अयोध्या : अयोध्येत अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) अखेर उभारले जाणार असल्याने देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. देशभरातील रामभक्तांनी या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावावी, यासाठी घराघरांत निमंत्रण पत्रिका व अक्षता यांचे वाटपही करण्यात येत आहे. याचसोबत आता प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलेल्या व्यक्तींनाही अत्यंत खास भेटवस्तू (Special Gifts) दिल्या जाणार आहेत.
अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या निमंत्रितांना या मंदिराचा पाया खोदताना काढण्यात आलेली माती बॉक्समधून भेट म्हणून देण्यात येईल, अशी माहिती ट्रस्टकडून देण्यात आली. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला स्वतः पंतप्रधान मोदी हे उपस्थित राहणार असून त्यांना अयोध्येतील राम मंदिराची पंधरा मीटरची प्रतिमा एका ज्यूट बॅगमधून भेट म्हणून देण्यात येईल.
या सोहळ्याला अकरा हजार विशेष निमंत्रित उपस्थित राहणार असून त्यांना आकर्षक आणि अविस्मरणीय भेटवस्तू देण्यात येतील. या निमंत्रितांना प्रसाद म्हणून शंभर ग्रॅम वजनाचे मोतीचूरचे लाडू देण्यात येतील. शुद्ध तुपापासून या लाडवांची निर्मिती करण्यात येणार आहे.
निमंत्रितांना भेट म्हणून दोन बॉक्स देण्यात येतील एकामध्ये प्रसादाचे मोतीचूर लाडू आणि तुळशीचे पान असेल तर दुसऱ्या बॉक्समध्ये माती असेल. शरयू नदीतील पाणी भरलेली एक बाटली देखील त्यांना देण्यात येईल. गीता प्रेस गोरखपूरकडून तयार केलेल्या ग्रंथांची एक प्रतही यावेळी देण्यात येईल. या भेटवस्तूंमुळे रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा त्यांच्या चिरकाल स्मरणात राहील, यात शंका नाही.