बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या त्या ‘चारचौघी’

Share

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

आपल्या भारतीय समाजात महिलांनी मृतदेहाला खांदा देणे किंवा मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे निषिद्ध मानले जाते. काही अपवाददेखील आहेत, पण त्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. यामागे धार्मिक कारण दिलं जातं. मात्र काहीजणांच्या मते महिलांचं मन पुरुषांपेक्षा कमकुवत मानले जाते. मृत्यू आणि त्याच्याशी संबंधित विधी स्त्रियांना त्रास देऊ शकतात. त्यामुळे महिलांना या सगळ्यापासून दूर ठेवले जाते. ओरिसातील त्या चौघी मात्र याला अपवाद आहेत. स्वतःच्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याच्या दुःखद अनुभवातून त्यांनी असं काम स्वीकारलं, ज्याची समाजाने कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. त्यांचं कार्य जेवढं महान आहे, तेवढंच कष्टप्रददेखील आहे. बेवारस मृतदेहाला खांदा देऊन सन्मानपूर्वक निरोप देणं हे ते काम. हे काम करणाऱ्या त्या आगळ्या-वेगळ्या चारजणी आहेत, मधुस्मिता प्रस्टी, स्मिता मोहंती, स्वागतिका राव आणि भुवनेश्वरच्या स्नेहांजली सेठी.

४० वर्षीय मधुस्मिता, कोलकाता येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होती. कोविड-१९ महामारीच्या दिवसांपासून ती तिचे पती प्रदीप प्रस्टीसोबत त्यांच्या अशासकीय संस्थेसाठी काम करत होती. गेल्या वर्षी तिच्या मैत्रिणी स्मिता, स्वागतिका आणि स्नेहांजली या तिघीजणी देखील मधुस्मितासोबत काम करू लागल्या. जेव्हा या चौघींनी बेवारस, अनोळखी मृतदेह उचलण्याचे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले, तेव्हा ते अनेकांना पटले नाही. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. विरोध केला. मात्र आपल्या या निर्धारावर त्या चौघी ठाम राहिल्या. हे कार्य करताना आपल्याला जगण्याचा एक उद्देश सापडला असं त्यांचं म्हणणं आहे. स्मिताचे भुवनेश्वरमध्ये एक छोटेसे दुकान आहे, स्वागतिका ही बँक कर्मचारी आहे, तर स्नेहांजली पत्रकार आणि व्हॉइसओव्हर आर्टिस्ट आहे. या चौघींनी एक रुग्णवाहिका विकत घेतली आहे, ज्यामध्ये ते रेल्वे ट्रॅक आणि इतर ठिकाणांहून अपघातात मृत्युमुखी पडलेले अज्ञात मृतदेह उचलतात. आवश्यक असल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील करतात. अशी काही कामे सुरू असतानाच त्यांच्या आयुष्यात बदल घडवणारा सर्वांत मोठा अपघात घडला. गेल्या वर्षी ओरिसामध्ये तीन रेल्वे एकमेकांवर आदळल्याने मोठा अपघात झाला. फक्त भारतच नव्हे, तर अवघे जग या अपघातामुळे हळहळले. या भीषण अपघातात २९४ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. या अपघाताची बातमी कळताच चौघीजणी काही तासांतच घटनास्थळी पोहोचल्या.

स्थानिक लोकांच्या मदतीने, लोखंडी डब्यांच्या ढिगाऱ्यातून चार मृतदेह बाहेर काढले. एका व्यक्तीचे डोके पूर्णपणे फुटले होते आणि दुसऱ्याचा डोळा बाहेर पडला होता. इतर दोघांनी त्यांचे हातपाय गमावले होते. अशी एकूणच भयंकर परिस्थिती होती. त्याही स्थितीत न डगमगता अपघातातील अनेक जखमींवर त्यांनी प्राथमिक उपचार केले आणि त्यांच्या रुग्णवाहिकेतून चार मृतदेह बहनगा शाळेत हलवले. अपघातातील जखमींना कटक येथील श्रीरामचंद्र भांजा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आणण्यात आले. या जखमींचे कुटुंबीय इस्पितळात येईपर्यंत त्यांची काळजी घेण्यासाठी त्या चौघी रुग्णालयात चार दिवस ठाण मांडून होत्या. या काळात, त्यांनी काही पीडितांना औषधे आणि कोरडे अन्न देऊन त्यांची काळजी घेतली, त्यांचे कपडे बदलले, त्यांच्या जखमा साफ केल्या.

सुरुवातीला त्यांच्या या ‘असामान्य’ कामाला अनेकांनी नाके मुरडली. विरोध केला. काहीजण या चौघींच्या घरातील अन्न स्वीकारत नाही, तर काहीजण त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहत नाहीत. सुदैवाने ही नकारात्मकता समाजातील ३० टक्के लोकांकडून येते. बाकीचे ७० टक्के लोक काम सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करतात आणि याच कारणामुळे या चौघी ही कार्य पुढे नेत आहेत. या चारजणांतील स्मिता मोहंतीने आपला भाऊ बेंगळूरु येथे एका रेल्वे अपघातात गमावल्यानंतर हे काम हाती घेतले. अंत्यसंस्कारासाठी तिच्या भावाचा मृतदेह ओडिशात आणता आला नाही, हे शल्य स्मिताच्या मनात कायमचे राहून गेले. स्नेहांजलीची पण गोष्ट काहीशी अशीच आहे. २०२० मध्ये स्नेहांजलीची आजी आजारी होती. औषधे खरेदी करण्यासाठी तिच्याकडे १०,००० रुपये नव्हते. त्यात आजीला रक्ताची आवश्यक पूर्तता करता आली नाही, त्यामुळे तिची आजी मृत पावली. या घटनेने स्नेहांजलीच्या मनावर खोलवर परिणाम केला. ‘असहायांना मदत करण्यापेक्षा मोठे काम नाही, मग ते आजारी व्यक्ती असो किंवा मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे’ या मदतीच्या भावनेनेच स्नेहांजली या कार्यात उतरली.

३४ वर्षीय स्वागतिकाने मार्च २०२३ ते जून २०२३ या चार महिन्यांत २५ मृतदेह उचलले आहेत आणि २० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. स्मिताने आतापर्यंत ४३ मृतदेह उचलले आहेत आणि २४ वर अंत्यसंस्कार केले आहेत. तर मधुस्मिताने आतापर्यंत ५००हून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. या बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी या चौघी आपल्या कमाईतला काही भाग खर्च करतात. काही वेळेस उदार अंतःकरणाचे लोक पैसे देतात. याशिवाय १० वर्षांपूर्वी मधुस्मिताचे पती प्रदीप यांनी सुरू केलेल्या गुड समॅरिटन्स संस्थेकडून देखील मदत केली जाते. पुरुषदेखील धजावणार नाहीत, असं मानवसेवेचं महत्कार्य निस्वार्थ वृत्तीने या चौघी करत आहेत. या चौघींच्या कर्तृत्वाला सलाम.

theladybosspower@gmail.com

Recent Posts

मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली; पण खरंच अतिक्रमण झालेल्या मुंबईतील ११ तलावांचे पुनरुज्जीवन होईल?

मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…

1 hour ago

Rajeshwari Kharat Religion : फॅण्ड्री फेम ‘शालू’ने धर्म बदलून केला ‘या’ धर्माचा स्वीकार!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…

1 hour ago

धक्कादायक! हा अपघात की अनास्थेचा मृत्यू? उन्हाळी शिबिरांची जबाबदारी नक्की कोण घेणार? आणि मृत्यूचे मोल कोण मोजणार?

जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…

1 hour ago

चर्चकडून पगार न घेणारे, पाच लक्झरी कारसह १३७ कोटींच्या संपत्तीचे मालक होते पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…

2 hours ago

Shivneri Fort : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा पाचव्यांदा पर्यटकांवर हल्ला!

पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…

2 hours ago

पोप फ्रान्सिस ८८ व्या वर्षी ख्रिस्तवासी

व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…

2 hours ago