Monday, March 24, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखहेच का ‘भारत जोडो’चे फलित?

हेच का ‘भारत जोडो’चे फलित?

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर

मुंबई काँग्रेसचा उच्चविभूषित, सुसंस्कृत व उद्योग-व्यावसायिक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा हाती घेतला. मिलिंद देवरा हे काँग्रेसमधील तरुणाईचा चेहरा होता. केंद्रात व विविध राज्यांत सहा दशकांहून अधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसची अवस्था आज दयनीय आहे. सन २०२४ मध्ये काँग्रेसचे काय होणार आहे याचे उत्तर काँग्रेसमधील ऐंशी पार केलेल्या मल्लिकार्जून खरगेंकडे नाही आणि भारत जोडो न्याय यात्रा काढणाऱ्या चाळिशी पार केलेल्या राहुल गांधींकडेही नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर ऊठसूठ टीका करून सतत मोदींच्या विरोधात नकारात्मक भूमिका घेऊन पक्ष कसा वाढणार, याचे आत्मचिंतन करायला काँग्रेसच्या नेत्यांना वेळ नाही.

लोकसभा निवडणुका तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. ज्या देवरा घराण्याचा काँग्रेस पक्षाशी व गांधी परिवाराशी गेली पंचावन्न वर्षे संबंध होता, ते नाते तोडून मिलिंद देवरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले, याचे काँग्रेसमधील कोणालाच काही वाटत नाही, याचे मोठे आश्चर्य वाटते. काँग्रेसमध्ये नव्याने कोणी येत नाही, आयाराम येत नाहीत. मात्र गयारामांची सतत नवीन नावे झळकताना दिसत आहेत. बहुतेकजण भाजपाच्या वाटेवर जात आहेत. मिलिंद देवरा काँग्रेस सोडून शिवसेनेत गेले ही काँग्रेसला मुंबईत फार मोठी इशारा घंटा आहे. केंद्रात, राज्यात नि मुंबई महापालिकेतही काँग्रेसची सत्ता नाही. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसचा कुठेच प्रभाव नाही. केवळ ‘भारत जोडो’चा गवगवा करून २०२४ मध्ये फार काही साध्य होईल, असे वातावरण नाही. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने चौफेर विकास आणि जनकल्याणकारी योजना थेट घरापर्यंत पोहोचविण्यात जी मुसंडी मारली आहे, त्याला विरोध करून काँग्रेसला काय मिळणार? मिलिंद देवरा हे काही मैदानावर गर्दी खेचणारे नेते नाहीत. पण नेहमी सकारात्मक विचार व विकासाला साथ ही त्यांची विचारसरणी आहे. देवरा यांच्या शिवसेना प्रवेशाने काँग्रेस व उबाठा सेनेला एकाचवेळी धक्का बसला आहे. मिलिंद यांच्या निर्णयाने मुंबईतील लोकसभा निवडणुकीचे समीकरण बदलणार आहे. काँग्रेस, उबाठा सेना व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या महाआघाडीला चाप लावण्याचे काम मिलिंद देवरांच्या शिवसेना प्रवेशाने होणार आहे.

मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे मुंबई काँग्रेसमधील फार मोठे प्रस्थ होते. मुंबई काँग्रेसच्या उभारणीत मुरली देवरांचे मोठे योगदान होते. मुंबई काँग्रेसचे बावीस वर्षे अध्यक्ष राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. देवरा पिता-पुत्रांनी राजकारणात वा सार्वजनिक जीवनात कधीच कोणाला दुखावले नाही. कोणावर व्यक्तिगत टीका केली नाही. कोणाशी कट्टर दुष्मनी ठेवली नाही. कोणाचे नुकसानही केले नाही. सकारात्मक व विधायक राजकारण हाच पिता-पुत्रांचा पिंड आहे. मिलिंद यांना वडिलांच्या पुण्याईचा लाभ झाला पण त्याचा त्यांनी गैरफायदा उठवला असे कधी ऐकायला मिळाले नाही. मुंबई काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनाही वडिलांच्या पुण्याईचा लाभ मिळाला. त्या चार वेळा धारावी मतदारसंघातून आमदार झाल्या, मंत्रीपदाचाही त्यांना लाभ झाला. पण मुंबई काँग्रेसमधील नेत्यांच्या गटबाजीत त्यांचे किती चालते, हे त्याही सांगू शकणार नाहीत. त्यांचे वडीलही मंत्री, खासदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. मिलिंद देवरा शिवसेनेत गेल्यानंतर वर्षाताई संघर्ष करो, मुंबई आप के साथ है, असे फलक मुंबईत झळकले आहेत. पण संघर्ष करायला पक्षाच्या नेत्यांना वेळ आणि सवड आहे कुठे? संघर्ष नेमका कोणाच्या विरोधात करायचा, अशा संभ्रमात काँग्रेस आहे.

मिलिंद देवरा यांचे उद्योग व्यवसायाशी उत्तम संबंध आहेत. निधी संकलनासाठी अशा नेत्याची प्रत्येक पक्षाला गरज असतेच; पण राहुल गांधींपासून काँग्रेसचे नेते, प्रवक्ते ऊठसूठ अंबानी आणि अदानींवर टीकेची झोड उठवत असतील, तर त्यातून पक्षाला कोणाची सहानुभूती तर मिळत नाहीच पण पक्षाचे नुकसान होते, याची उत्तम समज मिलिंद यांना आहे. म्हणून पक्षाने अंबानी, अदानींवर सतत चालू ठेवलेल्या हल्ल्याबद्दल देवरांनी नापसंती व्यक्त केली आहे. मिलिंद यांची व्यावसायिक उपयुक्तता पाहूनच काँग्रेस पक्षाने डिसेंबरमध्ये त्यांची अ. भा. काँग्रेसचे संयुक्त खजिनदार म्हणून नियुक्ती केली. मिलिंद यांना निवडणुकीच्या तोंडावर अशी जबाबदारी दिली पण त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी राहुल किंवा खरगे यांना वेळ मिळू नये, याचे आश्चर्य वाटते. मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात आहे. पण मुंबईत मराठी भाषिक हे वीस-पंचवीस लाखांच्या आसपास आहेत हे वास्तव आहे. केवळ मराठी मराठी करून कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुका जिंकता येत नाहीत, हे मराठीचे कैवारी असा दावा करणाऱ्या सर्वांना समजते. मुंबईच्या कॉस्मॉपॉलिटन वातावरणाला मिलिंद देवरा हा मान्य असलेला चेहरा आहे.

विशेषत: दक्षिण मुंबईत अमराठी, हिंदी भाषिक, मुस्लीम मतदार मोठ्या संख्यने आहेत. त्यांना आपलासा वाटणारा मिलिंद देवरा हा चेहरा आहे. त्याचा लाभ येत्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला होईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मिलिंद देवरा यांनी सन २००४ मध्ये दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक जिंकली व ते सर्वात तरुण खासदार म्हणून प्रकाशात आले. याच मतदारसंघातून त्यांचे पिताश्री हे लोकसभेवर अनेकदा निवडून आले होते. सन २००९ मध्ये मिलिंद याच मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये ते दळणवळण, माहिती-तंत्रज्ञान, नौकानयन अशा खात्यांचे राज्यमंत्रीही होते. दक्षिण मुंबईसाठी देवरा नेहमीच आग्रही राहिले. पण महाआघाडीत ही जागा उबाठा सेनेकडे आहे, गेली दोन टर्म अरविंद सावंत हे खासदार आहेत. महाआघाडीत ही जागा पुन्हा उबाठाला जाणार, उबाठा आपला हक्क सोडणार नाही आणि काँग्रेसही ती जागा मागण्याच्या मन:स्थितीत नाही, असे लक्षात आल्यावर मिलिंद यांना काँग्रेस सोडण्याशिवाय पर्याय उरला नसावा. मिलिंद यांच्या शिवसेना प्रवेशामुळे काँग्रेसने दक्षिण मुंबईचा हक्काचा उमेदवार गमावला आहेच; पण मुंबईतील बिझनेस सर्कल व दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचे राजकीय सर्कल असा दुवा साधणारा युवा नेता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून मिलिंद यांनी हाती भगवा स्वीकारला, तेव्हा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास दाखवत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणार असल्याचे सांगितले.

केवळ मोदींना विरोध हा एककलमी कार्यक्रम काँग्रेस राबवत असल्याचे मिलिंद यांनी म्हटले आहे. मिलिंद देवरा म्हणतात – अब उसका एक ही लक्ष्य है, पीएम मोदी जो कहते हे, उसके खिलाफ बोलना… अगर वह कहते है, की काँग्रेस एक बहुत अच्छी पार्टी है, वे इसका भी विरोध करेंगे… मिलिंद देवरा हे लोकसभा निवडणूक लढवणार की राज्यसभेवर शिवसेनेच्या वतीने खासदार म्हणून जाणार, याची चर्चा मीडियातून चालू आहे. पण त्याविषयी स्वत: मिलिंद गप्प आहेत. गेल्या ५५ वर्षांचा असलेला काँग्रेसचा घरोबा तोडून त्यांनी शिवसेनेत नवा अध्याय सुरू केला आहे. राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर ही पहिली ‘भारत जोडो’ यात्रा सुरू झाली तेव्हा गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला अलविदा केला होता. आता राहुल यांची मणिपूर ते मुंबई दुसरी भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाली, त्याच मुहूर्तावर मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम केला. राहुल गांधींची टीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक युवा नेत्यांनी व दिग्गजांनी काँग्रेसला सायो नारा केलाय. गुलाम नबी आझाद (जम्मू- काश्मीर), ज्योतिरादित्य शिंदे (मध्य प्रदेश), जतीन प्रसाद (उत्तर प्रदेश), अमरिंदर सिंग (पंजाब), कपिल सिब्बल (दिल्ली), हार्दिक पटेल (गुजरात), सुनील जाखड (पंजाब), कीर्ती आझाद (बिहार), लुइजिन्हो फलेरियो (गोवा), मुकुल संगमा (मेघालय), सुष्मिता देव (आसाम), शत्रुघ्न सिन्हा (बिहार), अश्विनी कुमार (हिमाचल प्रदेश), आरपीएन सिंग (उत्तर प्रदेश), जयवीर शेरवील (पंजाब), अशोक तन्वर (हरियाणा) आणि या मालिकेत नवीन भर पडली मिलिंद देवरा (मुंबई). हेच का भारत जोडेचे फलित…

[email protected]
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -