दावोस दौऱ्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्र्यांचा घणाघात
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काल रात्री १ वाजेच्या सुमारास दावोस दौऱ्यासाठी (Davos Visit) रवाना झाले. मात्र, ते जाण्यापूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी त्यांच्या दौऱ्यावरुन टीका केली. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनीही या दौऱ्याबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर काल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. ‘बोलघेवडेपणा करुन महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकता येणार नाही’, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
आदित्य ठाकरे यांनी दावोस दौऱ्यासाठी परराष्ट्र खात्याने ५० लोकांना परवानगी दिली आहे का? असे खोचकपणे विचारले होते. यावर चोख प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, उद्योग विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालय असे १० लोकांचे शिष्टमंडळ दावोसला जाते आहे. MMRDA आणि महाप्रीन असे आठ लोक जात आहेत. त्यांनाही केंद्राकडून संमती मिळाली आहे. त्यांच्यासारखे आकडे फुगवून कागदावर ठेवण्यासाठी आम्ही जात नाही.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, जे करारनामे होतील त्याची अंमलबजावणी होईल. ते काय बोललेत याबद्दल काही बोलायची आवश्यकता नाही. कारण त्यांनी जे सामंज्यस करार केले ते करार आणि प्रत्यक्षात सुरु झालेली कामे ही महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहेत. फक्त बोलघेवडेपणा करुन महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकता येणार नाही. जे करार आम्ही करु त्याची अंमलबजावणी होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
जो खर्च होईल त्यातील प्रत्येक रुपयाचा तपशील देणार
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून तीन लाख दहा हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. तसेच इतर देशांचे मंत्री तसेच मोठ्या कंपन्या आणि वित्तीय संस्थांशी चर्चा करून राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याचा पूर्ण प्रयत्न करू. दावोस दौऱ्याबाबत विरोधकांनी केलेली टीका ही संपूर्णपणे निरर्थक असून या दौऱ्यात कोणताही अनाठायी खर्च करण्यात आला नसून जो खर्च होईल त्यातील प्रत्येक रुपयाचा तपशील सर्वसामान्य लोकांपुढे आणला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
अधिक विदेशी गुंतवणुकीसाठी दावोस दौरा
दरम्यान, दावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी तीन दिवसांचा दौरा आम्ही करतो आहोत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक आली पाहिजे, यासाठी चांगला फोरम दावोस या ठिकाणी मिळतो. महाराष्ट्राचे ब्रांडिंग करणे, शोकेसिंग करणे याची ही संधी असते. त्याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल. महाराष्ट्राकडे वेगळ्या अपेक्षेने जगातले लोक पाहात आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यात विदेशी कंपन्या आग्रही आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सामंज्यस करार होतील. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.