
देवेंद्र फडणवीसांचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल
'अयोध्येत यायची त्यांना लाज वाटते!', उद्धव ठाकरेंनाही लगावला टोला
ठाणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राम मांसाहारी असल्याचे केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच महागात पडले. महायुतीच्या अनेक नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध आंदोलने, निदर्शने केली, त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. तर त्यांच्या पक्षातील नेत्यांकडूनही त्यांना घरचा आहेत देण्यात आला. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितल्यानंतरही ते आपल्या विधानावरुन हलले नाहीत. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी 'राम काहीही खाऊ द्या, पण तुम्ही मात्र शेण खालं आहे', अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला आहे.
ठाण्यातील एक शहाणा म्हणत होता की राम काय खात होते, त्यावर मी एवढंच सांगतो की राम काहीही खाऊ द्या, पण तुम्ही मात्र शेण खालं आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी जितेंद्र आव्हाडांवर त्यांचं नाव न घेता हल्लाबोल केला. तसेच ज्या लोकांनी राम मंदिराला (Ram Mandir) विरोध केला त्या लोकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही टीका केली.
ठाण्यातील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले, अयोध्येत राम मंदिर होत आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. २२ तारखेला असा उत्सव साजरा करा की दुनियेला समजलं पाहिजे अयोध्येचा राजा अयोध्येमध्ये पुन्हा विराजमान झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापना केली. त्यामुळे पुन्हा एकदा स्वाभिमान निर्माण झाला. बाबराने आपले राम मंदिर पाडले आणि बाबरी मशिद बांधली. सगळ्या लोकांना ही मशिद टोचत होती. ६ डिसेंबर रोजी ही बाबरी मशिद पाडली. मला आता आनंद होत आहे, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भव्य राम मंदिराची २२ जानेवारी स्थापना होणार आहे, अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या.
अयोध्येत यायची त्यांना लाज वाटते!
पुढे ते म्हणाले, काही लोकांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यांनी सुप्रीम कोर्टात रामाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला. आमच्या महाराष्ट्रात काही लोक आम्हाला विचारत होते की मंदिर कधी बांधणार? आता आम्ही राम मंदिर बांधलं, पण आता ते अयोध्येला कसे येणार, कारण त्यांना लाज वाटते असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
कारसेवक हीच माझी पहिली ओळख
मी सुद्धा कारसेवक होतो, कारसेवक हीच माझी पहिली ओळख आहे असं सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काल त्यांनी विचारलं फडणवीस कारसेवक होते का? हो मी वीस वर्षाचा होतो, त्यावेळी कारसेवक होतो. तुमचे वय होते, त्यावेळी तुम्ही वाघाचे फोटो काढत होता. खरे कारसेवक तर अयोध्येत लाठ्या खात होते, गोळ्या खात होते. उद्धव ठाकरे तुमचा एक नेता दाखवा, जो अयोध्येत कारसेवक होता, अशी टीका फडणवीस यांनी केली.