वैष्णवी कुलकर्णी
पौष महिना आल्हाददायक वातावरणामुळे खास ठरतो. या दिवसांमध्ये विविध प्रकारच्या भाज्या, फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. रसदार आणि आंबटगोड फळांचे सेवन आरोग्यसंपन्न राहण्यास मदत करते. या काळात प्रतिकारशक्ती चांगली राहते, खेरीज पचनसंस्था नीट काम करत असल्यामुळे तब्येतही सुधारते. एकूणच आहारापासून विहारापर्यंत सगळ्यांचा आनंद देणारा पौष मास सुखाची अनुभूती देतो.
पौष महिना हा हिंदू दिनदर्शिकेनुसार दहावा महिना आहे. ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये डिसेंबर आणि जानेवारी हे महिने आहेत. हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्याचे स्वतःचे महत्त्व आहे. या अर्थाने बघता पौष महिन्याचेदेखील स्वतःचे महत्त्व आहे. पौष महिन्यात सूर्याची उपासना करण्याचे महत्त्व सांगितले आहे. आपल्याकडे प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवतेसाठी खास मानला जातो. हिंदू महिन्यांची नावे नक्षत्रांवर आधारित आहेत. पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो. म्हणून या महिन्याला पौष महिना म्हणतात. या महिन्याला छोटा पितृ पक्ष असेही म्हणतात. याचे कारण असे की, मान्यतेनुसार या महिन्यात पिंडदान आणि श्राद्ध विधी केल्यास व्यक्तीला विशेष लाभ होतो आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते.
पौराणिक ग्रंथांच्या मान्यतेनुसार पौष महिन्यात सूर्यदेवाला त्यांच्या दिव्य नावानेच अर्घ्य अर्पण करण्यास सांगितले आहे. या महिन्यातील देवता हे सूर्यदेवाचे रूप मानले जाते. या महिन्यात सूर्याला अर्घ्य अर्पण करून उपवास करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. असे मानले जाते की, या महिन्यातील प्रत्येक रविवारी व्रत आणि उपवास केल्याने तसेच तीळ-तांदळाची खिचडी अर्पण केल्याने मनुष्य समाधानी, सुखी होतो. पौष महिन्यात शुभ कार्यावर काही काळ बंदी घातली जाते. ज्योतिषांच्या मते या महिन्याच्या संदर्भात एक मत आहे की, या महिन्यात पिंडदान केल्यास पितरांना वैकुंठाची प्राप्ती होते. या महिन्यात भगवान सूर्याला अर्घ्य देणाऱ्याला बल, बुद्धी, ज्ञान, कीर्ती आणि धन प्राप्त होते. म्हणूनच या महिन्यात धार्मिक कार्ये अंमळ कमी केली जातात. या महिन्यात रविवारी उपवास केल्याने भक्तांना सूर्यदेवाचे विशेष आशीर्वाद मिळतात, अशीही भाविकांची श्रद्धा आहे. सूर्याची उपासना केल्याने आयुर्मान वाढते असे पुराण सांगते. प्रत्येक महिन्यात सूर्याची वेगवेगळ्या रूपात पूजा करण्याची परंपरा आपण जाणतो. पौष महिन्यात भाग नावाच्या सूर्याची पूजा केली जाते.
या पवित्र महिन्यात प्रयागराजमधील गंगा, यमुना, अलकनंदा, क्षिप्रा, नर्मदा, सरस्वती या नद्यांच्या संगमावर स्नान करण्याचीही परंपरा आहे. तसेच या महिन्यात यात्रेला जाण्याचीही परंपरा आहे. म्हणजेच उपवास, दान आणि उपासनेसोबतच पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचेही महत्त्व सांगण्यात आले आहे. या पवित्र महिन्यात केलेल्या धार्मिक कार्यामुळे अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते. व्रत आणि दान केल्याने विशेष फळ मिळते. या महिन्यात भगवान विष्णूची नारायण रूपात पूजा करावी, असे जाणकार सांगतात. पौष महिन्यात सूर्यनारायणाचे नामस्मरण केल्याने समस्या दूर होतात, अशी वदंता आहे. या महिन्यात रोज सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे. या महिन्यात गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करावे. स्नान करताना सर्व तीर्थक्षेत्रे आणि पवित्र नद्यांचे ध्यान केल्यास घरीच तीर्थस्नान करण्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते. या काळात ओम सूर्याय नमः, ओम खगाय नमः, ओम भास्कराय नमः हा जप करावा. सूर्याला जल अर्पण केल्यानंतर गरजू लोकांना अन्नदान करावे. इच्छा असेल तर धान्य आणि पैसेही दान करावेत. कोणत्याही गोशाळेत दानधर्म करावा, असे शास्त्रामध्ये सांगितले आहे.
सूर्याला जल अर्पण करणे हा धर्माने सांगितलेला एक उपचार आहेच पण आरोग्यालाही त्याचे अनेक फायदे होतात. हिवाळ्याची वेळ असल्यामुळे या दिवसांमध्ये सकाळी लवकर उठणे आणि सूर्यप्रकाशात राहणे आरोग्याला फायदे देते. हिवाळ्याच्या दिवसात सूर्यप्रकाशामुळे त्वचेची चमक वाढते. सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळते. यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते. थंडीमुळे होणारे आजार टळतात. आध्यात्मिकदृष्ट्या बघायचे तर सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात पंचदेवांच्या पूजेने होते. सूर्याची पूजा केल्याने कुंडलीतील नऊ ग्रहांशी संबंधित दोष दूर होतात. कुंडलीत सूर्याची स्थिती चांगली नसल्यास कुटुंबात आणि समाजात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वैवाहिक जीवनात शांती, आनंद, सन्मान आणि यश मिळण्यासाठी सूर्याची उपासना करावी, असे पुराणात सांगितले आहे. भविष्य पुराणातील ब्रह्मपर्वात श्रीकृष्णाने पुत्र सांब याला सूर्यदेवाची उपासना करण्याचे महत्त्व सांगितले आहे. भगवान श्रीकृष्णाने सांबाला सांगितले होते की, सूर्यदेव हा एकमेव दृश्य देव आहे. म्हणजेच सूर्य आपल्याला दिसतो. सूर्याची भक्तिभावाने पूजा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना सूर्यदेव पूर्ण करतात. हा भावही अनेकांना सूर्योपासनेला प्रवृत्त करतो.
अशी महती असणारा हा महिना आल्हाददायक वातावरणामुळेही विशेष महत्त्वपूर्ण ठरतो. या दिवसांमध्ये विविध प्रकारच्या भाज्या, फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. रसदार आणि आंबटगोड फळांचे सेवन आरोग्य संपन्न राहण्यास मदत करते. या काळात प्रतिकारशक्ती चांगली राहते. खेरीज पचनसंस्था नीट काम करत असल्यामुळे तब्बेतही सुधारते. वाढत्या थंडीचा सामना करण्यासाठी या काळात अंगात उष्णता निर्माण करणारे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये आधीपासूनच याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, या महिन्यात तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, तिळाची चटणी, लसणाची फोडणी घातलेल्या पालेभाज्या, गरमागरम खिचडी, कढणाचे वेगवेगळे प्रकार खाण्याची परंपरा पूर्वीपासून दिसते. या काळात शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आहारात गुळाचा वापर वाढतो. तंदुरुस्ती टिकवण्यासाठी व्यायामाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणूनच पहाटे अथवा रात्री फिरण्यास बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते.
रुचकर हुरडा हे या महिन्याचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य वा आकर्षण म्हणायला हवे. या काळात जागोजागी ‘हुरडा पार्ट्या’ आयोजित केल्या जातात. राजकीय नेत्यांना, सामाजिक क्षेत्रातील मंडळींना, स्नेही-हितचिंतकांना आपल्या शेतावर हुरडा पार्टीसाठी आवर्जून बोलावण्याची परंपरा काही ठिकाणी वर्षानुवर्षे पाळली जात आहे. सध्याही अनेक ठिकाणी अशा पार्ट्यांची धामधूम सुरू आहे. राजकीय नेत्यांसोबत कार्यकर्तेही या पार्ट्यांचा आनंद लुटत असतात. अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे शेतजमिनी नष्ट होत असताना शेतांविषयीचे आकर्षण वाढू लागले आहे. साहजिक, शेत पाहण्याच्या ओढीने का होईना, ग्रामीण भागाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यातूनच कृषी पर्यटनाची संकल्पना रुजत कमालीची लोकप्रिय झाली. हुरड्याचा हंगाम कृषी पर्यटनासाठी अगदी उत्तम ठरतो. कारण या काळात शेतात विविध पिके डौलात उभी असतात. सिंचनाची सुविधा असणाऱ्या ठिकाणी बऱ्यापैकी पाणी उपलब्ध असते. थंडीसारख्या आरोग्यदायी ऋतूमुळे ही भटकंती आणखी आनंददायी ठरते.
एकंदरच पौष महिना असे अनेक आनंदक्षण घेऊन येतो. या काळात संक्रांतीसारखे महत्त्वपूर्ण सण साजरे होतात. भोगी आणि संक्रातीच्या पवित्र सणांनिमित्ताने घराघरात पै पाहुण्यांची वर्दळ वाढते. एकत्र येत स्नेहभोजनाचे कार्यक्रम रंगतात. सध्या देशाच्या एकाच भागात नव्हे; तर जवळपास सगळीकडे पतंग महोत्सवांचे आयोजन होते. असेही आपल्याकडे पूर्वीपासून पतंगाचा खेळ लोकप्रिय आहे. लहानगेच नव्हे तर मोठेदेखील आवडीने घरी पतंग तयार करुन उडवताना दिसतात. आकाशात दिसणारी पतंगांची गर्दी आणि काटाकटीचा चुरशीचा खेळ एक वेगळीच मौज देऊन जातो. पौषात या खेळाने भरलेले आकाश बघणे हीदेखील एक सुंदर अनुभूती असते.
एकीकडे संक्रांतीनिमित्ताने भरलेल्या सुगडांमधील बोरे, मटार, उसाचे करवे, शेंगा, गाजर, तिळगूळ असा मेवा घायचा, तर दुसरीकडे गरमागरम सुरस जेवणावर ताव मारत आल्हाददायक वातावरणाची मजा लुटायची… असा दुहेरी आनंद देणारा हा महिना प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. शेवटी हादेखील एका वर्षाच्या अखेरचा काळ असतो. त्यासाठी सृष्टीची तयारी सुरू असते. पानगळीचे दिवस मनातील ही हुरहूर वाढवत असतात. पण या समारोपाच्या दिवसांमध्येच नवलाईची चाहूल दडलेली असते. नव्या वर्षाचे वेध लागलेले असतात. भावभावनांचा हा संमिश्र खेळ हे दिवस अधिक खेळकर आणि आनंदी करून जातो. तेव्हा आपणही याच जाणिवेतून पौषाचे स्वागत करू या.