Saturday, July 13, 2024

प्रेम

नक्षत्रांचे देणे: डॉ. विजया वाड

विमल नवऱ्याला म्हणाली, “अलीकडे तुमचं प्रेम कमी झालंय बरं का! मला चक्क गजऱ्यावर भागवायला लागलात.”
“साड्या खूप महाग झाल्यायत गं विमल.” विनायकराव म्हणाले.
“पण पगारही वाढलाच आहे ना!” विमलनं म्हटलं.
“त्या प्रमाणात साडी खूपच प्रेशस आहे ना! महागातली!”
“आत्ता तर गजराच आणलायत ना!”
“साडी पण आणलीय बाईसाहेब.”
“अय्याऽऽ कुठे आहे?”
“कपाटात लपवून ठेवली आहे.”
“कपाटात? कम्मालच केलीत.”
“बघ! आणली नसती तर फुग्गा झाला असता.”
“थँक्यू… थँक्यू.”
“नुसतं थँक्यू?”

“बरं एक मुका घेऊ का?” विमलनं झटकन् विनायकच्या गालावर ओठ टेकले. विनूला फार फार आनंद झाला. कधी नव्हे ते गालांवर ओठ आपणहून टेकले होते पत्नीनं! बक्षीस न माँगता मिलता है, तो अधिक आनंद होता है! है ना?
विनायकने चक्क भगिनी मंडळाला पाच हजार रुपये भेट दिले होते. ‘एका गुणवंत महिलेला पुरस्कार द्या.’ असे सांगत ‘त्यात माझी बायको वगळा. कारण गुणवंत तीही आहे. पण मला पुरस्कार घरी नको आहे परत यायला.’ विनायकरावांचे बोलणे भगिनी मंडळास आवडले. कधी स्पर्धा आता विमलशिवाय होती ना! एक स्पर्धक कमी! तोडीस तोड!
भगिनी मंडळात चर्चा-प्रतिचर्चा जोरजोरात सुरू झाली.

विमल वगळता प्रेरणा नि प्रार्थना या स्पर्धक तोडीस तोड होत्या.
“आपण विभागून देऊया का?”
“म्हणजे?”
“अडीच-अडीच!” “शेजारच्या स्टोअरमधून महागडी साडी आणूया.”
“रक्कम कमी वाटते गं महागाईच्या दिवसात.”
“अडीच हजारांत पैठणी सुद्धा येत नाही.”
चर्चा प्रतिचर्चा झडत राहिल्या. शेवटी चिठ्ठ्या टाकल्या. प्रेरणा नि प्रार्थना. दोघींनी पुन्हा खातरजमा केली. आपापली नावं नीट बघितली
“आहेत. दोघींची आहेत. स्वतंत्र चिठ्ठीत.” प्रेरणा प्रार्थनाला म्हणाली.
“मी सुद्धा बघितली आहेत. खातरजमा केली आहे.” प्रार्थना प्रेरणाला म्हणाली.
“सगळ्यात तरुण कोण आहे?”
“प्रार्थनाच त्यातल्या त्यात तरुण आहे. तिचं नुकतंच लग्न झालंय ना!”
“लग्न काय? वाढ वयात सुद्धा होतात. प्रार्थना तिशीला पोहोचलीच आहे.” भगिनी मंडळ फटकळ, बोलघेवडे, आऊट स्पोकन होते.

“वयाची ऐशी तैशी. जाऊदेत वयाचं.” यावर मंडळात एकवाक्यता झाली.
प्रेरणाचा थोडा विरस झाला पण तिने तो दिसू दिला नाही.
प्रार्थनाला साडी मिळाली. पण अगदी तश्शीच साडी तिच्या स्टॉकमध्ये असल्याने तिचा मूड आतल्या आत ऑफ होता.
रस्त्याने येता येता विनायकराव भेटले. “भावजी, इकडे कुठे?”
“बाजारात चाललो होतो. हो, कपड्यांच्या दुकानात चाललो होतो. पत्नीला साडी द्यायची आहे. तुम्ही येता का वहिनी दुकानात?”
“अहो भावजी, फुकट योग आहे साडीचा.”
“म्हणजे? मी समजलो नाही.”
“मी एक साडी कमावली आहे.”
“महागाची साडी आहे का? आमची बायको फार पसंती-नापसंतीवाली आहे.” विनायकराव घाबरून म्हणाले.
“अहो, बायकोला आवडावी अशीच आहे हो साडी.”
“शिवाय फुकट” वहिनींचे दुसरे वाक्य भावजींना खूप आवडले.
ती फुकट मिळालेली साडी घेऊन भावजी घरी आले. कुठून आलात?” विमलने उलटतपासणी केली.
“तुझ्यासाठी प्रेझेंट आणायला गेलो होतो.”
“इश्श! अहो मधेच प्रेझेंट?”
“प्रेझेंटला इश्शू असतो का गं. विमल?”
“नाही प्रेम चिकटलं असतं त्याला अस्तरासारखं!”
“प्रेमच ते! कपाटात लपलंय बघ.” नवऱ्यानं बायकोला सांगितले. बायकोने कपाटात दडलेले प्रेम बघायला कपाट उघडले.
“अय्याऽऽ साडी?”
“तुझ्यासाठी खास! प्रेमभरी भेट!”
विमलने ती साडी अंगभर पांघरली.
“आवडला रंग?”
“खूप्पच. अगदी मनपसंत.”
“मग घडी मोड ना गं विमल.”
“नेसते हं!”
“विमल साडी नेसली. नुकतीच घडी मोडलेली. त्यामुळे सुंदरच दिसली.

“हे प्रेम?”
“हो हो. हो प्रेमच! आवडली? किती सुंदर दिसते आहेस या साडीत विमल तू!”
नवऱ्याचा प्रेमाचा बहर, पैसे वाचल्याचा आहे, हे विमल जाणून होती.
‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं.’ ‘तुमचं नि आमचं अगदी सेम असतं.’
‘कधी साडीत लपतं, कधी मुक्यात जपतं नि गालावर रुततं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं.’ विमलनं शहाण्या बायकोसारखं
‘मंडळ’ लपवलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -