
पश्चिम आणि हार्बर मार्गिकेवर काय बदल?
मुंबई : रविवारी बहुतेक लोकांना कामाला सुटी असते, त्यामुळे या दिवशी रेल्वेचा मेगाब्लॉक (Railway Megablock) घेऊन काही कामे उरकली जातात. पण या आठवड्यात मध्य रेल्वेवर (Central Railway) रविवारी नाही तर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी या मार्गिकेवर कोणताही ब्लॉक नसेल. ठाणे ते कल्याण पाचव्या-सहाव्या मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असणार आहे.
वडाळा रोड ते मानखुर्ददरम्यान अप-डाउन मार्गावर हार्बर रेल्वेने (Harbour Railway) रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर (Western Railway) सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
पश्चिम रेल्वे :
पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १० ते सायंकाळी ५ ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे :
हार्बर रेल्वेवर वडाळा रोड ते मानखुर्द अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे वडाळा रोड ते मानखुर्द, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी/बेलापूर/पनवेल अप-डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते गोरेगाव लोकल वेळापत्रकानुसार धावतील. पनवेल ते मानखुर्ददरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे :
मध्य रेल्वे ठाणे ते कल्याणच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर शनिवारी रात्री ११.४० ते रविवारी पहाटे ३.४० पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील मेल-एक्स्प्रेस जलद अप-डाउन मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. यामुळे मेल-एक्स्प्रेस १५-२० मिनिटे विलंबाने धावणार आहेत. रात्रकालीन ब्लॉकमुळे सीएसएमटी ते कल्याणदरम्यान रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.