पुणे : पुण्यात (Pune News) भरदिवसा करण्यात आलेल्या शरद मोहोळ याच्या हत्येमुळे (Sharad Mohol Murder) अख्खं पुणे हादरलं. त्याच्या साथीदारांनीच कट रचून त्याची हत्या केली. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. या हत्येनंतर सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झालेल्या आरोपींना पकडायला पोलिसांना फार काळ लागला नाही. या प्रकरणी पोलिसांनी दोन वकिलांसह आठजणांना ताब्यात घेतले. आता पुन्हा या प्रकरणी दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
धनंजय मारुती वटकर आणि सतीश संजय शेडगे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हत्येसाठी पिस्तुल पुरवण्याचं काम या दोघांनी केलं होतं. शरद मोहोळचा ५ जानेवारी भरदुपारी सुतारदरा येथील घरासमोर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. महत्वाचे म्हणजे, आरोपींनी मुळशी तालुक्यात तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करण्याचा सराव केला होता. या गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २०, रा. शिवशक्तीनगर, सुतारदरा), नामदेव महिपती कानगुडे (वय ३५, रा. भूगाव, मुळशी), अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे (वय २४, रा. स्वराज्य मित्र मंडळाजवळ, पर्वती), चंद्रकांत शाहू शेळके (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष गव्हाणकर (वय २०, रा. पौड, मुळशी), विठ्ठल किसन गांदले (वय ३४, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा) अशी पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींची नावे आहेत. मोहोळ खून प्रकरणात यापूर्वी आठ जणांना अटक केली असून, त्यापैकी या सहा जणांना न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती, त्यानंतर आरोपींच्या कोठडीत पुन्हा सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे.