Thursday, March 20, 2025
Homeसाप्ताहिककोलाजबाक़ी कुछ बचा, तो महँगाई मार गई...

बाक़ी कुछ बचा, तो महँगाई मार गई…

नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे

गीतकार वर्मा मलिक यांनी १९७४ साली मनोजकुमारसाठी एक गाणे लिहिले होते, ते वाचून लतादीदीला हसू आवरेना. तीच गत झाली मुकेशची. याशिवाय नरेंद्र चंचल, जानी बाबू कव्वाल यांनाही गाणे फारसे भावले नव्हते. संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनाही गाणे आवडले नाही. मनोजकुमार विचारात पडला, हे गाणे सिनेमात ठेवावे की नाही? यावर गीतकार वर्मा मलिक यांनी त्याला पटवून दिले की, गाणे नक्की हिट होईल. चित्रीकरणाच्या वेळी मौसमी चटर्जी आणि प्रेमनाथही गाण्यावर खूप हसले. त्यांनाही ‘असल्या’ विषयावरचे गाणे कितपत चालेल याबद्दल शंका होती. गाण्याचे चित्रीकरण संपले! सगळे स्टुडिओतून बाहेर पडू लागले आणि त्यांच्या लक्षात आले की, त्या दिवशीचे काम संपवून बाहेर पडणाऱ्या ज्युनियर कलाकारांपासून ते स्पॉट बॉयपर्यंत सगळे गुणगुणत होते आणि त्यांच्या ओठांवरचे शब्द होते, “बाकी कुछ बचा तो महँगाई मार गयी!” गाणे सिनेमा पूर्ण शूट व्हायच्या आधीच हिट झाले होते!

सिनेमा होता ‘रोटी, कपडा और मकान.’ मनोजकुमार, झीनत अमान, शशीकपूर, अमिताभ बच्चन, मौसमी चटर्जी, प्रेमनाथ प्रमुख भूमिकेत असलेल्या समस्याप्रधान कथानकात सुशिक्षित युवक भरतच्या (मनोजकुमार) आयुष्यात आलेल्या अडचणी, जीवनातल्या अगदी मूलभूत गरजा असलेल्या – अन्न, वस्त्र, निवारा यासाठी भरतने दिलेला लढा याची कहाणी म्हणजे रोटी, कपडा और मकान. त्यावेळी महागाई आणि अराजकामुळे लोक त्रासले होते. सिनेमा त्यांच्याच व्यथा मांडत असल्यामुळे लोकप्रिय झाला. त्याला फिल्मफेयरची एकूण ११ नामांकने आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (मनोजकुमार), सर्वोत्कृष्ट गीतलेखन (संतोष आनंद) आणि सर्वोत्कृष्ट गायक (महेंद्रकपूर) असे तीन पुरस्कारही मिळाले. वर्मा मलिक यांचे ते गाणे गल्लीगल्लीत लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात वाजू लागले. मनोरंजनाच्या कार्यक्रमात, राजकीय पक्षांच्या सभात वाजू लागले. देशभर गाण्याने धूम उडवून दिली. तत्कालीन सरकार गोंधळले. काही दिवस गाण्यावर बंदीही आणण्यात आली. गंमत म्हणजे ज्या गाण्याला खुद्द गायकच हसले होते, निर्माता ते घ्यावे की नाही या विचारात होता ते १९७५च्या बिनाका गीतमालात ‘सरताज गीत’ ठरले! दुसरे गाणे ‘हाय हाय ये मजबुरी, ये मौसम और ये दुरी’सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर आले!

गाण्याला लक्ष्मी-प्यारेंनी दिलेली कव्वालीची ट्रीटमेंट आणि जानीबाबू कव्वाल यांच्या खास कमावलेला आवाजामुळे फारच मजा आणली. शब्द होते –
‘उसने कहा, तू कौन है
मैंने कहा, उल्फ़त तेरी…
उसने कहा, तकता है क्या?
मैंने कहा, सूरत तेरी…’
उसने कहा, चाहता है क्या?
मैंने कहा, चाहत तेरी…
मैंने कहा, समझा नहीं…
उसने कहा क़िस्मत तेरी…’
तिने विचारले, ‘तू कोण आहेस?’ मी म्हणालो, ‘तुझे प्रेम, त्याची अभिलाषा, म्हणजेच मी?’ ती म्हणाली, ‘एकटक काय पाहातोयस?’ मी म्हटले, ‘तुझा चेहरा.’ तिने विचारले, ‘मग काय हवे आहे तुला?’ माझे उत्तर होते, ‘तुझी आराधना.’ मी म्हटले, ‘मला काहीच समजले नाही.’ ती म्हणाली, ‘तुझे नशीब!’

पुढची कडवी जबरदस्त शायरीच होती. आधीच आम्ही नेत्रपल्लवीच्या लढाईत जखमी झालो होतो. त्यात जीवलगाचा दुरावा, सततचा एकटेपणा आणि देवाचे आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष! मग काय होणार होते आमचे, मेलोच की जवळजवळ!
एक हमें आंखकी लड़ाई मार गई,
दूसरी ये यारकी जुदाई मार गई,
तीसरी हमेशाकी तन्हाई मार गई,
चौथी ये ख़ुदाकी ख़ुदाई
मार गई,
बाक़ी कुछ बचा तो, महँगाई मार गई…
पुढच्या कडव्यात कवीने किती सहजपणे नव्याने प्रेमात पडलेल्या प्रेमिकाची व्यथा सांगितली आहे, पाहा –
तबियत ठीक थी,
और दिल भी बेक़रार न था,
ये तबकी बात है,
जब किसीसे प्यार न था!
***

जबसे प्रीत सपनोंमें समाई, मार गई
मनके मीत, दर्दकी गहराई मार गई
नैनोंसे ये नैनोंकी सगाई मार गई
सोच-सोचमें जो सोच आई, मार गई
बाक़ी कुछ बचा…
“नैनोसे नैनोकीS सगाई”! किती रोमांचक कल्पना! अशा कल्पना कराव्यात जुन्या हिंदी गीतकारांनीच! मलिकांनी सिनेमाचा मुख्य विषय प्रत्येक कडव्याच्या शेवटी उल्लेखून त्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. महागाईमुळे प्रेमच काय साधी मैत्रीही अप्राप्य झाली आहे, अशी कवीची तक्रार आहे. मनातल्या भावना व्यक्त केल्या तरी त्रास आणि मनात दाबून ठेवल्या तरी छळ असे तो म्हणतो –

कैसे वक़्तमें आके दिलको,
दिलकी लगी बिमारी…
महँगाईके दौरमें हो गई,
महंगी यारकी यारी…
दिलकी लगी दिलको जब लगाई, मार गई…
दिलने दी जो प्यारकी दुहाई
मार गई
दिलकी बात दुनियाको बताई, मार गई
और दिलकी बात दिलमें जो छुपाई, मार गई
बाक़ी कुछ बचा…
यानंतरचे कडवे एक शीख मजूर झालेला प्रेमनाथ नरेंद्र चंचलच्या आवाजात गातो. त्यावेळचा त्याचा अभिनय बघण्यासारखा आहे. चार ओळीत त्यावेळच्या परिस्थितीचे, महागाईचे वर्णन वर्मा मलिक यांनी खुमासदार शब्दांत केले होते –
पहले मुट्ठीमें पैसे लेकर, थैलाभर शक्कर लाते थे
अब थैलेमें पैसे जाते हैं, मुट्ठीमें शक्कर आती है…
***

हाय महँगाई, महँगाई महँगाई
दुहाई है दुहाई, तू कहाँसे आई,
तुझे क्यूँ मौत न आई
हाय महँगाई…
गाणे बरेच लांबले तरी प्रेक्षक कंटाळले नाहीत. कारण त्यावेळच्या समाजापुढील एकेका समस्येचा समाचार गीतकारांनी गाण्यात घेतला होता. जनतेची आंदोलने बेछूट पोलीस कारवाईने दाबली जात असत हेही कवीने सांगितले होते –
शक्करमें ये आटेकी मिलाई मार गई,
पाउडरवाले दूधदी मलाई मार गई,
राशनवाली लैनकी लम्बाई मार गई,
जनता जो चिखी, चिल्लाई मार गई,
बाक़ी कुछ बचा तो महँगाई मार गई…

शेवटी तर गीतकाराने आपल्या देशातल्या कधीच न संपणाऱ्या सगळ्या समस्यांची यादीच जोडली होती –
ग़रीबको तो बच्चेकी पढ़ाई मार गई
बेटीकी शादी और सगाई मार गई
किसीको तो रोटीकी कमाई मार गई
कपडेकी किसीको सिलाई मार गई
किसीको मकानकी बनवाई मार गई
जीवनके बस तीन निशान
रोटी कपड़ा और मकान
ढूंढ-ढूंढके हर इंसान
खो बैठा है अपनी जान…

गीतकारांनी शेवटी केलेले भाष्य आजही कुठे बदलले आहे? ते म्हणतात, ‘जो खरे बोलला, त्याचा अंत त्या खरे बोलण्यानेच झाला.’
जो सच सच बोला, तो सच्चाई मार गई
और बाक़ी कुछ बचा, तो महँगाई मार गई…
आज टोकाचा चंगळवाद आणि त्यासाठी बेधुंद जगणे हेच एकंदरच मानवी समाजाचा अजेंडा झालेले असताना कधीतरी मनोरंजन विश्वसुद्धा समाजाच्या समस्यांचा वेध घेत होते यांची आठवण महत्त्वाचीच. नाही का?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -