Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजनित्यानंद महाराजांसाठी प्रसिद्ध असलेले गणेशपुरी मंदिर

नित्यानंद महाराजांसाठी प्रसिद्ध असलेले गणेशपुरी मंदिर

कोकणी बाणा: सतीश पाटणकर

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे गणेशपुरी हे ठिकाण उत्तम पर्यटनाचं ठिकाण म्हणून पुढे येत आहे. ऐतिहासिक मंदाकिनी पर्वत व वज्रेश्वरी मातेच्या वास्तव्याने पावन झालेली ही जागा अनेक ऋषिमुनी व देवतांच्या पाऊलखुणांनी पवित्र झालेली आहे. गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडांमुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांमधील महत्त्वाचं स्थळ आहे. नाशिक बायपासमार्गे कल्याण फाट्यावरून डावीकडे वळल्यानंतर भिवंडीमार्गे येथे जाता येतं. पुढे भिवंडी वाडा या महामार्गावर अंबाडी या नाक्यापासून पाच ते सहा किमी अंतरावर गणेशपुरी हे ठिकाण आहे.

मुंबईच्या अगदी उत्तरेकडील उपनगरात नित्यानंद महाराजांसाठी प्रसिद्ध असलेले गणेशपुरी मंदिर आहे. दक्षिण भारतातील कोझिकोड जिल्ह्यातील तुनेरी गावात चतुनायर आणि उन्नी अम्मा या गरीब जोडप्याला एक बाळ दिसलं. धो धो कोसळणाऱ्या पावसात एक नाग फणा काढून त्या बालकाचं पावसापासून रक्षण करत होता. हे दृष्य पाहून चतुनायर आणि उन्नी अम्मा अवाक् झाले. भगवान शिवाने दृष्टांत देत या जोडप्याला ज्या ठिकाणी जाण्यास सांगितलं होतं, ते हेच ठिकाण होतं. त्यांनी त्या बालकाला आपल्यापाशी घेतलं आणि त्या बालकाला आपल्या घरी आणलं. या मुलाचं नामकरण रमण असं केलं गेलं. गावातले लोक त्या मुलाला राम म्हणू लागले. राम एकदा आजारी पडला असताना भगवान शिवाने पुन्हा एकदा दृष्टांत देत त्या मुलाचं रक्षण केलं होतं आणि मग त्या मुलाला कोणतीही बाधा झाली नाही असं सांगण्यात येतं. राम बाल्यावस्थेपासून वैरागी होता. मात्र त्याच्या तोंडून जे शब्द बाहेर पडत असत, ते खरे होत असल्याने राम हा साधारण बालक नाही हे त्या गावच्या लोकांनी एव्हाना ओळखलं होतं. राम वेद आणि धर्मशास्त्र याची शिकवणही न घेता धडाधड आपल्या मुखातून त्यांची महती लोकांपर्यंत पोहोचवू लागला. एकदा रामने एका रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो रुग्ण बरा झाला. तेव्हापासून गावाचा ओढा रामभोवती फिरू लागला.

‘राम’चे वडील चतुनायर ईश्वर अय्यर नामक व्यक्तीकडे काम करत होते. एकदा ईश्वर अय्यर यांच्या विनंतीने ‘राम’ने त्यांना सूर्याचं दर्शन घडवलं होतं. त्यादिवशी अय्यर यांनी ‘राम’ला तू सर्वांना आनंद देतोस, त्यामुळे तुला लोकं यापुढे नित्यानंद नावाने ओळखतील, असं सांगितलं आणि पुढे हाच राम नित्यानंद नावाने ओळखला जाऊ लागला. हिमालयात अनेक वर्षे आणि काशीमध्ये काही वर्षे घालवल्यानंतर, नित्यानंद महाराजांनी महाराष्ट्रातल्या मुंबईजवळच्या गणेशपुरीला आपले श्रद्धास्थान म्हणून निवडले. अतिशय पुरातन शिवमंदिर भीमेश्वर महादेवजवळ ते राहू लागले. काही भक्त त्यांना भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानतात, तर काही भक्त त्यांना शिवाचा अवतार मानतात. आपली कर्मभूमी म्हणून गणेशपुरी हे स्थान का निवडलं? याबाबत नित्यानंद महाराज सांगत की, ही भूमी संतांची भूमी आहे. ही भूमी पावन भूमी आहे. आजही अनेक तपस्वी गणेशपुरीजवळील मंदाग्नी पर्वतावर तप करताना पाहायला मिळतात. भलेही आज नित्यानंद महाराज देहाने आपल्यात नसले तरीही त्यांचा भास गणेशपुरीला आल्यावर होतो असं भक्त सांगतात. काही जुन्या जाणत्या व्यक्ती नित्यानंद महाराजांना

हवेत कुणाशी तरी बोलताना पाहायला मिळत असल्याचंही सांगत. आजही येथे भगवान नित्यानंदांची उपस्थिती जाणवते.
गणेशपुरी येथे स्वामी नित्यानंद महाराजांची समाधी आहे. १९३६ पर्यंत ते वज्रेश्वरी येथे राहायचे आणि नंतर ते गरम पाण्याचे झरे असलेल्या गणेशपुरी या जवळच्या गावात आले. भल्या पहाटे ते गावाभोवती असलेल्या नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये स्नान करत आणि नंतर नदीजवळील भीमेश्वर महादेवाच्या बेटावर ध्यान करत. मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला या भौतिक जगापासून दूर गेल्याचा आभास होतो. मंदिराला भेट देणारे भाविक स्वामी नित्यानंद यांच्या मूर्तीकडे टक लावून पाहतात आणि त्यांना जणू जगाचा विसर पडतो. इथे अर्पण केलेली फुले, नारळ इत्यादी स्वामींच्या चरणी आशीर्वाद घेतल्यानंतर भक्तांना परत केले जातात.

गणेशपुरी हे नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. स्वामींनी इथे कुंड (गरम पाण्याचे झरे) बांधले आणि गावकऱ्यांना ते पवित्र असल्याने नियमित स्नान करण्यास सांगितले. १९६० च्या दशकात त्यांनी येथे समाधी घेतली. याखेरीज, गणेशपुरी हे गणेशभक्तांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. येथे श्री गणेशाचे प्राचीन मंदिर आहे, जे १२व्या शतकात बांधले गेले असे मानले जाते. मंदिराचे मूळ बांधकाम यादव राजवटीत झाले होते. मंदिराचे पुनर्निर्माण १८व्या शतकात करण्यात आले होते. मंदिर हे त्याच्या सुंदर शिल्पकाम आणि वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. मंदिर एक सुंदर आणि भव्य वास्तू आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे या उत्सवाला हजेरी लावतात.(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -