
नितीश कुमार यांनी संयोजकपद नाकारले
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांची विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. इंडिया आघाडीच्या व्हर्चुअल बैठकीत खरगे यांच्या नावावर एकमत झाले. मात्र यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना समन्वयक बनवण्याची चर्चा होती. त्याआधीच इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी खरगे यांची निवड केल्याने नाराज झालेल्या नितीशकुमार यांनी समन्वयकपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. मला कोणत्याही पदाची इच्छा नाही, असे नितीशकुमार यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षांच्या बैठकीत जागावाटपापूर्वी अध्यक्षांच्या नावावर एकमत झाले असले तरी अंतर्गत धूसफूस मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, विरोधी पक्षांच्या आघाडीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाचा फॉर्मुला अद्याप निश्चीत झालेला नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे या पदासाठी उमेदवार होते. आघाडीच्या बैठकीत संयोजक पदावरही चर्चा झाली. मात्र बैठकीत खुद्द नितीश कुमार यांनीच काँग्रेसच्या नेत्याने हे पद सांभाळले पाहिजे असे सांगितले आणि स्वत: समन्वयकपद स्वीकारण्यास नकार दिल्याने विरोधी पक्षांच्या आघाडीत संभ्रमाचे वातावरण आहे.