Wednesday, July 24, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखनमो विकासपर्व, तरूणाईला साद

नमो विकासपर्व, तरूणाईला साद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशाची धुरा सांभाळल्यापासून आजतागायत त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीत प्रगतीचा आलेख उंचावतच चालला आहे. मोदींच्या उक्ती आणि कृतीत एकवाक्यता असल्याने त्यांच्यावर टीका करण्याची संधी मागील दहा वर्षांच्या कालावधीत विरोधकांना मिळालीच नाही. पंतप्रधान मोदी शुक्रवारी महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि नाशिकमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी व लोकार्पणासाठी आले होते. मोदी बोलत नाहीत, तर त्यांची विकासकामे बोलतात हे देशवासीयांनी गेल्या दशकभराच्या कालावधीत जवळून पाहिले आहे, अनुभवले आहे. त्यांच्या कृतीतून ते एक वेगळाच संदेश देत असतात, त्या संदेशापासून प्रेरणा मिळत असते. पंतप्रधानपदाची धुरा सांभाळण्याअगोदर मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून गुजरातचा विकास केला होता. त्यांनी गुजरातमध्ये केलेला विकास जवळून पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक राजकीय घटकांनी त्यावेळी गुजरातचा दौराही केला होता.

मनसे सुप्रिमो राज ठाकरे यांनी त्यावेळी गुजरात दौऱ्यावरून आल्यावर मोदींच्या विकासकामांची प्रशंसा करताना महाराष्ट्रातील प्रस्थापितांना त्यापासून बोध घेण्याचेही आवाहन केले होते. मोदींची कार्यप्रणाली पाहता, ते आपल्यावर होत असलेल्या आरोपांची कधी दखल घेत नाहीत. विरोधकांशी शब्दांनी वाद न घालता देशविकासाच्या कृतीतून ते चपराक लगावत असतात. १९१४ पासून भारतीय जनता नरेंद्र मोदींच्या प्रेमात पडलेली आहे. ते प्रेम आजही कायम आहे. मोदींच्या झंझावातापुढे विरोधक निष्प्रभ झाले असल्याने २०१९च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला साधे विरोधी पक्ष नेतेपदही मिळविता आले नाही. जे आजवरच्या पंतप्रधानांना शक्य झाले नाही, ते २२ जानेवारी रोजी प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमी असलेल्या अयोध्यानगरीत राम मंदिराचे लोर्कापण होत आहे.

महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या मोदी यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये रामाचे केवळ दर्शन घेतले नाही तर त्या मंदिरामध्ये स्वत: स्वच्छताही केली. मोदी आणि त्यांचे स्वच्छता प्रेम ही बाब लपून राहिलेली नाही. स्वच्छतेबाबत मोदींनी सातत्याने आग्रही भूमिका मांडलेली आहे. अन्य राजकीय घटक आले असते आणि दर्शन करून गेले असते. पण मोदींनी तसे केले नाही. हाच तर मोदी व अन्य राजकीय घटकांमध्ये फरक आहे आणि याचमुळे मोदी आजही भारतीयांच्या गळ्यातील ताईत आहेत. नाशिकच्या काळाराम मंदिरात त्यांनी आरती केली, मंदिरात स्वच्छता केली आणि गोदातीरी जाऊन गोदावरीची आरतीही केली. मोदींना देशवासीयांची नस समजली आहे. ते आपल्या भाषणांमधून राजकीय टीका न करता केवळ विकासाची भाषा बोलतात. तरुणाईला मार्गदर्शन करतात. विकासाची आगामी रूपरेषा स्पष्ट करतात. शुक्रवारच्या महाराष्ट्र दौऱ्यातही त्याची पुन्हा एकवार प्रचिती आली. तरुणांनी राजकारणात यावे अशी साद पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र भेटीदरम्यान केली आहे. राजकारणाची धुरा तरुणाईच्या हाती असल्यास प्रगती साधणे शक्य होते.

तरुणाईंने राजकारणात येऊन राजकारणातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेतल्यास देशाला कमी वयातच प्रगल्भ व युवा नेतृत्व उपलब्ध होईल. तरुणाईंने सोशल मीडियावर राजकीय भाष्य करणे, आपला उद्रेक व्यक्त करणे यामुळे राजकारणाबाबत तरुणाईचा आकस वाढला आहे. त्यामुळे तरुण स्वत: राजकारणात उतरल्यास त्यांना राजकारण काय असते ते अनुभवता येईल, त्यात सुधारणा करता येईल, त्यासाठी तरुणाईने राजकारणात येणे आवश्यक आहे, ही गोष्ट ओळखून पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे. लोकशाहीबाबत अनेक जण वेगवेगळे भाष्य करत असतात. मतदानाचा कमी होत चाललेला टक्का ही लोकशाहीसाठी चिंताजनक बाब आहे. मतदान करण्याची उदासीनता असलेल्यांना लोकशाहीबाबत बोलण्याचा काही अधिकारच नाही. मतदानाबाबतच नाहीतर मतदार नोंदणीबाबतही भारताच्या युवकांमध्ये अलीकडच्या काळात उदासीनता पाहावयास मिळत आहे. त्यामुळे हाच धागा पकडत पंतप्रधान मोदी यांनी आज आपल्या भाषणात नवमतदारांनी सर्वप्रथम आपली मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. मतदार नोंदणी झाली तरच त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्यांना आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे.

भाजपाने मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये प्रचार करताना शिवछत्रपतींचा आशीर्वाद मोदींसोबत अशी टॅगलाईन वापरत मतदारांसमोर प्रचार केला होता. त्यात बऱ्याच अंशी तथ्यही आहे. महाराष्ट्रातील विविध राजकीय घटक शिवछत्रपतींचे नाव घेत त्यांच्या नावाने टाहो फोडतात. काही राजकीय घटकांची गेल्या काही वर्षांपासून शिवछत्रपतींच्या नावाने राजकीय दुकानदारीही चालू आहे; परंतु शिवछत्रपतींचे नाव न घेता शिवछत्रपतींचे विचार, आदर्श कृतीतून उतरविणे आवश्यक आहे. अशीच आमुची माता सुंदर असती तर आम्ही सुंदर असतो – वदले छत्रपती. हे आपणास कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या बाबतीत पाहावयास मिळाले आहे. मोदींनी शिवचरित्राचे नुसते वाचनच केले नाही तर विचारांतून, कृतीतून तसे अनुकरणही केले आहे. महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी महिलांवरून अपशब्द न वापरण्याचे आवाहन केले आहे.

महिलांचा आदर करण्याची भूमिका त्यांनी सातत्याने मांडली आहे. व्यसनामुळे घराची, समाजाची व देशाचीही हानी होत असल्याने त्यांनी तरुणाईला व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक उत्पादने वापरण्याचा आग्रह केला आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती वाढेल. स्थानिक उत्पादनांना स्थानिक भागातच बाजारपेठ उपलब्ध होईल. मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याने महाराष्ट्रीय जनतेला खूप काही दिले आहे. त्यांच्या भाषणातून बोध घेतल्यास महाराष्ट्राचा केवळ भौगोलिकच नाही, तर सांस्कृतिक व मानसिक विकासही होण्यास मदत होईल. त्यांच्या भाषणातून खूप काही बोध घेण्यासारखे आहे. त्यामुळे मोदींनी विकासकामांचे लोर्कापण करताना सामाजिक भाष्यातून तरुणाईंचेही प्रबोधन
केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -