मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे
मराठवाडावासीयांना वंदे भारतच्या रूपाने नववर्षाची भेट मिळाली आहे. जालना ते मुंबई या मार्गावर ही वंदे भारत सुरू करण्यात आली आहे. यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या रेल्वेची आसनक्षमता ५३० एवढी आहे. याच्या पहिल्या रेल्वेतून मुंबई ते जालना दरम्यान ३०६ प्रवाशांनी प्रवास केला. छत्रपती संभाजीनगर ते मुंबई आणि मुंबई ते छत्रपती संभाजीनगर या रेल्वे मार्गाचे अंतर एकसारखेच आहे; परंतु मुंबईला जाताना रेल्वेचे भाडे कमी व मुंबईवरून छत्रपती संभाजीनगरला परत येत असताना १५० रुपये जास्त मोजण्याची वेळ प्रवासी वर्गावर येत आहे. हा फरक कशासाठी आहे? असा प्रश्न वंदे भारतने प्रवास करणारे प्रवासी उपस्थित करीत आहेत. तिकीट दरात हा फरक कशामुळे आहे? याचा खुलासा दक्षिण मध्य रेल्वेने देखील केलेला नाही. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईला पोहोचण्यासाठी वंदे भारतच्या रूपाने केवळ पाच तास लागत आहेत, त्यामुळे मराठवाड्यातील प्रवासी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रेल्वेचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाम खूश आहेत.
मराठवाड्यातील इतर रेल्वेविषयक अनेक समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. मराठवाड्याला रावसाहेब दानवे यांच्या रूपाने रेल्वेचे केंद्रातील राज्यमंत्रीपद मिळालेले आहे. त्यांनी मराठवाड्यातील सर्व रेल्वेविषयक प्रश्नांना काळजीपूर्वक हाताळून लवकर मार्गी लावावेत, अशी अपेक्षा मराठवाड्यातून व्यक्त होत आहे. मुंबईवरून मराठवाडा व विदर्भाला जोडणारी नंदीग्राम एक्स्प्रेस ही ससससकोरोना काळात नागपूरसाठी बंद करण्यात आली होती. त्यानंतर ही रेल्वे केवळ आदिलाबाद ते मुंबई धावत असल्याने नागपूरकडे रुग्णालय व इतर आवश्यक कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एसटीचे भाडेही अवाक्याबाहेर असल्याने जास्तचा आर्थिक भुर्दंड मराठवाड्यातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेला आदिवासी तालुका म्हणून ओळखला जाणारा किनवट येथून आदिलाबाद तिरुपतीला जाणारी रेल्वे देखील गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या निर्धारित वेळेत कधीच येत नाही, त्यामुळे किनवट व परिसरातील नागरिकांना रेल्वेची वाट पाहत थांबावे लागत आहे. किनवटच्या प्रवाशांना नागपूरला जाण्यासाठी एकमेव असलेली नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूरपर्यंत धावत नसल्याने अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे किनवट येथील पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाने तेलंगणातील आदिलाबादचे खासदार बापूराव सोयाम यांची आदिलाबाद येथे जाऊन भेट घेतली व त्यांना मराठवाड्यातील रेल्वे समस्या मार्गी लावण्याचे साकडे घातले. मुंबईवरून धावणारी नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूरपर्यंत पूर्ववत सुरू झाल्यास या भागातील नागरिकांची सोय होईल व हा प्रश्न आपण दिल्ली दरबारी मांडू, असे अभिवचन आदिलाबादचे खासदार सोयाम यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले.
मराठवाड्यातील दुहेरीकरणासह अन्य लाइन कॅपॅसिटी वृद्धिंगत करणे गरजेचे आहे. या विषयाशी संबंधित छोटी-मोठी बरीच कामे दुर्लक्षित राहिलेली आहेत. दक्षिण मध्य रेल्वे, रेल्वे बोर्डाचे अधिकारी, रेल्वेमंत्री, रेल्वे राज्यमंत्री यांनी संयुक्त बैठक घेऊन महत्त्वपूर्ण कामांना मंजुरी देऊन ती कामे मार्गी लावली पाहिजेत. दुर्लक्षित राहिलेला कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. मुख्य करून मराठवाड्यातील लातूर रोड – लातूर – कुर्डूवाडी – पंढरपूर – मिरज या ३६० किलोमीटर रेल्वे मार्गावर ब्लॉक सेक्शनमधील अंतर १५ – ३४ कि.मी. इतके जास्त आहे. त्या ब्लॉक सेक्शनमधील अंतर कमी करण्यासाठी पंधरा – सोळा नवीन क्रॉसिंग रेल्वे स्टेशन निर्माण करायला पाहिजे. यासाठी किमान ३०० ते ४०० कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. यासोबतच परभणी – मनमाड रेल्वे मार्गावर पाच ते सहा नवीन क्रॉसिंग रेल्वे स्टेशन निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
‘एमआरआयडीसी’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे जंक्शनला सर्व बाजूंनी दहा ते पंधरा किलोमीटरपर्यंत ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टिमची कामे प्राधान्याने करायला हवी. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रेल्वे विकासात सखोलपणे तसेच जाणीवपूर्वक लक्ष घालणारे नेते आहेत. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्रातील विविध रेल्वेविषयक प्रश्नांमध्ये लक्ष घालून ते सोडविलेले आहेत. रेल्वेच्या एकूण विकासासह मोठ्या प्रकल्पासाठी केंद्राकडून महाराष्ट्राला आतापर्यंत एक लाख कोटींचा, तर यावर्षी १३,००० कोटींचा निधी मिळाला आहे. या निधीतून रेल्वेचा राज्यात अभूतपूर्व विकास झालेला आहे. यावर्षी अखेरपर्यंत मराठवाड्यात संपूर्ण ब्रॉडगेजचे इलेक्ट्रिफिकेशन होणार आहे. मराठवाड्यातील जालन्यापर्यंत इलेक्ट्रिफिकेशन झाल्यामुळे वंदे भारत रेल्वे सुरू करता आली.
छत्रपती संभाजीनगर ते मनमाड या मार्गावर दुहेरीकरणासाठी १००० कोटींचा निधी मिळाला आहे. येत्या मार्चमध्ये त्या कामाला सुरुवात होणार आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर ते जालन्याहून पुढेही दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे. ते काम लवकर झाल्यास मराठवाड्यातील परभणी व नांदेड या दोन्ही जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार आहे, त्यामुळे हा प्रश्न लवकर मार्गी लागावा एवढीच मराठवाडावासीयांची मागणी आहे. मराठवाडा ते कर्नाटक या दोन भागांना जोडण्यासाठी नांदेड – बिदर हा रेल्वे मार्ग देगलूरहून करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ७५० कोटी रुपयांचा महाराष्ट्र शासनाचा हिस्सा देण्याची तयारी दर्शविली आहे, त्यामुळे मराठवाड्यातून बेंगलूरुला जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग होणार आहे. नांदेड येथील पवित्र गुरुद्वारा व बिदर येथील पवित्र नानक जीरा साहिब या दोन शिख समुदायांच्या पवित्रस्थळांना जोडणारा हा मार्ग आता लवकरच मार्गी लागणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत मराठवाड्यातून धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये स्वच्छतेचा मात्र पुरता बोजवारा उडालेला आहे. केवळ आरक्षितच नव्हे, तर एसीच्या डब्यांमध्ये देखील प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. नांदेड – पुणे एक्स्प्रेस तसेच नांदेड – पुणे – पनवेल या रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या मराठवाड्यातील हजारो प्रवाशांना या घाणीच्या साम्राज्याला सामोरे जावे लागते. तसेच या रेल्वेमध्ये प्रवास करीत असताना आरक्षित डब्यांमध्ये विनाआरक्षित प्रवासी थेट शिरतात. त्यांचा त्रासही या भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच होतो; परंतु ही समस्या कोणीही मार्गी लावलेली नाही. नांदेडला असलेला पवित्र गुरुद्वारा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. येथे दर्शनासाठी थेट अमृतसर व दिल्ली तसेच पंजाब येथील हजारो भाविक दररोज येत असतात. त्यांना देखील अमृतसर तसेच दिल्लीवरून ये – जा करणाऱ्या रेल्वेमध्ये नेहमीच घाणीच्या साम्राज्यात प्रवास करावा लागत आहे. रेल्वेत स्वच्छता ठेवणे हे खूप काही अवघड काम नाही; परंतु तेच काम इमानेइतबारे करण्याची वृत्ती अंगी असावी लागते. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याकडे खरोखर लक्ष दिल्यास प्रवासी वर्ग याबद्दल रेल्वे प्रशासनाचे नक्कीच आभार मानेल.