कथा: रमेश तांबे
आजचा दिवस पक्षीप्रेमी राजूसाठी वेगळाच होता. तो शाळेत जात असताना एक कावळ्याचे पिल्लू रस्त्यावर उताणे पडलेले त्याला दिसले. तो लगेचच तिकडे धावला. बिचारं पिल्लू जखमी झालं होतं. त्याच्या पंखात कसलासा धागा अडकला होता. त्याने ते पिल्लू हळूच उचलले आणि हळुवारपणे त्याच्या पंखात अडकलेला धागा काढला. बाटलीतलं पाणी हातावर घेऊन थेंब थेंब त्याच्यात चोचीत सोडले. दप्तरातून एक छोटासा डबा बाहेर काढला. त्यात हळदीची पूड होती. ती त्याने पिल्लाच्या जखमेवर टाकली. हे सारं करत असताना आजूबाजूला अनेक कावळे जमा झाले. झाडावर बसून काव काव करू लागले. कावळ्यांना शिवायचं नसतं, कावळ्यांना शिवणाऱ्या माणसांवर ते हल्ला करतातच, पण माणसांना शिवणाऱ्या कावळ्यांनादेखील ते टोचून मारतात. हे सारं राजूला ऐकून माहीत होतं. अनेकदा एखाद्या कावळ्यावर तुटून पडलेला थवादेखील त्याने पाहिला होता. पण राजू सहृदयी होता. जखमी पिल्लाला मदत करणं, त्याला पाणी पाजून त्याच्या जखमेवर औषध लावणं हे तो त्याचं कर्तव्य समजत होता. म्हणूनच पुढे येणाऱ्या संकटांची पर्वा न करता राजूने धावत जाऊन जखमी पिल्लाला मदत केली होती.
कावळ्याच्या जखमी पिल्लाला सोबत घेऊन राजू शाळेच्या दिशेने निघाला. सोबत त्याच्या डोक्यावरून प्रचंड आवाज करणारी कावळ्यांची झुंड! कावळ्यांच्या त्या कलकलाटाने सारा आसमंत दणाणून गेला होता. पण त्याने ते पिल्लू सोडलेच नाही. चालता चालता तो शाळेजवळ पोहोचला. शाळेच्या वऱ्हांड्यात राजूने स्वतः तयार केलेला एक भला मोठा पिंजरा होता. आत अंथरलेल्या एका स्वच्छ कपड्यावर त्याने पिल्लाला अलगद ठेवले. दप्तरातल्या पुरचुंडीतलं थोडसं धान्य आणि पाणी ठेवून त्याने पिंजरा व्यवस्थित बंद केला. दरवाजा बंद करताना राजूने पिल्लाकडे पुन्हा एकदा पाहिले. त्याला ते बऱ्यापैकी तरतरीत वाटले. त्याचे टपोरे पाणीदार डोळे राजूला समाधान देऊन गेले. पण आता कावळ्यांची काव काव कानावर पडत नाही, याचं भान राजूला नव्हते.
शाळा भरली होती. राजू पटकन आपल्या वर्गात जाऊन बसला. नंतर मुख्याध्यापक व शिपाई पिंजऱ्याच्या दिशेने जाताना दिसले. तेवढ्यात शिपाईकाका धावत वर्गात आले आणि म्हणाले, “राजू लवकर बाहेर ये मुख्याध्यापकांनी बोलावले आहे.” राजू बाहेर येऊन बघतो तर काय शाळेच्या पटांगणात शेकडो कावळे जमले होते. अक्षरशः कावळ्यांमुळे मैदान काळेकुट्ट दिसत होते. पण सारे शांत. कुठेही कावकाव नाही, की उगाच पंखांची फडफड नाही. सारे कसे शिस्तीत उभे होते. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला मुले कवायतीला उभी राहतात तशीच सावधान असल्यासारखी!
राजूने सरांकडे पाहिले. एवढे कावळे जमलेत आता काय करायचं? हे मोठे प्रश्नचिन्ह सरांच्या चेहऱ्यावर राजूला दिसत होते. राजूने कावळ्याचं जखमी पिल्लू शाळेत आणलंय, त्यामुळेच कावळे जमलेत हे सरांनी ओळखले होते. आता सर्व मुलं शाळेच्या वऱ्हांड्यात उभी राहून समोरचा तो कावळ्यांचा काळा समुद्र बघू लागली. सारे कावळे एकजात शांत होते. पण इकडे मुलांची भीतीयुक्त कुजबूज सुरू झाली. कित्येक मुलं घाबरली. काही वर्गात पळून गेली. प्रसंग मोठा बाका होता. मुख्याध्यापक म्हणाले, “राजू दे त्या पिल्लाला सोडून!” “पण सर त्या कावळ्यांनी पिल्लाला मारलं तर?” राजू घाबरतच म्हणाला. तसे मुख्याध्यापक म्हणाले, “अरे मला पण कळतंय ते. पण एवढ्या सर्व कावळ्यांनी आपल्यावर हल्ला केला तर? मग त्याची जबाबदारी कोण घेणार!” आता मात्र राजू कात्रीत सापडला. पिल्लू सोडलं, तर कावळे त्याला टोचून मारणार. क्षणार्धात त्याचा फडशा पाडणार.
एवढं जीवापाड जपलेलं पिल्लू मरणाच्या दाढेत ढकलायला राजूचं मन तयार होईना. पण दुसऱ्या बाजूला एवढ्या प्रचंड कावळ्यांनी मुलांवरच हल्ला केला तर! त्यांंना जखमी केलं तर? राजू मनोमन निसर्गदेवतेचा धावा करू लागला. माणसाला शिवणाऱ्या आपल्याच भाऊबंदांना कावळे खरंच मारतात? की, हा केवळ आपला समज आहे! कावळ्यांचं प्रेम नसतं आपल्या मुलाबाळांवर! एवढ्या का परंपरा प्रिय असतात त्यांना? आतापर्यंत माणसांना आपल्या परंपरा, आपली जात, धर्म प्राणाहूनही प्रिय असतो हे माहीत होतं. पण हे पक्षीदेखील माणसांचे पाहून जात, धर्म, शिवाशीव, स्पृश्य-अस्पृश्यता पाळू लागले की काय असे राजूला वाटू लागले. राजूने मनातले सारे विचार झटकून टाकले आणि मनाचा हिय्या करून पिल्लू सोडून द्यायचे ठरवले.
दोन्ही हाताची ओंजळ करून राजूने पिल्लाला समोर बसलेल्या कावळ्यांच्या प्रचंड थव्यासमोर धरले आणि काय आश्चर्य पिल्लाने पंख हलवले अन् सारे जण त्या उडणाऱ्या पिल्लाकडे बघत राहिले. आता तो कावळ्यांचा प्रचंड समुदाय त्या पिल्लाचं नक्की काय करणार याकडे जो तो श्वास रोखून पाहू लागला. सारे कावळे पिल्लावर झडप घालणार असे वाटत असतानाच… काहीच घडले नाही. ते पिल्लू सरळ त्या गर्दीत घुसले आणि त्यातलेच एक होऊन गेले. आता मात्र कावळ्यांचा बांध फुटला. प्रचंड आवाजात काव काव सुरू झाली आणि सारे आकाश कावळ्यांनी भरून गेले. दोनच मिनिटांत सगळं मैदान खाली झालं. साऱ्या मुलांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. कावळ्यांनी पिल्लाला स्वीकारलं याचं खूप समाधान राजूला झालं. शेवटी राजू पुटपुटला, “सगळ्यांनाच आपली मुलं प्रिय असतात, मग ती माणसांची असो वा पक्ष्यांची! कारण मुलं म्हणजे देवाघरची फुलं!”