मुंबईतील आंदोलनाआधी ट्रॅप लावला जात असल्याचा जरांगेंचा आरोप
जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) येत्या २० जानेवारीपासून मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असतानाच आज मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation) यांनी मुंबईतील आंदोलनाआधी ट्रॅप लावला जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मला शब्दांत अडकवून गुंतवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि काहीतरी घडवायचे असे प्लॅनिंग सुरू आहे. पण आता गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही.
माझ्यावर ट्रॅप लावण्याचा प्रयत्न केला जातोय. मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारे, मराठा समाजाच्या जीवावर मोठे झालेले ज्यांच्या दुकानदाऱ्या होत्या त्या आता सगळ्या बंद पडल्या आहेत. अशा लोकांना मी आतून खपत नाही. या लोकांना आरक्षणाचा विषय संपू द्यायचाच नव्हता. त्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष करून आमच्या आंदोलनाचा काही मंत्र्यांना अपमान करायचा आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
जरांगे पाटील पुढे म्हणाले, याबाबत मला सरकारी अधिकाऱ्यांकडूनच माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता आम्ही सावध झालो आहोत. आमच्या आंदोलनात कुणी हिंसाचाराचा प्रयत्न करत आहे का, यावर आता आम्ही बारकाईने लक्ष ठेवणार आहोत. काल राज्य सरकारमधील मंत्र्यांची बैठक झाली. काही जणांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. तर काही जणांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचाही सल्ला दिल्याची माहिती आम्हाला समजली आहे. या माहितीची खातरजमा करत आहोत. त्यानंतर आरक्षणाला विरोध असणाऱ्या मंत्र्यांचीही नावं आम्हाला कळतील, असे जरांगे पाटील म्हणाले.