सेवाव्रती: शिबानी जोशी
सांगलीमधील शंभर वर्षे जुनी लोकमान्य टिळक स्मारक मंदिर ही संस्था येथील सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक कामांमध्ये अग्रेसर मानली जाते. यंदा संस्थेचे शतक महोत्सवी वर्ष सुरू असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी त्यानिमित्त नुकतीच संस्थेला भेट दिली.
१५ फेब्रुवारी १९२० रोजी लोकमान्य टिळक यांनी ज्योतिष परिषदेचे अध्यक्षपद सांगली नगरीमध्ये भूषविले. त्या दिवशी दुपारच्या वेळी विश्रांतीसाठी ते सांगलीतील आयर्विन पुलासमोरच्या जागेत बांधलेल्या एका लहान खोलीमध्ये थांबले. खोली बाहेर मोठे मैदान आणि जागा अगदी मोक्याची, त्यामुळे बरीच तरुण मंडळी या ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने एकत्र येत असत. तशीच त्या दिवशीही जमली होती. लोकमान्यांचे विचार, त्यांचे बोलणे आणि देशभक्तीने भरलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व या सगळ्यांमुळे ही तरुण मंडळी अतिशय प्रभावित झाली. आपणही भारतीय स्वातंत्र्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या विचाराने प्रेरित झाली; परंतु दुर्दैवाने त्याच वर्षी १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांचे महानिर्वाण झाले. त्यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या काही तरुणांनी सांगलीमध्ये लोकमान्यांचे उचित स्मारक उभे करण्याचे ठरविले. लोकमान्यांचे ज्या ठिकाणी काही वेळ तरी वास्तव्य झाले होते, त्याच जागेवर स्मारक करायचे ठरले आणि १९ डिसेंबर १९२४ या दिवशी त्याच ठिकाणी लोकमान्य स्मारक मंदिर स्थापित झाले. साहित्यसम्राट न. चिं. केळकरांनी या वास्तूचे उद्घाटन केले.
आज उभी असलेली लोकमान्य टिळक स्मारक मंदिराची भव्य वास्तू आता शंभरीत पदार्पण करीत आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरील लोकमान्य टिळकांचा मेघडंबरीमध्ये उभा असलेला अर्थ पुतळा हे सांगलीकरांचे दैवतच जणू, थोर शिल्पकार कै. रघुनाथ फडके यांनी तयार केलेल्या या पुतळ्याचे २५ ऑगस्ट १९२९ रोजी बापूजी अणे यांनी अनावरण केले. जसे मंदिरात देवदर्शनासाठी जावे, तसे कित्येक लोक नित्यनेमाने लोकमान्यांच्या दर्शनासाठी या मंदिरात येतात.
स्थापनेनंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे पुढची २३ वर्षे स्वातंत्र्य चळवळीतल्या मिरवणुका, व्याख्याने, सभांनी हे स्मारक सदैव गजबजलेले असे. स्थापनेपासूनच संस्थेने विविध क्षेत्रांत कामाला सुरुवात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे. तोच योग शिकविण्याची योगाचार्य कै. जनुभाऊ गोडबोले आणि कै. बापूराव देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली येथे सुरुवात झाली. जवळजवळ ६० वर्षे अव्याहतपणे हा मोफत योगासन वर्ग सुरू आहे. आजपर्यंत शेकडो लोकांनी याचा लाभ घेऊन मनःस्वास्थ्य आणि आरोग्य प्राप्त केले आहे. गीता जयंतीच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा दरवर्षी घेतल्या जातात. मुलांमध्ये समाधीटपणा यावा, स्मरणशक्ती सुधारावी, विचारवृद्धी व्हावी या हेतूने गीतापठण, कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धा होतात आणि सहा-सातशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा त्यात सहभाग असतो. त्याचवेळी भगवद्गीता, ज्ञानेश्वरी व लोकमान्य टिळक या विषयांवर तज्ज्ञ आणि प्रख्यात वक्त्यांची व्याख्यानमाला आयोजित केली जाते. उन्हाळी सुट्टीत मुलांसाठी बालसंस्कार शिबिराचे आयोजन होते. विविध मैदानी व बौद्धिक खेळ, कसरती, मनोरे, हस्तकला, नाट्यअभिनय, रांगोळी, देशभक्तीपर गीते असे अनेक विषय आणि तज्ज्ञ मार्गदर्शक यामुळे मुले उत्साहाने व आनंदाने या शिबिरात सहभागी होतात.
गेली ४० वर्षे सकाळी आठ ते बारा या वेळेत मराठीतील प्रमुख वृत्तपत्रे सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जातात. आपला परिसर, आपले सभासद सर्वच लोक निरोगी राहावे, त्यांचे आयुष्य आरोग्यपूर्ण असावे याच विचारातून एक सुरू असलेला उपक्रम म्हणजे ‘आरोग्यविषयक व्याख्यान’. मधुमेह, कर्करोग, निसर्गोपचार, आहारपद्धती असे निरनिराळे विषय उलगडण्यासाठी डॉ. जयंती फाटक, डॉ. शुभदा धर्माधिकारी, वैद्य सुविनय दामले, डॉ. जगन्नाथ दीक्षित असे तज्ज्ञ धन्वंतरी संस्थेत दाखल झाले आहेत. समाजातील वर्तमानातील प्रश्नांवर चर्चा, विचारविनिमय करणे ही जबाबदारी देखील संस्था आजपर्यंत अतिशय जागरूकपणे पार पाडत आली आहे. शालेय पोषण आहार, व्यावसायिक अभ्यासक्रमाची फी योजना, नोटाबंदी, जीएसटी, कलम ३७०, सी.ए.ए., एन. आर. सी. असे विषय उदाहरणार्थ घेता येतील.
लोकमान्य टिळकांनी संघटनेच्या हेतूने सुरू केलेला गणेशोत्सव या मंदिरात अगदी उत्साहात साजरा होतो. सामूहिक अथर्वशीर्ष पठणासाठी २०० पेक्षा अधिक महिला जमतात. प्रतिवर्षी कोजागिरीनिमित्त एक आगळी- वेगळी संकल्पना घेऊन अनोखी संगीत मैफल आयोजित केली जाते, नामवंत गायक-वादकांच्या या मैफलीला जाणकार रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. पं. मधुकर धुमाळ, प्रा. सचिन जगताप, केदा गुळवणी, सुनील ऐवळे, ज्येष्ठ संगीत व्यासंगी मंगेश वाघमारे यांच्या कला सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले आहेत. टिळक स्मारक मंदिरात राष्ट्रीय उत्सवसुद्धा उत्साही वातावरणात साजरे होतात. नवरात्र उत्सवात नवदुर्गा ‘सन्मान सोहळा’ साजरा करून कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याची ओळख सर्वांना करून द्यावी यासाठी हा उपक्रम राबविला जातो.
१९ डिसेंबर हा संस्थेचा वर्धापन दिन संस्थेमध्ये दीपोत्सवाने साजरा केला जातो. टिळक स्मारक मंदिराचे प्रमुख विश्वस्त म्हणून ५० वर्षे कार्यरत असलेल्या कै. बाबुराव गोरे यांनी शिस्त, वक्तशीरपणा, नि:स्वार्थी वृत्ती, प्रामाणिकपणा आणि चिकाटी या गुणांमुळे संस्थेला प्रभावी नेतृत्व दिले. त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून २००१ पासून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. दर वर्षी १ ऑगस्ट या दिवशी टिळक पुण्यतिथीला ध्वजवंदन व व्याख्यान आयोजित करण्यात येते. शताब्दी वर्षाच्या काळात आणखी निरनिराळे कार्यक्रम, उपक्रम आखण्याचा संस्थेचा मानस आहे. यासोबतच सध्या सुरू असलेले सर्व उपक्रम तसेच वेळोवेळी समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. नवीन पिढीत उत्तम वक्ते, लेखक, पत्रकार घडावेत यासाठी कार्यशाळा भरविण्याचेही संस्थेने ठरविले आहे.
joshishibani@yahoo. com
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…