत करत आहे. महाराष्ट्रातील नाशिक येथील पंचवटीच्या भूमीतून त्याची सुरुवात झाली हाही योगायोगच म्हणावा लागेल. रामभक्तीच्या वातावरणात आज १ लाखापेक्षा जास्त कुटुंबाचा गृहप्रवेश होत आहे याचा मला खूप आनंद होत आहे. मला आनंद आहे की हे कुटुंब आपल्या पक्या घरात राम ज्योती प्रज्वलित करणार आहेत.
सोलापुरातील कामगारांना घरं मिळालं. महाराष्ट्रातील लोकांमुळे महाराष्ट्राचा विकास झाल्याचे मोदी म्हणाले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, मला वाटते की मलाही अशा घरात राहण्याची संधी मिळाली असती तर… एवढ्या लोकांचे स्वप्न पूर्ण होत आहे. ह्या गोष्टी मी पाहतो तेव्हा मला खूप आनंद होतो.
नरेंद्र मोदी म्हणाले, माझं आणि सोलापुरचं जुनं नातं आहे. हातमाग कामगार, विक्रेते, यंत्रमाग कामगार, चिंधी वेचणारे, विडी कामगार, चालक अशा लाभार्थ्यांना पीएमएवाय-अर्बन योजनेंतर्गत तयार केलेल्या घरांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले.
२२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या सोहळ्याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “हा काळ आपल्या सर्वांसाठी भक्तीचा आहे. तो ऐतिहासिक क्षण २२ जानेवारीला येणार आहे, जेव्हा आपले प्रभू राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. मंदिरात आपल्या मूर्तीचे दर्शन घेण्याचे अनेक दशकांचे दुःख आता दूर होणार आहे”, असं मोदी म्हणाले.