मोराचे आध्यात्मिक महत्त्व हे सर्व धर्मांतच आहे. वेद, पुराण ग्रंथ, इसापनीती यात त्याचे खूप महत्त्व आहे. भिन्न संस्कृतींमध्ये मोर एक सामर्थ्य, समृद्धी, शक्ती, आत्मविश्वास, राजसीपणा, नूतनीकरण, अद्वितीय दैवी सौंदर्य, प्रेम, करुणा, पवित्रता, शांती, दयाळूपणा या साऱ्याचे लोकप्रिय प्रतीक आहे.
निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
या विश्वात भारतीय मोरच एवढा अद्भुत सौंदर्यवान का वाटतो? तर त्याची आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारणे आहेत. माझ्या अध्ययनानुसार शास्त्रीय आणि आध्यात्मिक संगम माझ्या निदर्शनास आला.
मोराचा निळा-हिरवा-सोनेरी-तपकिरी रंग. निळा रंग आकाशाचा. नभ म्हणजेच जल पंचतत्त्वातील महत्त्वाचे घटक मन शांत करतो. मन शांत असेल, तर सर्वच आल्हाददायक वाटते. मोराचा तुरा निळा त्रिकोणी आकाराचा ज्याचे ऊर्जात्मक रूप आहे. मोराच्या डोक्यावरील लहान कुरळे निळीशार हिरवट छटेची पिसे आणि त्यात काळा डोळा. त्या भोवतीचा पांढऱ्या त्वचेमुळे पांढरा चंद्रकोरीसारखा आकार डोळ्यांतील शुद्ध निरागस भाव मैत्री करायला भाग पाडतात. डोक्यापासून मान-छातीवरील हिरवट निळ्या रंगछटा लक्ष वेधून घेतात. त्याच्या पाठीवरील निळसर-हिरवट-सोनेरी अर्धगोलाकार पिसं पाठीवर जाऊन पिसाऱ्यात विलीन होतात. त्या पंखांवरील निळे डोळे पाहण्यात आपण कधी तल्लीन होऊन जातो, समजतच नाही. त्याच्या दोन्ही बाजूचे पंख चमकते तांब्यासारखे आणि मोत्यासारखे पांढरे पंख विरुद्ध रंगसंगतीचे असूनसुद्धा त्यांचे अस्तित्व निर्माण करतात. झिगझॅग लाइन म्हणजेच नागमोडी रेषायुक्त असणारे पांढरे काळे पंख खूपच वेगळेपण दाखवतात. मोराच्या डोळ्यांवरील पिसं लहान पिसांपासून मोठी होत गेलेली पूर्ण पिसाऱ्यांमध्ये दिसतात.
पूर्ण तरुण आणि सुदृढ मोराच्या पिसाऱ्यांमधील पिसं २००च्या वरच असतात. माझ्या मोजण्यात एकदा मूळ पिसं १११ आली होती. एक पीस हिरवट-सोनेरी-तांबूस छटा असणारे जास्तीत जास्त अडीच ते पाच फूट लांबीचे असते. मध्यभागी निळा हृदयासारखा आकार ज्याला आपण डोळा म्हणतो हा या मोराच्या पिसाचे मूळ वैशिष्ट्य. निळ्याशार आणि त्याच्याभोवती आकाशी-हिरवट असलेला आकार हृदय शांत, शुद्ध विचारांचं ठेवायला शिकवतं. जर आपले मन शांत, शुद्ध असेल, तर स्वतःबरोबरच आपण इतरांचे आयुष्यसुद्धा सुदृढ करू शकतो. त्याभोवती असणारा तपकिरी रंग म्हणजे सद्गुणांचे मिश्रण. हिरव्या वनराईचा सोनेरी झाक असलेला रंग आपल्याला सशक्त, आरोग्यवंत राहायला शिकवतो. मोराच्या एका पिसाचं कधी निरीक्षण केलेत का? त्या प्रत्येक पिसाच्या प्रत्येक रेषेला जे कंगोरे असतात त्या कंगोऱ्यांना अजून कंगोरे असतात. भिंगातून पाहिल्यावर त्याला अजून कंगोरे दिसतात. देव जाणे असे किती तरी त्यात तंतूसारखे अदृश्य कांगोरे असतील. काय म्हणावं या अद्वितीय अद्भुत सौंदर्याला?
