Wednesday, March 19, 2025
Homeसाप्ताहिककोलाजस्वत:च्या वकिलाकडूनच फसवणूक!

स्वत:च्या वकिलाकडूनच फसवणूक!

गुन्ह्यातून सहीसलामत सुटायचं, असेल तर वकीलच मदत करू शकतो. पण काही वकील असतात जे अशिक्षितपणाचा फायदा घेत स्वत:च्याच अशिलाची फसवणूक करतात. असाच प्रकार सुशीलाच्या बाबतीत घडला. स्वत:च्या आरोपी पतीची जामिनावर मुक्तता करण्यासाठी केलेल्या वकिलाकडूनच पैसे उकळण्यासाठी तिची फसवणूक झाली.

क्राइम : अॅड. रिया करंजकर

गुन्हेगार जेव्हा एखादा गुन्हा करतो, तेव्हा त्याला पोलीस स्टेशनमध्ये पकडून घेऊन जातात व त्याच्यावर गुन्हा रजिस्टर होतो त्यानंतर त्याला न्यायालयात उभं केलं जातं या पुढच्या कारवाईसाठी गरज लागते ती एखाद्या विद्वान वकिलाची. कारण वकिलाशिवाय पोलीस स्टेशन आणि न्यायालयात कोणताही पर्याय उरत नसतो. गुन्ह्यातून किंवा आपण न केलेल्या गुन्ह्यातून सहीसलामत सुटायचं, असेल तर वकीलच त्याला मदत करू शकतो. सुशीला हिच्या पतीने गुन्हा केलेला होता आणि तो पोलीस स्टेशन आणि न्यायालयामध्ये सिद्ध झालेला होता, त्यामुळे त्याला न्यायालयाने तुरुंगात पाठवलेले होते. अनिल याने केलेल्या जो गुन्हा होता, त्याला जामीन मिळत होता म्हणून सुशीला हिने न्यायालयामध्ये एका वकिलाच्या मदतीने आपल्या पतीला जामीन मिळावा म्हणून अर्ज करण्यासाठी सांगितले. त्यासाठी त्या वकिलाने सुशीलाकडून ६५ हजारांची रक्कम मागितली. सुशीलाने ती ६५ हजारांची रक्कम वकिलाला दिली.

दरम्यान वकिलाने कागदपत्र बनवून तुमच्या पतीला २५ हजार रुपयाचा जामीन मंजूर झाला असून, २५ हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. सुशीलाने आपल्या नातेवाइकांना सोबत घेऊन २५ हजार रुपये वकिलाच्या हातात दिले व थोड्या वेळानंतर तो पीठासीन अधिकाऱ्यांकडून एक लिफाफा घेऊन आला. सीलबंद असा लिफाफा होता, त्यामध्ये जामिनला दिलेली पंचवीस हजारांची पावती आणि कागदपत्र आहेत, असे वकिलाने सुशीलाला सांगितले व हा जो कागदपत्र असलेला लिफाफा आहे तो तुरुंगाच्या इथे बॉक्स असेल त्यामध्ये टाकायचा आणि मग थोडा वेळ तुमच्या पतीला सोडलं जाईल, असं सांगण्यात आलं. सुशीला आणि सुशीलाचे नातेवाईक तुरुंगाच्या ठिकाणी गेले आणि तो लिफाफा तुरुंगाच्या बाहेर असलेल्या एका बॉक्समध्ये टाकला खूप वेळ झाला तरी आपल्या पतीला का सोडण्यात आलं नाही म्हणून तिथल्या अधिकाऱ्यांशी तिने विचारपूस केली असता तिथल्या अधिकाऱ्याने सांगितले की, तुमच्या लिफाफ्यामध्ये २५००० रु. भरल्याची पावतीच नव्हती आणि कागदपत्र अपूर्ण होते. त्यामुळे आम्ही तुझ्या पतीला सोडू शकत नाही.

त्यानंतर तिने आपल्या वकिलाला फोन केला असता, त्याने उडवा-उडवीची उत्तर दिले म्हणून तिने दुसऱ्या दिवशी न्यायालयात जाऊन वकिलाची भेट घेतली. त्यावेळी वकिलाने तिला, तुमच्या पतीविरुद्ध परत कोणीतरी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ते गोंधळ झाला असेल, असे उडवाउडवीचे उत्तर दिले. आता पुन्हा आपल्याला जामिनाचा अर्ज घ्यायचा असेल, तर २५००० रुपये परत भरावे लागतील, असं सुशीलाला सांगितले.

त्यामुळे सुशीलाने परत २५ हजार रुपये आपल्या वकिलाला दिले. वकिलाने पुन्हा तसाच लिफाफा आणून दिला आणि तीच प्रोसेस पुन्हा करण्यास सांगितली. तसं तिने पुन्हा केले आणि पुन्हा आपल्या पतीला का सोडलं जात नाही म्हणून चौकशी केली असता, त्यावेळी तेथील अधिकाऱ्याने सांगितलं की, तुमच्या पतीला सोडण्यासाठी कागदपत्रे अपूर्ण आहेत. त्यावर इतर वकिलांकडे चौकशी केली असता, तिच्या पतीचा नावाचा उल्लेख असलेले ते कागदपत्र नव्हते. तो वेगळ्याच व्यक्तीचा जुना असा जामीन मंजूर झालेला पेपर होता. याचा जाब तिने पहिल्या वकिलाला विचारला असता, तेव्हाही त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. तिला धमकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वकिलाविरुद्ध गुन्हा नोंद करून न्यायालयात दाद मागितली. न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर पीठासीन अधिकाऱ्याने सांगितलं की, असा कोणताही जामीन अर्ज आमच्या न्यायालयातून मंजूर झालेला नाही किंवा मी मंजूर केलेला नाही.

अशिक्षित असल्याने कशा प्रकारे पोलीस स्टेशन ते न्यायालयामध्ये फसवणूक केली जाते, याचे हे ढळढळीत उदाहरण आहे. अशिक्षित लोक आहेत, त्यांच्याकडे चुकीचा जामीन मिळालेला अर्ज सुशीला यांना देण्यात येत होता आणि तिला समजत नसल्यामुळे वकील पैशांवर पैसे उकळत होता. अशाही प्रकारची लोकांची फसवणूक न्याय देणारे लोकच कधीकधी करतात. त्यामुळे न्याय आणि न्यायालयावरचा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे. समाजामध्ये अशीही लोक आहेत, ज्यांची न्यायासाठी फसवणूक केली जाते.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -