Friday, July 12, 2024
Homeताज्या घडामोडीVasai Crime News : आधी अपहरण मग हत्या करुन मृतदेह रस्त्यावर फेकून...

Vasai Crime News : आधी अपहरण मग हत्या करुन मृतदेह रस्त्यावर फेकून आरोपी फरार!

वसईतील धक्कादायक प्रकार

वसई : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Crime cases) प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. यातील एकेक गुन्हा ऐकून थरकाप उडतो. वसई विभागातून देखील अशीच एक धक्कादायक घटना (Vasai Crime News) समोर आली आहे. अंगावर शहारे आणणार्‍या या घटनेत नऊ ते दहा जणांच्या टोळक्याने २७ वर्षीय मुलाचे अपहरण केले, त्याची हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून आरोपी फरार झाले. काल उघड झालेल्या या घटनेमुळे वसई शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पूर्ववैमनस्यातून या तरुणाची वसईत हत्या करण्यात आली. दोन रिक्षांमधून आलेल्या ९ ते १० जणांच्या टोळक्याने तरुणाचं अपहरण करुन हत्या केल्याचं उघड झालं आहे. हत्येच्या घटनेनं वसई शहर पुरतं हादरुन गेलं आहे. माणसं जमवून, अपहरण करून, निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपींच्या तपासासाठी पोलीस आयुक्तालयातही गुन्हे शाखेच्या चार आणि पेल्हार पोलीस ठाण्याच्या तीन टीम अशा एकूण सात टीम रवाना झाल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

सुधीर सिंह (वय २७) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून, हा तरुण कांदिवली येथे राहणारा आहे. ५ वर्षांपूर्वी हा तरुण नालासोपाऱ्यात राहत होता. गुरुवारी सुधीर सिंग हा त्याचा मित्र वैभव मिश्रा याच्यासोबत नालासोपारा पूर्व वालईपाडा उपाध्याय नगर चाळीत रूम बघण्यासाठी आला होता. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ९ ते १० जणांचं टोळकं दोन रिक्षात भरून आलं. गौराईपाडा पार्किंगच्या मोकळ्या जागेत या टोळक्यानं लाकडी दांडे, धारदार हत्यारानं सर्वात आधी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला रिक्षात घालून, गावराईपाडा नाक्यावर नेऊन फेकून दिलं आणि सर्व आरोपी तिथून फरार झाले.

रात्री साडेबाराच्या सुमारास मयताच्या मित्राने पेल्हार पोलिसांना याची माहिती दिली असता, पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकाची टीम पाठवून शोध घेतला असता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुणाचा मृतदेह नालासोपारा पूर्व गावराईपाडा येथे आढळून आला.

दरम्यान, आरोपींनी पूर्ववैमनस्यातून अपहरण करून तरुणाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दोघांची ओळख पटली असून लवकरच आरोपी पकडण्यात येतील, असं आश्वासन पोलिसांच्या वतीने देण्यात आलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -