Saturday, September 21, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यअवकाळीच्या संकटाने आंबा, काजू कोमेजला...!

अवकाळीच्या संकटाने आंबा, काजू कोमेजला…!

माझे कोकण: संतोष वायंगणकर

गेल्या काही वर्षांत पाऊस वर्षभरात केव्हाही कोसळतो, त्यामुळे शेतकऱ्याला स्वत:च्या शेतीकामाचे असे कोणतेच आडाखे बांधता येत नाहीत. हवामानातील सतत होत असलेल्या बदलांचा परिणाम हा अशा पद्धतीने होत असतो. यामुळे कोकणात अवकाळीच्या संकटाने आंबा, काजू कोमेजल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. महाराष्ट्रातील इतर भागांतही शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत आणि कोकणातील शेतकऱ्यांना कोणतेच प्रश्न किंवा समस्या नाहीत, असे मुळीच नाही. यामुळे कोकणातील शेतकऱ्याचे कोणत्याही पिकाचे कितीही नुकसान झाले, तरीही तो कधीही रस्त्यावर कोणतीच फळ, भाजीपाला टाकत नाहीत. सरकार कोकणातील शेतकऱ्यांना काय देणार याची साधी प्रतीक्षाही कोकणातील शेतकरी कधी करीत नाही. तर जरी निसर्गचक्रात एखादवेळ नुकसान झालेले असले, तरीही येणाऱ्या आणि आलेल्या संकटावर पाय देऊन नव्या उमेदीने उद्याच्या आशा घेऊन उभं राहण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणून त्याच्या मनात कधी आत्महत्येचा विचारही येत नाही. कोकणात आपल्या गरजा आणि अपेक्षा याची अचूक सांगड घातलेली असते. नको त्या, नको तितक्या अपेक्षा येथे कोणीच करीत नाहीत, यामुळे अपेक्षा भंगाचं दु:ख येत नाही, पदरी निराशा होत नाही.

कोकणातील तरुणाईला शेतात काम करायला नको, असे म्हटलं जायचे, परंतु आज कोकणातील रायगड ते बांदा या भागात शेतात कष्ट करताना तरुण दिसतात. हंगामात उत्पादित होणारी फळबागायतीकडेही तरुण वळला आहे. परिस्थिती अनुकूल असो किंवा प्रतिकूल…, परंतु कोकणातील शेतकरी कधी डगमगत नाही. एखाद्या शेतकऱ्याचं झालेलं नुकसान तो कधी आपल्या शेजाऱ्यालाही कळू देत नाही. प्रत्येक व्यक्तीची बाजारात असणारी पतही त्याची स्वत:ची असते. ‘इमेज’ जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. येथे कर्ज घेतात ती कर्ज प्रामाणिकपणे परतफेड करण्यासाठीच, बँकांना तोट्यात आणण्याचा अविचार कधी इथल्या माणसांच्या मनापाशीही येत नाही. नाईलाज असेल, आर्थिक स्थितीने डबघाईला आलेल्या एखाद्या वेळेत परतफेड करता येत नसली, तरीही त्याला मनापासून पैसे द्यायचे असतात. पैसे डुबवून फसवणूक करायची नसते; परंतु पैसे वेळेत उपलब्ध होत नाहीत आणि मग पैसे देता येत नाहीत या विचाराने तो काळजीत असतो. ही काळजी आणि पैसे वेळेत देता येत नसल्याची खंत त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर सहज दिसते. कोकणातील शेतकरी नुकसान होऊनही कधी शासनाने नुकसानभरपाई द्यावी म्हणून आग्रही नसतो. मंत्रालयात मंत्र्यांच्या गाठी-भेटी तो घेत नाही, तर जो काही शासन निर्णय होईल त्यातून जे काही मिळेल त्यावर समाधानी असतो.

कोकणातील शेतकरी तर कधीच हतबल होत नाही. आंदोलनात स्वत:च्याच शेती-बागायतीत पिकवलेली फळं, भाजीपाला कधी रस्त्यावर फेकून देत नाही की शेतात बुलडोझरही फिरविला जात नाही. निसर्गाच्या अनियमिततेने जे काही होतंय, घडतयं त्याला तो धीराने सामोरे जातो. कोकणातील शेतकऱ्यानेही आपल्या मुलाने शिकून मोठं व्हावं, हे स्वप्न जरूर पाहिलेले असतं. त्याचीही धडपड त्यासाठीच असते; परंतु तो कधीही त्याने विचलित होत नाही. कुटुंबातील मुलांनाही आई-वडिलांच्या असलेल्या परिस्थितीची जाणीव आणि कल्पना दिलेली असते. यातही जर एखाद्या कुटुंबातील तरुणाने काही अविचाराने वागायला, बोलायला सुरुवात केली तरीही त्याची जाणीव कुटुंबीय वारंवार करून देत असतात, त्यामुळे काही तरुण सावरतात. काही यातून बाहेरही पडत नाहीत. मग त्यांची होणारी इतिश्री आपणही पहात असतो.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रश्न यांचा विचार करताना एकच साधं उदाहरण जरी नजरेसमोर आणलं तरीही लक्षात येईल की, गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील सरकार पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न चुकता दरवर्षी नुकसानभरपाई अनुदान नित्यनियमाने देत आलेले आहे. याचं कारण सरकार कोणाचेही येऊ देत, सत्तेवर किमान अर्धा डझन मंत्री हे पश्चिम महाराष्ट्रातील असतात. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदतीसाठी सत्ताधाऱ्यांची ओंजळ नेहमीच पुढे असते. कारण कोणतंही असो; परंतु ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेली अनेक वर्षे सातत्याने मदत केली जात आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी मदत होत असेल तर त्याने आम्ही दु:खी होण्याचे कोणतेही कारण नाही; परंतु सत्तास्थानी असणाऱ्यांनी अनुदान देताना, नुकसानभरपाई देताना सतत विशिष्ट भागावर मेहरनजर असणं योग्य नाही. विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागांतीलही शेतकरीच आहेत. ते देखील शेती-बागायतीत कष्टच करतात. बागायतीत कीटकनाशक, खतांसाठी लाखो रुपये खर्च करतात. अनेकवेळा केलेल्या खर्चाचा ताळ-मेळही त्याला घालता येत नाही; परंतु ज्या अत्मीयतेने पुढीलवर्षी येणारा गणपती उत्सव अधिक जोमाने करायचा कोकणातील शेतकरी ते श्रद्धेने ठरवितो त्याच पद्धतीने पुढील वर्षी आपल्या शेतात, बागायतीत अधिकचे उत्पादन येईल, मागील वर्षांचा तोटा भरून निघेल या आशेवर तो शेती-बागायतीत कष्ट करीत राबत असतो.

उर्वरित महाराष्ट्रातील अनेक नवनवीन प्रयोगही शेती-बागायतीत केलेले आहेत. द्राक्ष, डाळिंब, मोसंबी या फळबागायतीत केलेले बदल विक्रीला येणाऱ्या फळांवरून सहज दिसून येतात. कोकणातील शेतकऱ्यांनीही नवनवीन बी-बियाण्यांचा भाताच्या बाबतीत वापर करून पाहिला आहे. त्याने भात उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोकणातील बागायतीतही पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होत आहे. तो अधिक प्रमाणात वाढला पाहिजे. शेतीतील नवतंत्रज्ञानाचा वापर करून कोकणातील शेती बागायतदार शेतकऱ्यांनी येणाऱ्या संकटावर मात करीत पाय रोवून उभे राहिले पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -