मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यासाठी वेळ देत असतात. पंतप्रधान मोदींना एवढं प्रेम देशात मिळते तेवढं प्रेम देशात कुणालाच मिळत नसेल. विरोधकांना हे खटकते. त्यांच्या पोटात दुखते. आता अहंकारी लोकांचा अहंकार संपणार असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ‘अबकी बार 400 पार’ या घोषणेची आमचीही जबाबदारी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळी नवी मुंबई विमानतळ मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं उधळताना विरोधकांवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, 50 वर्षात जे झालं नाही ते मोदींनी करून दाखवलं. आमच्या भारताच्या अर्थ व्यवस्थेला मोदींनी मजबूत केले. करोडो राम भक्तांचे जे स्वप्न होते राम मंदिर झालं पाहिजे ते आज पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी मोदींचे मनमोकळेपणाने अभिनंदन केले असते, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
आज 22 किलोमीटरचा समुद्री पूल सुरू झाला आणि त्याचा शुभारंभ मोदींनी केला आहे. या सेतूचे भूमिपूजन मोदींनी केले होते आणि शुभारंभ देखील मोदींनी केलं आहे. मधल्या काळात कोविड काळ होता. तरी देखील अधिकाऱ्यांनी काम पूर्ण केले. अटल सेतू प्रकल्प गेमचेंजर आहे. अत्याधुनिक यंत्रणा वापरून हा प्रकल्प आपण पूर्ण केला आहे, असेही त्यांनी म्हटले.