पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
नवी मुंबई : आज अटल सेतू होत आहेत. विकासासाठी आपण समुद्राच्या लाटाना देखील टक्कर देऊ शकतो. मी सांगितले होते लिहून ठेवा देश बदलणार आणि जरूर बदलणार. ही मोदींची गॅरंटी होती आणि विकास काम पूर्ण करणे ही मोदींची गॅरंटी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळी नवी मुंबई विमानतळ मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. १० वर्षांपूर्वी हजारो करोडोंच्या घोटाळ्याची चर्चा होत होती. मात्र आता प्रकल्पांची चर्चा होत असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, मेट्रो, पाणी, रेल्वे, रोड असे हे प्रकल्प आहेत. हे सर्व टीमचे प्रयत्न आहेत. आज मोठ्या संख्येने महिला आल्या आहेत. केंद्र सरकारने जी महिला सक्षमीकरण अभियानाची गॅरंटी दिली. ती योजना राज्य पुढे घेऊन जात आहे. माता भगिनीचे जीवन सुखकर व्हावे यासाठी आम्ही काम करतोय. गर्भवती महिला, नोकरी करणारी महिला, त्यांच्यासाठी सुट्टी असो, सुकन्या योजना अशा अनेक योजना सुरू केल्यात.
2014 च्या निवडणुकीआधी मी रायगड किल्ल्यावर गेलो होतो. त्यावेळी काही संकल्प मी केले होते. आज ते संकल्प पूर्ण होताना मी बघत आहे. अटल सेतू त्याचाच एक भाग आहे. मागच्या १० वर्षात भारत बदलला आहे याची चर्चा होत आहे.
येत्या काळात मुंबईकराना बुलेट ट्रेन मिळणार आहे. काही लोकाची निष्ठा ही आपल्या फक्त तिजोरी भरण्यासाठी आहेत आणि परिवार वाढवण्यासाठी असते. भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून मोदींची गॅरंटी सुरू झाली आहे. जिथे मोदींची गॅरंटी सुरू होते तिथे दुसऱ्यांची संपते, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.