ऐकलंत का!: दीपक परब
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ हाऊसफुल्ल चालतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘बाईपण भारी देवा’नंतर जिओ स्टुडिओजचा हा २००३ मधील दुसरा यशस्वी मराठी चित्रपट आहे.
‘झिम्मा २’चा हा प्रवास एखाद्या जादूपेक्षा कमी नव्हता. प्रेक्षकांना प्रत्येक पात्राशी जोडण्याचा आणि ही कथा सगळ्यांना आपलीशी वाटावी, हा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. आज ५० दिवसांचा गाठलेला टप्पा हा उत्सवाचा दिवस आहे. हा उत्सव केवळ ‘झिम्मा २’ चा नसून प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंबा याचा आहे.