मुंबई: गेल्या काही दिवसापांसून मालदीव प्रकरणावरून देशात वातावरण तापलेले आहे. अशातच देशभरातील पर्यटक आता मालदीवऐवजी लक्षद्वीपला जाणे पसंत करत आहेत. यासोबतच राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या आधी अयोध्येला जाणाऱ्या भक्तांमध्येही वाढ होत आहेत. त्यातच स्वस्त दरात विमान सेवा देणारी एअरलाईन स्पाईसजेटचे चेअरमन आणि सीईओ अजय सिंह यांनी या ठिकाणांसाठी उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार त्यांची लो कॉस्ट एअऱलाईन्स सेवा लवकरच लक्षद्वीप आयलँडसाठी सुरू होणार आहे. सोबतच अयोध्येसाठीही त्यांची फ्लाईट सर्व्हिस सुरू होणार आहे. या सर्व घोषणा एअरलाईन्सच्या वार्षिक सभेदरम्यान कऱण्यात आल्या.
लक्षद्वीप आणि अयोध्येसाठी लवकरच उड्डाणे सुरू करणार स्पाईसजेट
गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लक्षद्वीप दौरा आणि त्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यातील तणावामुळे लक्षद्वीपला मोठ्या प्रमाणाच सर्च केले जात आहे. अशातच तेथे जाणाऱ्यांची संख्याही हळूहळू वाढत आहे. याचमुळे या एअरलाईन कंपनीने तेथे जाण्यासाठी आपली उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच कंपनीने अयोध्येला जाण्यासाठीही वाढती मागणी पाहता तेथेही उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान मोदी गेल्या आठवड्यात लक्षद्वीप दौऱ्यावर गेल्यानंतर हे आयलँड चर्चेत आले होते. पंतप्रधान मोदींनी या सुंदर ठिकाणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि भारताविरुद्ध अपमानजनक विधान केले होते. यानतर मालदीव आणि भारत यांच्यातील तणाव वाढला आहे. बऱ्याच ट्र्रॅव्हल कंपन्यांनी मालदीवसाठीचे बुकिंग रद्द केले. सोशल मीडियावरही लोकांना मालदीवऐवजी लक्षद्वीप जाण्यासाठी आवाहन केले जात आहे.