संगमनेर (प्रतिनिधी)– संगमनेर शहर पोलिसांकडून गोल्डन सिटी परिसरात सुरु असलेल्या शहरातील जुगार अड्यावर छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात शहरासह ग्रामीण भागातील दहा जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांच्या ताब्यातून तब्बल पाच लाख 69 हजार रुपयांच्या मुद्देमालासह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या वृत्ताने मात्र संगमनेर शहरातील अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई शनिवारी (ता. 13) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गोल्डन सिटी परिसरातील बुवासाहेब नवले नगर भागात असलेल्या काटवनात करण्यात आली. याबाबत शहरचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार संगमनेर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ढुमणे यांनी फौजफाट्यासह सदर ठिकाणी छापा घातला असता संगमनेरातील सर्वात मोठा जगार अड्डा सरु असल्याचे समोर आले आहे
या कारवाईत पोलिसांनी दीपक किसन अरगडे (वय 42, रा. सिद्धिविनायक सुपर मार्केट मागे, मालदाड रोड) याच्या ताब्यातून 20 हजार 286 रुपयांचा, भगवान खंडू राहणे (वय 56 वर्ष, रा. लक्ष्मीनगर) याच्या ताब्यातून 10 हजार 100 रुपयांचा, मंगेश लक्ष्मण सातपुते (वय 41, रा. पावबाकी रोड) याच्या ताब्यातून 12 हजार 180 रुपयांचा, जितेंद्र संभाजी दवे (वय 49, रा. साईनगर) याच्या ताब्यातून 2 हजार 200 रुपयांचा, प्रवीण उर्फ भाऊ बाळूसिंग चव्हाण (वय 50, या. चव्हाणपूरा) याच्या ताब्यातून 5 हजार 335 रुपयांचा, बाळासाहेब शिवराम अरगडे (वय 43, रा. राहाणे आखाडा, गुंजाळवाडी) याच्या ताब्यातून 30 हजार 280 रुपयांचा, चेतन दिलीप ठाकूर (वय 28, रा. पार्श्वनाथ गल्ली) याच्या ताब्यातून 12 हजार एकशे सत्तर रुपयांचा, शेटीबा दामू पवार (वय 52, रा. रामनगर झोपडपट्टी) याच्याकडून 9 हजार 180 रुपयांचा असा एकूण 5 लाख 69 हजार 231 रुपयांचा मुद्देमाल व तिरट नावाचा जुगार खेळण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील दहा जुगाऱ्यांवर मुंबई जुगार कायद्याचे कलम 12 (अ) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सदरची कारवाई संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल, सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे, रोहिदास शिरसाट, विवेक जाधव व महिला पोलीस शिपाई स्वाती ठोंबरे यांच्या पथकाने केली.