प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ
मुलीच्या शाळा प्रवेशासाठी तिची मुलाखत होती. भल्या पहाटे तिला उठवून, तिला पूर्ण जाग आली याची खात्री करून, तयार करून शाळेत घेऊन गेलो. तीही खूप उत्साहात होती. म्हणजे घराबाहेर पडल्यावर मुलं खुश असतात तशी ती खुश होती. आमच्यासारखे असंख्य पालक आपापल्या मुलांना घेऊन शांतपणे मुलांच्या मुलाखतीची वेळ कधी येते याची वाट पाहत होते. आमच्या मुलीचे नाव पुकारला गेले आणि आम्ही उत्साहात त्या रूमच्या आतमध्ये गेलो. कॉन्व्हेंट स्कूल होती. तिथे बसलेल्या सिक्स्टर मॅडमने आम्हाला हसून बसण्याची खूण केली. आम्ही बसलो. मॅडमनी काहीतरी बोलायला सुरुवात केली, तोपर्यंत टुणकण खुर्चीवरून उतरून मुलीने समोरच्या टेबलावर मांडून ठेवलेल्या मोमेंटोला हात लावला. म्हणजे जवळजवळ ते हातातच घेतले. वेगळ्याच आकाराची, चकचकीत, कधी न पाहिलेल्या वस्तूचे आपल्यालाही आकर्षण वाटते ना तसे तिला वाटणे स्वाभाविक होते.
‘कीप इट बेटा!’ मीसुद्धा इंग्रजी फाडत तिच्याशी बोलले. ‘आई, किती मस्त आहे ना… मी याला माझ्या ट्रकमध्ये ठेवते.’
म्हणत तिच्या छोटुकल्या बॅगेत खेळण्यासाठी म्हणून घरातून घेतलेला ट्रक तिने बाहेरही काढला. मग मी उठून तिच्या हातातून तो हिसकावून घेऊन परत जाग्यावर ठेवला आणि तिला मांडीवर घेऊन म्हटले, ‘मॅडम, विल शॉऊट नाऊ…’ तिचा हात जरा जोरात दाबल्यामुळे ती काही वेळ शांत बसली. इतक्यात सिस्टरचे आम्हाला काही प्रश्न विचारून झाले. ती मुलीकडे वळली. तिच्याशी गोड बोलत तिला बोलते करायचा तिचा प्रयत्न चांगला होता. समोरच्या काचेच्या बरणीत काही चॉकलेट ठेवली होती, त्यातील एक उचलून तिने तिला दिले. त्यामुळे मुलगी खुश झाली होती. तिने तिला पहिला प्रश्न विचारला. आमच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्नचिन्ह…
‘व्हॉट इज युअर नेम?’
‘माय नेम इज निकिता बाबा सराफ!’ चॉकलेटचे रॅपर उघडत मुलगी सहजपणे उत्तरली. ते हलकेफुलके रॅपर मस्त हवेत उडत खुर्चीसमोर गेले. इथे मात्र आम्हाला जडत्व प्राप्त झाले. भर डिसेंबर महिन्यात आमच्या घामाच्या कपाळावर घर्मबिंदू! त्या सिस्टरने परत फाइल परतून उघडत आमच्या फॉर्मकडे पाहिले. ती काहीच बोलली नाही, पण मनातल्या मनात आम्ही दोघेही खूप काही बोललो. आपसातही मनातल्या मनात भांडलो, याचे कारण म्हणजे घरात सासू-सासरे मी आणि नवरा त्यामुळे आम्ही चौघेही माझ्या नवऱ्याला नावाने हाक मारायचो – प्रवीण. मुलं मोठ्यांचं निरीक्षण करतात आणि तसेच वागतात-बोलतात. ती नेहमीच प्रवीणला ‘प्रवीण’ म्हणून हाक मारायची तेव्हा आम्ही तिला सांगायचो, ‘प्रवीण म्हणायचं नाही बाबा म्हणायचं!’
ती ऐकायची नाही मग कधी ओरडून कधी समजावून खूपदा शिकवून तिला आम्ही प्रवीणला ‘बाबा’ म्हणायला तयार कसेतरी केले. ती अलीकडेच दोन-तीन महिन्यांत त्याला ‘बाबा’ म्हणू लागली होती. त्याच्यात ही शाळा मुलाखतीची पाळी आली. त्यामुळे आम्ही जरी तिला शिकवले ‘निकीता प्रवीण सराफ’ तरीसुद्धा तिने ‘प्रवीण म्हणायचं नाही बाबा म्हणायचं’, हे लक्षात ठेवून ‘प्रवीण बाबा सराफ’ म्हटले तिचे काहीच चुकले नाही. पण आमच्या काळजाचा ठोका मात्र चुकला. आयुष्यात नेहमीच असे घडते. इंग्रजी शब्दांच्या उच्चारांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. ते शिकता शिकता शिक्षण पूर्ण होते तरी उच्चारांबाबत शंका राहतेच! कोणतीही गोष्ट पूर्णपणे बरोबरच असते असे नाही त्याप्रमाणे ती पूर्णपणे चूक असते असेही नाही. लहान मुलांना आपण जसे घडवतो तसे ते घडत जातात; परंतु आपणच प्रत्येक वेळेस वेगवेगळे सांगत जातो आणि मग ती मुलं असेही वागली किंवा ते तसेही वागली तरी आपण त्यांनाच दोष शोधत राहतो. हे उदाहरण कदाचित लहान मुलांच्या संदर्भात मी दिले असेल; परंतु मोठी माणसेसुद्धा खूपदा अशीच विस्कळीतपणे वागतात. परिस्थितीनुसार केव्हाही बदलतात.
जेव्हा वेगवेगळ्या लोकांबरोबर, वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्याला राहावे लागते, तेव्हा सातत्याने आपल्याला ‘सुवर्णमध्य’ शोधत पुढे जायचे असते. मग ती खाण्यापिण्याची बाजू असो किंवा कामाची बाजू असो. कोणतीही गोष्ट शंभर टक्के बरोबर किंवा शंभर टक्के चूक नसते, हे जसे आपल्या बाबतीत आपण लक्षात घेतो तसे इतरांच्या बाबतीतही आपण लक्षात घेतले, तर जगातील सर्व प्रकारची भांडणे संपून जातील, असे मला वाटते!
pratibha.saraph@ gmail.com
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…