Sunday, May 25, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

Jitendra Awhad : ''जातीवादाचा वास येतो असे मी बोललोच नाही'', जितेंद्र आव्हाडांची सारवासारव

Jitendra Awhad : ''जातीवादाचा वास येतो असे मी बोललोच नाही'', जितेंद्र आव्हाडांची सारवासारव

नागपूर : न्यायपालिकेच्या काही निर्णयात जातीयतेचा वास येतो असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नागपूर येथे केल्याने वाद निर्माण झाला आहे. न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ८० टक्के समाजावर अन्याय केला, असे विधान आव्हाड यांनी केले होते. आज न्यायपालिका निष्पक्ष नाही, असे आव्हाड काल म्हणाले. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. यानंतर आव्हाडांनी यू टर्न घेत, जातीवादाचा वास येतो असे मी बोललोच नाही, अशी सारवासारव आता ते करत आहेत.



''मला वाईट वाटतं.. न्यायव्यवस्थेत आरक्षण ठेवायला पाहिजे होते. मी बोलत नाही कारण वाद निर्माण होतो. काही काही जजमेंट अशी येतात त्यातून जातीवादाचा वास यायला लागतो. न्याय व्यवस्था ही नॉन बायस असली पाहिजे, अशी संविधानाची अपेक्षा आहे. बाबासाहेबांना मिठी मारायची असेल तर प्रत्येक मानवाने मारली पाहिजे. संविधानाने सर्वांना समान संधी दिली आहे. मात्र न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन ८० टक्के समाजावर बाबासाहेबांनी अन्याय केला.'' असे वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाडांनी नागपूर येथे केले होते.


मात्र आता घुमजाव करत न्याय व्यवस्थेच्या निकालातून जातीय वास येतो असे मी बोललो नाही, मी असे म्हटलेले नाही, भाषण काढून बघा.. वैचारिक लढाई ही लढाई नसते.. लोकांना विचार मांडणे आवडत नाही कारण एखादा विचार मांडला की, शिव्या देत सगळे रस्त्यावर येतात. मी तो काल विषय मांडला आणि तिथेच मी तो विषय संपवलेला आहे. मी माझी शंका होती ती व्यक्त केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी का केलं.. का केलं नाही... हे मी सांगू शकत नाही. माझे विचार होते. ते मी मांडत असतो. समाजाला पटले तर ठीक नाही पटले तरी ठीक. माझ्या विचारांना मान्यता द्या, अशी मी कोणावर जबरदस्ती करत नाही, अशी सारवासारव आता आव्हाड करत आहेत.


''मला अनुभव आला.. मी शांत बसणारा माणूस नाही. माझ्या आईला कधीही पूजेला बोलावत नव्हते. ती माझ्या मनातील वेदना आहे. मी ती बोललो, तिने कधीच आम्हाला हे सांगितलं नाही. मी वाचत गेलो आणि वर्णद्वेष समजत गेलो. चातुरवर्ण समजत गेलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या आईला का बोलावलं जात नाही.'' असे ते म्हणाले.


दरम्यान, बाबासाहेबांविषयी भाष्य करणं अयोग्य आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सुशीलकुमार शिंदे यांनी सुनावले. तर आव्हाड बाबासाहेबांपेक्षा मोठे विचारवंत झाले का, असा सवाल भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करून आंबेडकरी जनतेला दुखावण्याचे काम केलंय. आव्हाड नैराश्याने ग्रासले असून चर्चेत राहण्यासाठी ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असेही देशमुख म्हणाले. तर पणन मंत्री अब्दुल सत्तारांनीही आव्हाडांवर सडकून टीका केली आहे.


काही दिवसांपूर्वीच त्यांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, असे म्हणत वाद निर्माण केला होता. त्यानंतर त्यांनी सारवासारवही केली होती. त्यांच्याच पक्षातून रोहित पवार यांनी त्यांच्या विधानाचा समाचार घेतला होता.

Comments
Add Comment