मधुसूदन जोशी(मुंबई ग्राहक पंचायत)
आपल्या दैनंदिन जीवनात बऱ्याचदा अपघात घडतात. त्याची दाद मागताना आपण ग्राहक म्हणून दाद मागतो की सामान्य नागरिक म्हणून दाद मागतो, हा मुद्दा गौण आहे. अपघातास जबाबदार असणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्याविरोधात दाद ही मागायलाच हवी. याच आनुषंगाने अपघात आणि त्यानिमित्ताने लागलेले निवाडे याचा आपण ऊहापोह करू या.
तक्रारदार मोहम्मद हबिबुल्लाह शरीफ हे आपल्या भावासह मशिदीतून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या भावाला लोंबकाळणाऱ्या एका इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागून त्यांचे निधन झाले. तक्रारदाराने याविषयी आंध्र प्रदेश विद्युत मंडळास याबद्दल जाब विचारला व त्यांच्या भावाचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचा शवविच्छेदन अहवाल सुद्धा सादर केला. तक्रारदाराने राज्य ग्राहक आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल करून सेवेतील त्रुटीबद्दल दाद मागितली.
सदर विद्युत मंडळाने यास तीव्र विरोध करीत असे नमूद केले की, हे तक्रारदार विद्युत मंडळाचे ग्राहक नसून यात त्यांच्या कोणत्याही सेवेतील त्रुटी नाहीत, सबब सेवेतील त्रुटींबाबत त्यांना जबाबदार धरता येणार नाही. आदल्या दिवशी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे झाडाची एक फांदी तुटून विजेच्या तारेवर पडली व त्यायोगे तार तुटून लोंबकळत होती, जो एक निसर्गाचा कोप असून सेवेतील त्रुटी नाही आणि या अपघाताबद्दल त्यांनी मृत व्यक्तीच्या नातेवाइकास नुकसानभरपाईची रक्कम देऊ केली आहे. राज्य ग्राहक आयोगाने तक्रारदाराची तक्रार अंशतः मान्य केली. या निवाड्याविरुद्ध दोन्ही पक्षकारांनी राष्ट्रीय ग्राहक आयोगापुढे अपील दाखल केली.
तक्रारींचे तथ्य : तक्रारदार हे ग्राहक म्हणून या प्रकरणी दाद मागू शकतात आणि हे प्रकरण सेवेतील त्रुटी म्हणून पाहता येईल का? विद्युत मंडळाचे असे म्हणणे होते की, तक्रारदार व विद्युत मंडळ यांच्यात याबाबत कोणताही करार नाही, त्यामुळे त्यांच्या तक्रारीची दाखल घेऊ नये. या विषयी आयोगाने, सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या काही निवाड्यांचा अभ्यास केला व आपला निवाडा करताना असे म्हटले की, तक्रारदारांच्या तक्रारीत विशेष तथ्य नाही. परिणामी राष्ट्रीय आयोगाने नुकसानभरपाईची रक्कम रु. १८ लाखांवरून रु. १२ लाख इतकी ठरविली.
आता अशाच प्रकारचे दुसरे प्रकरण पाहू. छत्तीसगढ राज्य विद्युत वितरण कंपनीने केनापल्ली खेड्यातील फिरंतू राम लहेरे यांना घरगुती विद्युत जोडणी दिली होती. मुकेश सत्नामी यांच्या पत्नी रुक्मणीबाई या त्या विद्युत जोडणीच्या ग्राहक आहेत. ग्राहक म्हणून या तक्रारदाराने विद्युत कंपनीने दिलेली न्यूट्रलची वायर तुटलेली असून सदोष असल्याबद्दल दिनांक १८ मे २०१५ रोजी विद्युत मंडळाकडे तक्रार दाखल केली; परंतु विद्युत मंडळाने याबाबत कोणतीच कार्यवाही केली नाही. फिरंतू राम यांच्या पत्नीने दिनांक १९ मे २०१५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास कुलर चालू केला. त्या कुलरमधून सदोष न्यूट्रल वायरमुळे विद्युत प्रवाहाचा झटका लागून त्या बेशुद्ध झाल्या, त्यांना दवाखान्यात नेले असता मृत घोषित करण्यात आले. याबाबत खर्शिया पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली व शवविच्छेदनाचा अहवाल सुद्धा जोडण्यात आला. ज्यात सदर महिलेचा मृत्यू हा विजेच्या धक्क्याने झाल्याचे म्हटले होते. याबाबत जिल्हा ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल करताना मृत महिलेचे पती व मुलांनी म्हटले की, ही विद्युत मंडळाच्या सेवेतील त्रुटी असून, त्याबाबत आणि दाव्याचा खर्च अशी एकूण रु. १६,७७,००० इतक्या रकमेच्या नुकसानभरपाईची मागणी केली.
याबाबत विद्युत मंडळाने आपले म्हणणे मांडताना असे म्हटले की, तक्रारदाराने सदोष वायरबद्दल कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, जी तक्रार दिसते ती खोटी आहे. न्यूट्रल वायर तुटल्याबद्दल तक्रारदाराने कधीच कळवले नव्हते. जिल्हा आयोगाने या दाव्याचा निर्णय देताना तक्रारदारास ५,५८,००० रुपये इतकी नुकसानभरपाई सेवेतील त्रुटींबद्दल देण्याचे आदेश विद्युत मंडळास दिले. ज्यावर ९% दराने व्याज देण्यास तसेच रु. २०००/- हे तक्रारीच्या दिनांकापासून देण्याचे आदेश दिले. ही रक्कम तक्रारदारास एका महिन्याच्या आत द्यायला सांगितले. याविरुद्ध विद्युत मंडळाने राज्य ग्राहक आयोगाकडे अपील दाखल केले; परंतु राज्य आयोगाने हे अपील १ मार्च २०१७ रोजी अपील फेटाळून लावले व जिल्हा आयोगाचा निर्णय कायम केला. याविरुद्धच्या राष्ट्रीय आयोगाकडे अपिलाचा निवाडा ही विद्युत कंपनीच्या विरोधात गेला.
राष्ट्रीय आयोगाने म्हटले की, ही निश्चितच सेवेतील त्रुटी आहे. तक्रारदाराने केलेल्या सदोष वायरबद्दलच्या तक्रारीनंतर विद्युत कंपनीने त्यावर योग्य कार्यवाही करणे अपेक्षित होते, ती त्यांचीच जबाबदारी होती, तक्रारदार याबाबत कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडून ही दुरुस्ती करून घेऊ शकत नाही. तसेच निर्दोष आणि सलग विद्युतपुरवठा करणे ही जबाबदारी विद्युत मंडळाची असून, आयोगाने विद्युत मंडळाचा दावा फेटाळत जिल्हा आयोगाचा निर्णय कायम केला. ग्राहक आयोगाकडे दाखल झालेल्या तक्रारींचा योग्य निवाडा होतो, पण ग्राहकांनी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आयोगाकडे आपल्या तक्रारी योग्य पद्धतीने आणि तथ्यांसह मांडल्या पाहिजेत. त्याचा योग्य तो पाठपुरावा केला पाहिजे.