Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीAtal Setu : अटल सेतू वाहतुकीसाठी खुला

Atal Setu : अटल सेतू वाहतुकीसाठी खुला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’चे उद्घाटन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच ‘अटल सेतू’चे (Atal Setu) उद्घाटन केले. यावेळी राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. डिसेंबर २०१६ मध्ये नरेंद्र मोदी यांनीच या पुलाची पायाभरणी केली होती.

अटल सेतू हा १६.५ किमी समुद्रावर तर ५.५ किमी जमिनीवर बनलेला पूल आहे. हा देशातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. हा पूल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याला जोडण्याचे काम करेल. मुंबईहून पुणे, गोवा आणि दक्षिण भारतातील प्रवासासाठी लागणारा वेळ या अटल सेतूमुळे कमी होणार आहे. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई यांच्यातील अंतर २० मिनिटांत कापता येणार आहे. सध्या या प्रवासाला २ तासाचा अवधी लागतो. त्यात वाहतूक कोंडीत अडकला तर त्याहून जास्त वेळ लागतो. परंतु या पूलामुळे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होईल. त्याचसोबत वाहन चालकांना वेगवान प्रवास करत मुंबईच्या वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल.

अटल सेतूवरून प्रवास करताना वाहन चालकांना १०० किमी प्रति तास या वेगाने प्रवास करण्याची मर्यादा आहे. तसेच या सागरी महामार्गावर अवजड वाहने, दुचाकी, ऑटो रिक्षा आणि ट्रॅक्टर नेण्याची परवानगी नाही.

हा सेतू मार्ग विविध जोडरस्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जाणार असल्याने यामधील अंतर कमी होणार आहे. मुंबई शहराच्या चौफेर विस्तारासाठी सहाय्यभूत ठरणारा हा सेतू ‘गेमचेंजर’ ठरणारा असेल. अटल सेतूच्या एकेरी प्रवासासाठी २५० रुपये टोल भरावा लागेल. जर तुम्ही राउंड ट्रिप करत असाल तर तुम्हाला ३७५ रुपये मोजावे लागतील.

समुद्र तळापासून १५ मीटर उंचीवर पूलाचे बांधकाम करणे हे सर्वात मोठे आव्हानात्मक काम होते. या अटल सेतूच्या बांधकामासाठी १ लाख ७७ हजार ९०३ मेट्रिक टन स्टील आणि ५ लाख ४ हजार २५३ मेट्रीक टन सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. या पुलासाठी जवळपास २१ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या पूलावरून दिवसाला ७० हजार वाहने प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. तसेच पुढील १०० वर्ष हा पूल कायम राहणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात वेगवान वारे आणि वादळाचा सामना करण्यासाठी विशेष पद्धतीने लायटिंग पोल डिझाईन करण्यात आले आहे. विद्युत संकटकाळात कुठल्याही संभाव्य नुकसानीपासून वाचण्यासाठी लायटिंग प्रोटेक्शन सिस्टिम लावण्यात आली आहे. अटल सेतू हा मुख्यत: मुंबई – पुणे एक्सप्रेस वेला जोडण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. ज्यामुळे राज्यातील दोन प्रमुख शहरांना जोडण्याचे काम करेल. ज्यातून दळणवळण करणे सोपे होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -