अल्पवयीन मुलाकडून करवून घेतले हे कृत्य
मुंबई : मुंबईसह (Mumbai) देशातील प्रमुख संग्रहालये (Museam) बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे आठ ई-मेल (Threatning E-mails) ५ जानेवारीला मिळाले होते. पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने तपास केल्यानंतर संशयास्पद काही आढळून आले नाही. संग्रहालयात अनेक बॉम्ब ठेवले जातील आणि त्याचे कधीही स्फोट होतील, असे ई-मेलमध्ये म्हटले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी संग्रहालय परिसरात बंदोबस्त तैनात केला आणि ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. यात पोलिसांना यश मिळाले असून आसाममधील १२ वर्षांच्या मुलाच्या ई-मेल आयडीवरून हे ई-मेल पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि वरळीतील नेहरू विज्ञान केंद्रासह देशातील प्रमुख संग्रहालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे आठ ई-मेल पाठवण्यात आले होते. याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करुन मुंबई पोलीस सायबर विभागाकडून शोधमोहीम सुरु करण्यात आली. त्यात व्हिडीओ गेम खेळताना अनोळखी व्यक्तीने १२ वर्षांच्या मुलाला फसवून त्याच्याकडून हा ई-मेल तयार करून घेतल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले.
या प्रकाराची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने आसामामध्ये जाऊन त्या मुलाकडून याबाबतची महिती घेतली. मुलाने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओ गेम खेळताना मुख्य आरोपी या मुलाच्या संपर्कात राहत होता. ‘डिस्कॉर्ट’ या व्हिडिओ गेम खेळणाऱ्यांमध्ये प्रचलित असलेल्या प्लॅटफॉर्मवरून दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्या व्यक्तीने १२ वर्षांच्या मुलाकडून हा ई-मेल आयडी तयार करून घेतल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांची कारवाई सुरु आहे व मुख्य आरोपीचा शोध घेतला जात आहे.