आपल्या आयुष्यातही विचार करण्यासारख्या अशा खोलवर कित्येक गोष्टी आहेत ज्याचा आपण कधीच विचार करत नाही. या अशा अदृश्य सौंदर्याने नटलेली पिसं मी कोणत्याच पक्ष्यांमध्ये पाहिली नाहीत. मोराच्या पिसाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी तलवारीसारख्या पिसांचे दोन्ही बाजूने असलेले संरक्षण कवच. अगदी वरच्या डोलाऱ्याला निळ्या डोळ्यांच्या रचना संपलेल्या शीतलतेची प्रतीकात्मक चंद्राकृती आकाराची पिसं. मोराच्या प्रत्येक पिसांचा आकार, रंग आपल्याला जगायला शिकवतं. आता राहिले मोराचे पाय. आपल्याला वाटतात की, ते न शोभणारे आहेत. अनेक आख्यायिका आहेत. सौंदर्याला गालबोट म्हणून, मोर सौंदर्याचा गर्व करू नये म्हणून मोराचे पाय असे आहेत; परंतु तसे नाही. वैज्ञानिकदृष्ट्या मोराला पिसाऱ्याचा डोलारा सांभाळता यावा, त्यासाठी संतुलन म्हणून मोराचे पाय लांब आणि मजबूत बनवलेले आहेत. त्या पिसाऱ्याच्या डोलाऱ्यामुळे मोर जास्त उडू शकत नाही, मोरामध्ये अांतरिक आणि बाह्य दोन्ही सौंदर्य ओतप्रोत भरलेलं आहे. मादीला आकर्षित करण्यासाठी जेव्हा मोर त्याचा अद्भुत सुंदर पिसारा फुलवतो, आकर्षित नृत्य करून विशिष्ट आवाज काढतो, मान हलवत पायांची मोहक हालचाल करतो, तेव्हा लांडोरच काय पण सारं जगच आनंदित होतं. पावसाच्या आधी नर आणि मादी एकमेकांना साद घालतात. पाऊस येणार म्हणून शेतकरी खूश होतात. मोर नाचताना त्याचे अद्वितीय सौंदर्य पाहून मन प्रफुल्लित होतं. मोर हे ज्या क्षेत्रात राहतात ते क्षेत्र सापमुक्त ठेवतात. कारण मोराचे खाद्य उंदीर आणि साप दोन्ही आहे. उंदीर खाण्यासाठी साप या क्षेत्रात येत असतात. मोर असेल, तर त्या क्षेत्रात उंदीर आणि साप दोन्ही राहत नाही म्हणून शेतकरी मोर पाळतात.
भारतीय मोर (पावो किस्टेसस) ज्याला “निळा मोर” म्हणतात. मोराच्या समूहाला “मस्टर” म्हणतात. मोराचा आवाज काहीशा मांजरीसारखा पण “मियावो” असा असतो. त्यास “केका” असे म्हणतात. मोर रात्री सक्रिय असल्यामुळे रात्रीच जास्त ओरडतात. कधी आवाज कर्कश्श असतो, तर कधी मादीला साद घालण्यासाठी “मियावो” असा असतो. मोराचे खाद्य धान्य, बियाणे, कीटक, साप, बेडूक असे आहे. मोर वाघ, कुत्रे, जंगली मांजरी, रेकून यांचे शिकार होतात. यांचे आयुष्य १२ ते २० वर्षे किंवा जास्तीत-जास्त २३ ते २५ वर्षे असते. यांचे वजन अडीच ते सहा किलोग्रॅमपर्यंत असते. डोक्यापासून पिसाऱ्यांपर्यंतची एकूण लांबी पाच ते साडेपाच किंवा पावणेसहा फुटांपर्यंत असते. मोर त्यांची घरटी झुडपांमध्ये शत्रूंपासून बचाव होण्यासाठी बांधतात. हे निलगिरी, पिंपळ, आंबा, वड या झाडांजवळ राहतात. रात्री हे या झाडांवर झोपतात. आनंदीत असताना मादीला आकर्षित करण्यासाठी किंवा शत्रूला घाबरवण्यासाठी पिसारा फुलवतात.
मोराचे आध्यात्मिक महत्त्व हे सर्व धर्मांतच आहे. वेद, पुराण ग्रंथ, इसापनीती यात यांचे खूप महत्त्व आहे. मिस्त्र, चायना, ग्रीक, भारत, इस्लाम सर्व धर्मांत मोराचे वर्णन आहे. प्रभू श्रीरामाला वनामध्ये जलस्रोत्र दाखविण्याचा मार्ग एक एक पीस टाकून दाखविला, तर श्रीकृष्ण आणि राधा राणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून श्रीकृष्णाने मोराचे पीस मुकुटात लावले. विद्या आणि कलेची संरक्षक देवता सरस्वती हिचे मोर वाहन आहे. त्यामुळेच लहानपणी आपण आपल्या पुस्तकांमध्ये मोराचे पीस ठेवत असू, तर महादेव पुत्र कार्तिक स्वामींची स्वारीसुद्धा मोरच आहे. ग्रीक कथेत हेरा देवीचा मुकुट मोराच्या पिसांचाच आहे. बायबलमध्ये पंखांमध्ये उपचार करण्याची शक्ती आहे. आयुर्वेदात मोराच्या पिसांचा उपयोग औषधात केला जातो. सोनेरी मोराला ज्यू संस्कृतीचे प्रतीक मानतात. इस्लाममध्ये पंखांना स्वर्गाचे प्रतीक मानले जाते. अमेरिकन टेलिव्हिजन नेटवर्क NBC रंगीत टेलिव्हिजनच्या परिचयाचे प्रतीक म्हणून चमकदार रंगाचा प्रसारक मोराचा उपयोग केला आहे.
भिन्न संस्कृतींमध्ये मोर एक सामर्थ्य, समृद्धी, शक्ती, आत्मविश्वास, राजसिपणा, सकारात्मकता, प्रेरणादायी, वैभवी, रुबाबदारपणा, नूतनीकरण, अद्वितीय दैवीय सौंदर्य, सर्व गुणसंपन्न, प्रेम, करुणा, राजसत्ता, पवित्रता, शांती, दयाळूपणा या सगळ्यांचे लोकप्रिय प्रतीक आहे. वास्तुशास्त्र नियमानुसार मोरपंख दक्षिण दिशेला ठेवल्याने आर्थिक सामर्थ्य समृद्धी येते, तर पश्चिम दिशेला राहू दोष कमी होतो. थोडक्यात काय तर घरात सकारात्मकता येते. म्हणूनच २६ जानेवारी १९६३ मध्ये भारत सरकारने मोराला “राष्ट्रीय पक्षी” म्हणून घोषित केले.
मोर मनमिळावू स्वभावाचा, आंतरिक स्वच्छ मनाचा असल्यामुळे मानवाच्या खूप सहज जवळ येतो. त्यामुळे तो पाळीव पक्षांमध्ये गणला जातो. मोराचे सौंदर्य त्याच्यासाठी भयंकरच घातक झालेले आहे. मानवाचा मूळ घातकी आणि विध्वंसक स्वभाव जणू काही मोराच्या मुळावरच उठलेला आहे, कारण त्याची बेमालूमपणे आणि निघृणपणे शिकार मानव सहजरीत्या करतो. त्याच्या पिसांचा उपयोग सगळीकडेच सौंदर्यापासून ते सजावटीपर्यंत केला जातो. पिसांचा वापर अनेक विधी, अलंकार, भारतीय मंदिर, स्थापत्त्य कला, आधुनिक वस्तूंमध्ये केला जातो. त्यांची अंडी आणि त्यांचे व्यापारीकरण होते. IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर यांनी मोरांची स्थिती चिंताजनक असल्यामुळे असुरक्षित म्हणून कांगो मोराला सूचिबद्ध केले आहे. यांच्या संवर्धन आणि संरक्षणात्मक अनेक कायदे केले.
आपण नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद निसर्गात राहूनच घेतला पाहिजे. हे आपल्या सर्वांनाच समजायला पाहिजे. निसर्गातील कोणत्याही जीवाची हानी ही आपलीच हानी आहे. मी तर एवढेच म्हणेन की, जर खरेच तुम्हाला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक आरोग्यवंत आणि सुखवंत राहायचं असेल, तर कधीतरी शांतपणे निसर्गाचा आस्वाद घ्या आणि त्या आनंदाची अनुभूती घ्या. मी जेव्हा पशुपक्षी, जंगल, फुलं थोडक्यात काय तर निसर्गाची चित्र काढते, त्यांचा अभ्यास करते, तेव्हा माझं एक मेडिटेशन म्हणजेच ध्यान केंद्रित होतं. जेव्हा मी मोराची कलाकृती बनवत होते, तेव्हा माझ्या मनात एक विचार येत होता की, खऱ्या मोराची पृथ्वीवरील ही एवढी परिपूर्ण सद्गुणी कलाकृती नक्कीच कृष्णाने त्याच्या ऊर्जेने बनवली असावी म्हणूनच राधेसकट सगळ्या जगाला ती प्रिय झाली. माझे हे निसर्गातील विश्व खूप अप्रतिम आहे. सर्व नकारात्मकतेतून मुक्त करणारे आणि आयुष्यात सकारात्मकता आणणारे…
dr.mahalaxmiwankhedkar @gmail.com