
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा तरुणाईला सल्ला
डहाणू (प्रतिनिधी) : आधुनिक तंत्रज्ञान हे प्रगतीचे माध्यम आहे,तर लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचे माध्यम कमळ आहे, विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून, गेल्या दहा वर्षात लाभार्थ्यापर्यंत अनेक योजना पोहोचविण्या बरोबरच लाभार्थ्यांचे प्रबोधन करून २०३० पर्यंत भारत देश जगात तिसऱ्या नंबरवर येऊन, दरडोई उत्पन्न वाढवून जीडीपी वाढवायचा आहे, त्यासाठी ५४ योजना आणल्या असून, ८० कोटी लोकांना मोफत धान्य मिळत आहे, तर आयुष्मान भारत योजनेतून पाच लाखापर्यंतची मदत मिळत आहे, शिवाय शाळेतील मुलांना सवलत, मुद्रांक कर्ज योजना, ४१ कोटी गावातील लोकांना सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हाती घेतल्याचे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.
डहाणू येथील दशाश्री माळी सभागृहात, शनिवारी लाभार्थी आणि भाजप कार्यकारणी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते, यावेळी भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरतसिंग राजपूत, लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकुमार पाटील, जिल्हा परिषद गटनेत्या सुरेखा थेतले,राणी द्विवेदी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे, हरिश्चंद्र भोईर, जगदीश राजपूत, मिलिंद मावळे, देवानंद शिंगडे आदी नेते उपस्थित होते.
प्रारंभी भारतसिंग राजपूत यांनी सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांना पुष्पहार, शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच विविध संस्था आणि व्यक्तीने ही त्यांना सन्मानित केले.
आगामी पालघर लोकसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो शिरसावंद मानून, त्या उमेदवाराला शंभर टक्के निवडून देण्याची हमी देत असल्याचे तसेच सध्या विधानसभेवर पालघर जिल्ह्यातील भाजपचा एकही उमेदवार नसला तरी यापुढे त्याचा विचार करण्यात यावा, असे पालघर जिल्हा भाजप अध्यक्ष भरतसिंग राजपूत यांनी सांगितले. सुरेखा थेतले यांनी नरेंद्र मोदी यांनी मोफत धान्य योजना,जनधन जीवन योजना, विकसित भारत संकल्प योजना, जलजीवन मिशन योजना, आयुष्यमान भारत योजना अशा ११७ योजना आखल्याचे सांगितले.
नारायण राणे पुढे म्हणाले की, पालघरची साक्षरता ६६ टक्के असून,महाराष्ट्राची ७९ टकके आहे, मुंबईसारखे व्हायचे असेल तर मानसिकतेची तयारी दाखविण्याची जरुरी आहे,व्यवसाय करण्यासाठी मशनरी, तंत्रज्ञान, प्रशिक्षण, कर्जपुरवठा, मार्केटिंग ही व्यवस्था करण्यास सरकार तयार असून त्यासाठी मेहनत, परिश्रम आणि बुद्धिमत्तेची जोड द्यायला पाहिजे, महाराष्ट्रात भाजपचे सरकार हे लोकहिताचे सरकार आहे, लोक कल्याणासाठी अनेक योजना असून त्या समजून घेतल्या पाहिजेत, लहान सहान गोष्टींतून हजारो उद्योग उभारण्यासारखे आहेत. त्यांतून उत्पादित होणाऱ्या मालाची निर्यात होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉस्पिटलसाठी आयात केलेले एमआरआय मशीनचे उदाहरण दिले. कोकणात उद्योग उभारण्यासारखे बरेच काही असून त्याला मेहनतीची जोड द्यायला हवी असेही नारायण राणे यांनी सांगितले.