Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीSwarajya kanika Jijau : जिजाऊंच्या जयंतीदिनी खास घोषणा; अभिनेत्री तेजस्विनी पंडित साकारणार...

Swarajya kanika Jijau : जिजाऊंच्या जयंतीदिनी खास घोषणा; अभिनेत्री तेजस्विनी पंडित साकारणार जिजाबाई!

नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : आज १२ जानेवारी म्हणजे स्वराज्यजननी जिजामाता (Swarajya Janani Jijamata) यांची जयंती. शिवबा महाराष्ट्राला लाभले यामागे जिजाऊंच्या संस्कारांची मोठी शिकवण आहे. असं म्हणतात की, ‘शिवबा जन्मण्यासाठी आधी जिजाऊ घडाव्या लागतात’. हाच विचार समोर ठेवून आज जिजाऊंच्या जन्मदिनी एका नव्या चित्रपटाची (Marathi Movie) घोषणा करण्यात आली आहे. ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ (Swarajya kanika Jijau) असं या चित्रपटाचं नाव आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) या चित्रपटात जिजाऊंची भूमिका साकारणार आहे.

मराठी मनोरंजन विश्वात सध्या ऐतिहासिक सिनेमांची (Historical Movies) चांगलीच चर्चा आहे. शेर शिवराज, पावनखिंड, सुभेदार अशा अनेक सिनेमांनी लोकांचं प्रेम मिळवलं. आगामी शिवरायांचा छावा चित्रपटाची सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. याशिवाय या सिनेमांनी बॉक्स ऑफीसवर सुद्धा चांगली कमाई केली. अशातच आता आणखी एक ऐतिहासिक मराठी सिनेमा सज्ज आहे. जगाला दिशा देणाऱ्या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले. बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून या माऊलीने स्त्रीशक्ती व मातृशक्तिचे चिरंतन उदाहरण आपल्या सर्वांस दिले. या माऊलीबद्दल प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

जिजाऊ या चित्रपटाचे पोस्टर झळकले असून राजमाता जिजाऊ यांची करारी मुद्रा यात दिसत आहे. ६ फायरफ्लाईज प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन अनुजा देशपांडे यांनी केले आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘“दिल्लीपती” कोण असावा हे रायगडावर बसून “हिंदुपती” ठरवणारा ज्यांनी छत्रपती घडविला. स्वराज्याचा वसा घेऊन प्रत्येक मराठी मनावर ठसा उमटवणार्‍या राजमाता जिजाऊसाहेबांना त्रिवार मुजरा व साष्टांग दंडवत’ अशा कॅप्शनसह या सिनेमाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. सिनेमाच्या पोस्टरपासूनच जिजाऊबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला आहे.

तेजस्विनी पंडित म्हणते ‘हे माझे अहोभाग्यच!’

तेजस्विनी पंडित आपल्या भूमिकेबद्दल म्हणाली, “ज्या स्त्रीने गुलामगिरीच्या काळोखात जखडलेल्या हिंद प्रांताला स्वतंत्र राज्य – स्वराज्य मिळावे हे स्वप्न पहिल्यांदा पाहिले, त्यासाठी वर्षानुवर्ष त्या झिजल्या, त्या भूमिकेवर ठाम राहिल्या. कुठलीही गोष्ट प्रवाहाच्या विरोधात जाऊन करणे म्हणजेच क्रांती होय! अशा राजमाता स्वराज्य जननी जिजाऊसाहेबांची भूमिका करायला माझी निवड केली ह्याबद्दल मी अनुजा ताईंची शतशः आभारी आहे. ही भूमिका करायला मिळणं ही निश्चितच आनंदाची बाब आहे मात्र त्याहून जास्त जबाबदारी आहे ह्याची मला पूर्ण जाणीव आहे”.

पुढे ती म्हणते, “ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, त्यांना घडवले ती माऊली स्वतः निश्चितच त्याच ताकदीची, पराक्रमी, अत्यंत कुशल राजनैतिक आणि मुख्य म्हणजे दूर दृष्टीची असणार यात कसलेच दुमत नाही .अशा ह्या विलक्षण वीरमातेला पडद्यावर साकारणे हे माझे अहोभाग्यच!”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -