मुंबई : मुंबईच्या परळ ब्रिजवरुन (Parel Bridge) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रिजवर बाईक आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात (Parel accident) दोन तरुणींसह एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास परळ ब्रिजवर दामोदर हॉलसमोर ही घटना घडली. या अपघातात दुचाकीवरून ट्रिपल सीट (Triple seat) जाणाऱ्या बाईकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडक बसली आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेत बाईकवरुन दोन तरुणी आणि एक तरुण प्रवास करत होते. साउथ बॉण्डने प्रवास करत असताना डिव्हायडरला धडक बसून नॉर्थ बॉण्डने जाणाऱ्या ट्रकवर बाईक जाऊन धडकली. ट्रक चालकाने स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अपघाताची सविस्तर माहिती दिली.
अपघातानंतर बाईकच्या समोर भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला तर ट्रकचे देखील नुकसान झालं आहे. दुर्घटनेत बाईकवरील तिघे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर तिघांना केईएम (KEM) हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केलं. मृत झालेल्या दोघांची तनिष पतंगे (वय २४), रेणुका ताम्रकर ( वय 25 वर्ष) अशी नावे असून अद्याप एकाची ओळख पटलेली नाही.