
आशिष शेलार यांचा ठाकरे गटाच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election) पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपापली बाजू बळकट करत आहे. याच दरम्यान, महायुतीतर्फे (Mahayuti) आज मुंबई उपनगराचा मेळावा रंग शारदा सभागृहात तर शहर विभागाचा मेळावा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पार पडला. यावेळी केलेल्या भाषणामध्ये मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
कोरोना काळामध्ये मंदिरे बंद ठेवून मदिरालय उघडणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे काळारामाचे नाही तर तळीरामाचे भक्त आहेत अशी खरमरीत टीका आशिष शेलार यांनी केली. आदित्य ठाकरेंना लोकसभेच्या निवडणुकीत उतरून निवडून आणून दाखवा असं थेट आव्हानही त्यांनी दिलं. शिवसैनिक हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. उद्धव ठाकरे यांचे भाषण त्यांना आलेले नैराश्य दाखवत आहे. कल्याण डोंबिवली शहरात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची एक जागा निवडून आणून दाखवावी. मर्दांचा पक्ष असेल तर त्यांनी स्वतः किंवा स्वतःच्या सुपुत्राला लोकसभेला निवडून आणून दाखवावे अशीही टीका आशिष शेलार यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतींना काळाराम मंदिरातील उपस्थितीबद्दल लिहिलेल्या पत्राविषयी बोलताना आशिष शेलार म्हणाले, आज सकाळी लवकर उठल्यामुळे त्यांची डोळ्यावरची झोप आणि झडप गेली नसावी म्हणून उद्धव ठाकरे यांना काही घडलेल्या आणि सत्य घटनांचे ज्ञान नाही. संजय राऊत यांनी त्यांना दिलेली स्क्रिप्ट मुद्दामहून अडचणीत आणणारी आणि चुकीची दिली असावी. उद्धव ठाकरे आमच्या विश्व हिंदू परिषदेच्या ट्विटर हँडलवर जरी गेले असते तरी त्यांना दिसले असते की, कालच देशाच्या राष्ट्रपतींना विश्व हिंदू परिषदेने निमंत्रण दिले आहे आणि हे २४ तासांनंतर जागे झाले आहेत. त्यामुळे निमंत्रण राष्ट्रपतींना पोहोचले आहे. यांनी सांगण्याची काही गरज नाही. यांच्या सांगण्यावरून कुणाला आम्ही निमंत्रण देणार नाही आणि हे बोलले म्हणून यांनाही आम्ही निमंत्रण देणार नाही, असं आशिष शेलार म्हणाले.
वरळीतून आमदार गायब
तत्कालीन पर्यावरण मंत्री आणि वरळीचे आमदार कुठे भेटतील का? म्हणून वरळीतील लोक त्यांना शोधत आहेत. वरळीतून आमदार गायब, अशी स्थिती आहे. यांचे विमान कधी जमिनीवर येतच नाही, अशा शब्दात आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली.
संजय राऊत म्हणजे पत्रकार पोपटलाल
संजय राऊतांना टोला लगावताना आशिष शेलार म्हणाले की, सकाळी नऊ वाजता टीव्ही बघू नका. पत्रकार पोपटलाल बोलत राहतील. छत्री घेऊन फिरतात, कधी मान अशी, कधी हात असा, बाकी काही नाही. राज्याला देण्यासारखं काही नाही. या पत्रकार पोपटलाल आणि कंपनीने मुंबईचे केलं तेवढं नुकसान अन्य कोणीच केलं नाही.
ठाकरे गटामुळेच महापालिकेचे डिपॉझिट कमी झाले
मुंबई महापालिकेची डिपॉझिट कमी झाली म्हणून आता ओरडत आहेत. शिंदे सरकार आल्यानंतर विकास कामे सुरू झाली, विकास कामांना निधी वापरला गेला. त्यामुळे मालमत्तांमध्ये साडेचौदा टक्के वाढ झाली. पुल उभे राहिले, रस्ते उभे राहिले. डिपॉझिट कमी होण्याचे खरे कारण तत्कालीन ठाकरे सरकारने बिल्डरांवर ५० टक्के प्रीमियम माफीची खैरात केली. त्यामुळे महापालिकेतील तिजोरीत येणारा निधी आला नाही आणि त्यामुळेच महापालिकेचे डिपॉझिट कमी झाले, असा आरोपही आमदार आशिष शेलार यांनी केला.