Saturday, March 15, 2025
Homeताज्या घडामोडीSouth Kashi : दक्षिण काशीच्या विकासासाठी विश्वनेत्याला घालणार साकडे!

South Kashi : दक्षिण काशीच्या विकासासाठी विश्वनेत्याला घालणार साकडे!

सव्वा किलो चांदीच्या अमृतकुंभाची भेट, धार्मिक कॉरीडॉर, वारसा जपण्याची करणार विनंती

सत्यजीत शाह

पंचवटी : नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्धघाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १२ जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. पंचवटीतील जगप्रसिद्ध श्री काळाराम मंदिर येथे दर्शन व आरती, त्यानंतर गोदाघाटावरील रामकुंड येथे येऊन ते गोदावरी पूजन (South Kashi) व आरती करणार आहेत. यावेळी पुरोहित संघाकडून त्यांचा सन्मान करत शहर विकासासाठी तसेच गोदा काठ सुशोभीकरण्यासाठी विविध उपाययोजनांविषयी पुरोहित संघ देशाच्या पंतप्रधानांना साकडे घालणार आहे.

गोदामाईला अतिक्रमणाचा विळखा

दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून देशभरात नाशिकची ओळख आहे. देशभरातून भाविक याठिकाणी विधी, पूजा, कर्मकांड ,गोद स्नान तसेच दर्शनासाठी येत असतात. परंतु गोदाघाट तसेच धार्मिक स्थळांच्या आजूबाजूला झालेल्या अतिक्रमणामुळे आलेल्या भाविकांना तसेच पर्यटकांना मंदिरे दिसत नाहीत. तर अनेक ऐतिहासिक मंदिरांना या अतिक्रमणाचा विळखा पडल्याने ते अदृश्य होऊन खितपत आहेत. पंचवटीत दोन चार मंदिराचा अपवाद सोडला तर भाविकांना व पर्यटकांना अन्य कुठल्याही ठिकाणांची माहिती मिळत नाही.

काशीविश्वेश्वर व उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉर व्हावे

नाशिकचे ऐतिहासिक, अध्यात्मिक, कृषी, विविध उद्योग अशी वैशिष्ट्ये सांगणारी अनेक स्थळांना भेटी देण्यापासून भाविक, पर्यटक वंचित राहतात. अशा विविध कारणांमुळे भाविकांचा हिरमोड होऊ नये, यासाठी काशीविश्वेश्वर व उज्जैनच्या धर्तीवर नाशिक देखील कॉरिडॉर म्हणून जाहीर करावे, अशी पुरोहित संघाची आणि एकूणच नाशिककरांची अपेक्षा आहे.

वारसा जपण्यासाठी…!

नाशिकला पुरातन ऐतिहासिक वारसा असल्याने, तसेच तीर्थ पुरोहितांकडे पूर्वजांच्या नोंदीसारखे रेकॉर्ड असल्याने शासनाकडून असे रेकॉर्ड जतन करण्यासाठी व सुरक्षित ठेवण्यासाठी रेकॉर्ड रुम असावी, दर बारा वर्षांनी नाशिक येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यातील आखाड्यांसाठी आरक्षित करण्यात येणारी जागाही कमी पडते. आगामी कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने साधू महंतांच्या आखाडा करिता पाचशे एकर जागा कायमस्वरूपी खरेदी करून आरक्षित करावी. तसेच पूर्वी या पंचवटी परिसरात आलेल्या भाविकांसाठी धर्मशाळा मोठ्या प्रमाणात दिसत होत्या, परंतु आता या धर्मशाळा मोडकळीस आलेल्या असून जाणूनबुजून या पडझडीकडे दुर्लक्ष केले जात आहे. याच जागांवर व्यावसायिक इमारती उभारल्या जात असून धर्मशाळा बंद पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शासनाने धर्मशाळांकरिता नियमावली बनवत जास्तीत जास्त धर्मशाळा कशा वाचवता येतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी पुरोहित संघाकडून केली जाणार असल्याचे अध्यक्ष सतिष शुक्ल यांनी दैनिक प्रहारशी बोलताना सांगितले.

सव्वा किलो चांदीचा अमृतकुंभ

गोदावरी पूजनासाठी येणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना पुरोहित संघाकडून जवळपास सव्वा किलो चांदीचा अमृतकुंभ भेट देण्यात येणार आहे. या कुंभावर आकर्षक नक्षीकाम केले असून लोटी त्यावर विड्याची पान व नारळ अशा स्वरूपात हा अमृतकुंभ बनविला आहे. मोदींच्या हस्ते पहिले तीर्थ पूजन नंतर गोदावरी पूजन व शेवटी गोदावरी आरती करण्यात येणार आहे. यावेळी सतीश शुक्ल हे पौराहित्य करणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -