
जाणून घ्या याचं शास्त्रीय कारण, फायदे आणि लाडू बनवण्याची अत्यंत सोपी पद्धत
'तीळगुळ घ्या आणि गोडगोड बोला' असं म्हणत मकरसंक्रांत (Makar Sankranti) हा सण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. पतंग उडवणे, नातेवाईकांना भेटून तीळगुळ (Til and gul) देणे या सर्व आबालवृद्ध आनंदाने करतात. महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर भारतातील हा मोठा सण आहे. पण या सणाला तीळ (Sesame) आणि गुळाचेच (Jaggery) सेवन का केले जाते? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण आणि इतर फायदे? आजच्या लेखात आम्ही तुम्हाला याविषयी माहिती देणार आहोत, तसंच तिळाचे लाडू बनवण्याची अत्यंत सोपी पद्धत सांगणार आहोत.
मकरसंक्रांत या सणाच्या वेळी भारतात कडाक्याची थंडी सुरु असते. हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला वातावरणासोबत अनुकूल करण्यासाठी उष्णता निर्माण करण्याची गरज असते. गूळ आणि तीळ या दोन्हींचा प्रभाव खूप गरम असतो. थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तीळ-गूळ खाल्ले जातात. त्यामुळे शरीराला ऊब मिळते आणि प्रतिकारशक्ती मजबूत होते. तीळ उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. ज्यांना थंडीचा जास्त त्रास होतो त्यांनी थंडीत अवश्य तीळ खावे.
ज्योतिषशास्त्र काय सांगते?
ज्योतिषशास्त्रात काळ्या तिळाचा संबंध शनिदेवाशी आणि गुळाचा संबंध सूर्यदेवाशी मानला जातो. संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव मकर राशीत शनिदेवाच्या घरी जातो, अशा स्थितीत काळे तीळ आणि गुळाचे लाडू सूर्य आणि शनी यांच्यातील मधुर नाते दर्शवतात. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनि हे दोन्ही ग्रह बलवान मानले जातात. अशा वेळी काळे तीळ आणि गुळाचे लाडू दान करून आणि प्रसाद स्वरूपात खाल्ल्यास शनिदेव आणि सूर्यदेव दोघेही प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने घरात सुख-समृद्धी येते.
हिवाळ्यात तीळ खाण्याचे इतर फायदे काय आहेत?
- हिवाळ्यात त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते. अशावेळी आहारात तिळाचा समावेश केल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.
- तिळाच्या तेलाने मसाज केल्यास त्वचा मऊ मुलायम होते. तसंच दुधामध्ये तीळ भिजवून त्याची पेस्ट करून ते चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
- थंडीमध्ये हाडांची दुखणी वाढतात. विशेषत: ज्यांना संधिवात, सांधेदुखीचा त्रास आहे त्यांचा त्रास तर आणखीच वाढतो. बहुतेकांना थंडीमध्ये पाय दुखण्याचा किंवा गुडघेदुखीचा त्रास जाणवतो. अशावेळेस तिळाचा आहारात समावेश केला तर त्रास खूप कमी होतो.
- रोजच्या जेवणात तिळाची चटणी, तिळकूटाचा वापर केल्याने सांधेदुखी, स्नायूंची दुखणी कमी होतात. तिळात असलेली कॅल्शियम आणि फॉस्फरससारखी पोषणमूल्ये हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत उपयुक्त असतात.
- थंडीत तीळ नियमित खाल्ल्यास स्नायू दुखणं आणि सूज येण्याचा त्रास कमी होतो.
- तीळ आपल्या मेंदूसाठीही चांगले असतात. तिळामध्ये प्रथिने, खनिजे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न आणि कॉपरसारखी अनेक पोषणमूल्ये आहेत. यामुळे मेंदूची क्षमता वाढते. थंडीत आपल्या जेवणात रोज तीळ खाल्ल्यास स्मरणशक्तीही चांगली राहते असं तज्ज्ञ सांगतात.
- ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्या महिलांनी आहारात तिळाचा समावेश केलाच पाहिजे. तिळामध्ये मॅग्नेशियम भरपूर असतं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. अर्थात डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तीळ योग्य प्रमाणात खाल्ले जावेत.
- तीळ आपल्या ह्रदयाच्या आरोग्यासाठीही खूप चांगले आहेत. त्यामुळे थंडीत तिळाचा वापर आपल्या रोजच्या जेवणात करायलाच हवा. यामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, सेलनियम आणि झिंकसारखी पोषणमूल्य असतात.
- ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे. त्यांच्यासाठी तीळ खाणं फायदेशीर आहे. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तीळ खाल्ल्याने ह्रदयाचे स्नायूही मजबूत होतात आणि ह्रदविकाराचा धोका कमी होतो.
- अनेकांना थंडीमध्ये झोप न लागण्याचा त्रास होतो. तिळाचा आहारात समावेश केला तर झोप न येण्याची समस्या दूर होऊ शकते. त्याचबरोबर तिळाच्या सेवनाने तणाव आणि डिप्रेशन कमी होण्यासही मदत होते.
- दातांसाठीही तीळ खाणं चांगलं आहे. सकाळी ब्रश केल्यानंतर तीळ चावून खाल्ल्यानं दात मजबूत होतात. हिरड्यांमधून होणाऱ्या रक्तस्त्रावावरही तीळ गुणकारी आहेत. सतत तोंड येण्याचा त्रास होत असेल तर तिळाच्या तेलात सैंधव मीठ मिसळून ते लावल्यानं आराम पडू शकतो.o
- लघवी स्वच्छ होत नसेल तर तीळ, दूध आणि खडीसाखर एकत्र करून घेतल्यास त्याने मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते.
- बाळंत स्त्रीला पुरेसे दूध येत नसल्यास तिला दूधात तीळ घालून ते प्यायला द्यावे. यामुळे पुरेसे दूध येण्यास उपयोग होतो.
तीळ हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. परंतु याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या जसे की उलट्या, मळमळ, जुलाब होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात तिळाचे सेवन करावे.
कसे बनवावेत तिळाचे चविष्ट लाडू?
अत्यंत कमी साहित्यात तिळाचे चविष्ट लाडू बनवता येतात.
- तिळ १०० ग्रॅम
- गुळ १०० ग्रॅम
- काजू ३-४
- बदाम ३-४
- तुप
कढईतील तीळ सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. आता ब्लेंडरमध्ये बारीक करून पावडर बनवा. त्याच पॅनमध्ये काजू आणि बदाम भाजून बाजूला ठेवा. आता तूप गरम करा, त्यात गूळ आणि २ चमचे पाणी घाला, ते वितळेपर्यंत मिसळा. आता गुळात तीळ पावडर, ठेचलेले ड्रायफ्रूट्स घालून घट्ट होईपर्यंत चांगले मिसळा. नंतर एका प्लेटला तूप लावून पीठाचे समान भाग करून लाडू तयार करा. तुम्हाला अख्ख्या तिळाचे लाडू आवडत असतील तर तुम्ही तीळ भाजल्यानंतर ते अख्खेही वापरु शकता. त्यासाठी मिक्सरमध्ये तीळ बारीक करण्याची आवश्यकता नाही.